‘तुम्ही हरवू शकता स.का. पाटलांना’ असे म्हणत जॉर्ज फर्नांडिस यांनी इतिहास घडवला

‘तुम्ही हरवू शकता स.का. पाटलांना’ असे म्हणत जॉर्ज फर्नांडिस यांनी इतिहास घडवला

जॉर्ज फर्नांडिस यांनी ७० च्या दशकात मुंबईवर आपला प्रभाव टाकला होता. (फोटो साभार - द हिंदू)

कामगार चळवळीचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने एका धगधगत्या निखाऱ्याचा अस्त झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जॉर्ज फर्नांडिस यांचे आयुष्य जरी निखाऱ्याप्रमाणे असले तरी गेल्या काही काळापासून ते विजनवासात होते. मराठी नसलेला एक माणूस मुंबईत येतो आणि लोकसभा मतदारसंघ जिंकतो. मुंबईतील कामगारांना एकत्र करुन मुंबई बंद पाडतो, हे आताच्या पिढीला अविश्वसनीय वाटेल. मात्र जॉर्ज यांनी ते करुन दाखवले होते.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शिगेला पोहोचली असताना मुंबईत स.का.पाटील यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र अशा मातब्बर नेत्यासमोर जॉर्ज फर्नांडिस यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आजही अनेक मतदारसंघ हे कोणत्यातरी नेत्याचे संस्थान झालेले आहे. अशा प्रस्थापित नेत्यांना आज हरवणे कठीण वाटू शकते. मात्र जॉर्ज यांनी त्याकाळात हे शिवधनुष्य पेलले आणि त्यात ते यशस्वीही झाले.

जॉर्ज यांचा हटके प्रचार

स.का. पाटील यांना हरवण्यासाठी त्याकाळात जॉर्ज यांनी अनोखी शक्कल लढवली. आजच्या सारखे तेव्हा सोशल मीडिया किंवा वृत्तवाहिन्या नव्हत्या. जॉर्ज यांनी मतदारसंघाच्या भिंतींवर लिहिले की, ‘होय, तुम्ही स.का.पाटलांना हरवू शकता’. या वाक्याचा सकारात्मक परिणाम झाला. लोकांनी जॉर्ज फर्नांडिस यांना भरभरून मते दिली आणि ते निवडून आले. हाती पैसा नसतानाही फर्नांडिस यांनी ही किमया करुन दाखवली होती. अतिशय मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवली. एक नेता जर अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा राहिला तर जनता त्याला साथ देते, हा संदेश त्याकाळात जॉर्ज यांनी संबंध देशाला दिला.

मुळचे कर्नाटकचे असलेले जॉर्ज फर्नांडिस अशाच प्रकारे मुंबई, कर्नाटक आणि बिहारमधूनही अनेकवेळा निवडून आले होते. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस हे २० महिने तुरुंगात होते, मात्र तुरुंगात राहून देखील ते १९७७ साली निवडणुकीत विजयी झाले होते.

 

First Published on: January 29, 2019 10:28 AM
Exit mobile version