साम्यवादी क्रांतिकारक कार्ल मार्क्स

साम्यवादी क्रांतिकारक कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स हे साम्यवादी विश्वक्रांतीचे कृतिशील पुरस्कर्ते, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचे प्रणेते. १९१८ साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि १९४९ मध्ये चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचे मूळ प्रणेते. त्यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी पश्चिम जर्मनीतील र्‍हाइनलँड या प्रांतातील ट्रीर शहरात झाला. त्यांचे वडील-हाईनलँड येथे वकिलीचा व्यवसाय करीत असत. बॉन विद्यापीठात विधी शाखेची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठात डॉक्टरेट पदवी मिळविण्यासाठी प्रवेश घेतला.

१८४१ मध्ये त्यांचा प्रबंध मान्य होऊन त्यांच्या नावामागे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागली. मार्क्स यांचा सामाजिक चळवळीवरील प्रभाव अतुलनीय आहे. मार्क्स स्वतः एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. जर्मनीतील जेना विद्यापीठामध्ये कायदा आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर मार्क्स यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले. कार्ल मार्क्स यांनी १८४८ रोजी कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला. फ्रेडरिच एन्गेल्स (Friedrich Engels) यांच्या सहकार्याने लिहिलेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत त्यांनी कामगार-मजूर वर्गाने क्रांती करून कम्युनिस्ट समाज स्थापन करावा असा विचार मांडला.

धर्म दुबळ्या माणसाला भ्रामक सुख, आभासात्मक सुख देतो. त्याची ती गरज आहे, भ्रम आहे. धर्माच्या रूपाने व्यक्त होणारे दुःख हे एकाच वेळी खर्‍या दुःखाचे प्रकट रूप असते आणि त्याच वेळी तो खर्‍या दुःखाचा निषेधही असतो. धर्म हा दबलेल्यांचा, दीनदुबळ्यांचा आवाज असतो. धर्म हृदयशून्य जगाचे हृदय असते. धर्म हा निरुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो. धर्म लोकांची अफू आहे. खरे सुख न देता, तो अफूसारखी गुंगी देतो. उत्पादन व्यवहार, उत्पादनशक्ती, उत्पादनसंबंध, त्यातील अंतर्विरोध, खासगी मालकी, शासनसंस्था, विचारसरणी, क्रांती इत्यादी मूलभूत संकल्पनांचा विचार करून मार्क्सने मानवाचा उत्पादन व पुनरुत्पादनाचा व्यवहार, त्यातील उत्पादनशक्ती व उत्पादनसंबंध यांचे द्वंद्वात्मक नाते यांच्या आधारे इतिहासाचा तसेच त्याच्या काळातील वर्तमानाचा अभ्यास केला. या अभ्यासातूनच त्याने निष्कर्ष काढला की मानवी इतिहास हा वर्गलढ्याचा इतिहास आहे व उत्पादनसाधनांवरची भांडवली खासगी मालकी हे आजच्या सर्व प्रश्नांचे मूळ आहे.

मार्क्सला श्रमविभागणी मान्य आहे. अगदी प्रागैतिहासिक काळातही स्त्री-पुरुष आणि शिकारी व अन्नसंग्राहक अशी विभागणी असू शकते. मात्र, विशिष्ट प्रकारचे श्रम करणारा श्रेष्ठ आणि बाकी हलक्या दर्जाचे अशी परिस्थिती निर्माण होणे हे संघर्षाचे मूळ ठरले असेल असे तो म्हणतो. उदाहरणार्थ सरंजामशाहीत बुद्धिजीवींची कामे ही श्रेष्ठ दर्जाची समजली जात होती. बुद्धिजीवी आणि गुलाम अशी विभागणी ही पहिली अनैसर्गिक श्रमविभागणी होती असे मार्क्स म्हणतो.

उत्पादनाच्या पद्धतीतील हिंसात्मक बदल म्हणजे ‘क्रांती’. खर्‍या जाणिवा आणि चुकीच्या जाणिवा असा भेद मार्क्सने केला आहे. ‘आपल्या जाणिवांवरून आपले अस्तित्व ठरत नसून आपल्या अस्तित्वाचा आपल्या जाणिवांवर निर्णायक प्रभाव पडतो’ असे मार्क्स म्हणतो. आपण राहत असलेल्या जगाचे खरे स्वरूप श्रमिकांनी समजावून घेतले पाहिजे. आपल्या शोषणाची जाणीव त्यांना झाली पाहिजे. विचारप्रणाली किंवा धर्माच्या अफूने श्रमिकांची दिशाभूल होते असेही मार्क्सला वाटते. अशा या महान साम्यवादी क्रांतीच्या प्रणेत्याचे १४ मार्च १८८३ रोजी निधन झाले.

First Published on: May 5, 2021 3:30 AM
Exit mobile version