विलोभणीय आडिवरे – कशेळी

विलोभणीय आडिवरे – कशेळी

Adivare kasheli

गोळपवरून पुढे आडिवरेला जाताना कशेळीचा फाटा लागतो. कशेळीमध्ये असलेले कनकादित्याचे म्हणजे सूर्याचे मंदिर देखील तितकेच प्रसिद्ध आणि ऐतिहासिक असे आहे. गुजरातेत वेरावळजवळ प्रभासपट्टण इथे प्राचीन सूर्यमंदिर होते. इ.स. १२९३ साली अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी तिथल्या पुजार्‍याच्या मदतीने एका व्यापार्‍याने तिथल्या काही सूर्यमूर्ती जहाजात घालून तिथून हलवल्या. त्यातलीच एक मूर्ती म्हणजे कशेळीचा कनकादित्य होय.

कशेळीपासून जेमतेम चार किमीवर आहे आडिवरे हे गाव. या गावाचे प्राचीन काळापासून संदर्भ मिळतात. आडिवरे देखील अत्यंत रमणीय असे ठिकाण आहे. या ठिकाणी शंकराचार्यांनी महालक्ष्मी देवीची स्थापना केली असेही सांगितले जाते. मंदिराच्या सभागृहात छतावर अतिशय सुंदर नक्षीकाम असून विविध कथनशिल्पे इथे पाहायला मिळतात. मंदिरात महाकालीची प्रसन्न मूर्ती असून तावडे मंडळींची ती कुलदेवता आहे. परिसरात नगरेश्वर, महालक्ष्मी, महासरस्वतीची मंदिरे आहेत. नगरेश्वराच्या मंदिरात छताच्यावर गेलेले मोठे वारूळ पाहायला मिळते. या देवीची कथा मोठी सुंदर आहे.

हा सारा परिसर फिरण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील. कारण इथून जवळच असलेल्या देवीहसोळ या गावी असलेले आर्यादुग्रेचे मंदिर आहे. त्याच्याच शेजारी रहस्यमय कातळशिल्प देखील आवर्जून पाहावे असेच आहे. कोकणात आता अनेक ठिकाणी कातळशिल्पे सापडू लागली आहेत. देवीहसोळचे हे शिल्प फारच सुंदर आणि देखणे आहे. इथून राजापूरकडे जाताना बारसू नावाच्या सड्यावर देखील असेच एक भव्यदिव्य कातळशिल्पं पाहायला मिळते. हा सगळाच परिसर अतिशय रमणीय, देखणा आणि विलोभणीय असाच आहे. आंबे, नारळ, सुपारी यांनी बहरलेला आहे. पक्षांच्या विविध जाती देखील तुम्हाला येथे पाहायाला मिळतील.

त्यामुळे कोकणात आल्यानंतर केवळ समुद्रकिनारे पाहण्यापेक्षा तुम्हाला अनेक ठिकाणं आहेत. ज्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला कोकणातील ऐतिहासिक वैभव देखील अनुभवता येणार आहे.

First Published on: October 23, 2018 12:24 AM
Exit mobile version