श्रेष्ठ कवी नारायण मुरलीधर गुप्ते

श्रेष्ठ कवी नारायण मुरलीधर गुप्ते

नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी हे श्रेष्ठ कवी होते. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर याठिकाणी झाला. त्यांचे शालेय शिक्षण यवतमाळ व अमरावती येथे झाले. परिस्थितीमुळे त्यात खंड पडल्याने ते मॅट्रिकही होऊ शकले नाहीत. नंतर सरकारी नोकरी धरली. ‘प्रणयपत्रिका’ ही ‘बीं’ची पहिली कविता १८९१ची पण १९११ मध्ये लिहिलेल्या ‘वेडगाणे’ या कवितेपासून त्यांनी ‘बी’ हे टोपणनाव घेतले. ‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. ‘पिकले पान’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या. कवी बी यांनी एकूण ४९ कविता लिहिल्या. ‘फुलांची ओंजळ’ची दुसरी आवृत्ती सप्टेंबर १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली.

केशवसुतांचा ‘बीं’ वरील प्रभाव विविध तर्‍हांनी जाणवतो. एक तर्‍हा म्हणजे ‘डंका’, ‘आम्ही’, ‘भगवा झेंडा’ इत्यादी कवितांतील जुने नष्ट करण्याची चेतना देणार्‍या बंडखोर विचाराची दुसरी ‘वेडगाणे,’‘पिंगा’, ‘चाफा’ यांसारख्या अलौकिकाचा ध्यास व्यक्त करणार्‍या गूढ कवितांची तिसरी, ज्यांत ‘आनंदाला म्लानपणानच सौदर्याला क्षय’ अशा पूर्णाकडे जग जाणार असल्याचा निर्भर आशावाद उच्चारणार्‍या ‘फुलांची ओंजळ’ सारख्या कवितांची. सौंदर्यानंदाची तीच आस आणि ‘सान्त अनन्ताची मिळणी’ झाल्याचा उत्फुल्ल क्षणी होणारा साक्षात्कार, ‘बीं’चे बालकवींशी साधर्म्य दाखवतो.‘आठवण’मधील निसर्गचित्रण काहीसे बालकवींच्या ढंगाचे आहे.

‘विचार-तरंगां’मध्ये वारंवार बालकवींच्या ‘फुलराणी’चा भास होतो.‘कमळा’ ही कथन-कविता गोविंदाग्रजांच्या इतिहासविषयक स्वच्छंदतावादी वृत्तीची आणि मधूनमधून त्यांच्या शाहिरी थाटाच्या शब्दकळेची आठवण जागी करते. ‘बीं’ नी काव्यासंबंधीची आपली मते ‘कविवंदन’, ‘विचारतरंग,’ यांसारख्या कवितांत ठामपणे व्यक्त केली आहेत. छन्द – व्याकरण – रसादींची जुनी मापेकोष्टके लावून आधुनिक कवितेवर रोष धरणार्‍या विद्वद्वर्यांचा (ते ‘विशाळ मणिगोटे’) ‘बी’ धिक्कार करतात. अशा या श्रेष्ठ कवीचे ३० ऑगस्ट १९४७ रोजी निधन झाले.

First Published on: June 1, 2022 4:20 AM
Exit mobile version