पालकसभा

पालकसभा

माझ्या मुलाच्या शाळेत पालकसभा होती. खरंतर पालकसभा असली तरी एकाचवेळी वर्गातील 40 पालकांना एकत्रित बोलावून एकत्रित संबोधण्याचा तो सभेसारखा कार्यक्रम नव्हता. ही एकाअर्थी चांगली गोष्ट होती. वेळेच्या अर्धा अर्धा तासाचे भाग करून दहा-दहा पालकांना वेगवेगळ्या वेळी बोलावलं होतं आणि विशेष म्हणजे वर्गशिक्षिका बाई प्रत्येक पालकाशी वैयक्तिक संवाद साधत होत्या. त्या-त्या पालकांना त्यांच्या पाल्यांविषयीची माहिती सांगत होत्या. तत्पूर्वी त्यांनी वर्गात झालेल्या चाचणी परीक्षांचे पेपरही पालकांना पहायला दिले होते, त्यामुळे पालकांना मुलांनी परीक्षेत नेमके काय दिवे लावले आहेत याची शिक्षकांना भेटण्यापूर्वीच माहिती होत होती.

शांततामय पद्धतीने पालक आपल्या मुलांचे पेपर पाहत हळूहळू मुलांना चुका सांगत होते. बाई एकेका पालकाशी बोलत होत्या. हे सारं सुरळीत सुरू असताना अचानक बाईंनी आवाज वाढवला.

‘क्यो, उसके मम्मी को क्यों भेजना पढेगा..’ एका पुरुष पालकावर बाई भडकल्या होत्या.
‘पहले तो बच्ची का अ‍ॅडमिशन लेट हुआ, उसके बावजूद भी बच्ची रेग्युलर नहीं है. बच्ची का तो इसमे कोई दोष नहीं. आपको ही समझना होगा ना.. हमारे स्कुल में दिवाली की बस तीन दिन छुट्टी होती है. दशहरेपर दस दिन छुट्टी दी थी. और बच्ची कब आती है? तो बीस दिन बाद! बुक में छुट्टी कितनी है सबकुछ लिखवाया जाता है.’
‘जी, उनके मम्मीसे बात करना पडेगा, उनको भेजता हूँ.’ पुरुष पालक अजूनही आपल्या मुलीच्या आईलाच दोष देत बोलत होता.
‘आप तो फिरसे मम्मी को बीच में ला रहे.. क्या बच्ची आपकी नहीं है. सारा काम मम्मीने ही देखना होगा?’
पुरुष पालक यावर काही बोलला नाही, पण विचित्र स्मित करत तो पुढचं ऐकू लागला.
‘बच्ची की हमेशा अधूरी रहती है, कुछ घरसे मंगवाया जाये तो लेकर आती नहीं है और घरपर बैठे बैठे तो व्हॉट्सअ‍ॅपपर पुछते है-एक्झाम कब है? स्कुल को सिरियसली लेते नहीं हो क्या?’
‘वो सब उनकी मम्मी ही देखती है..’
‘तो इसमे गलती किसकी है? मम्मी देखती है यह कहकर आप बात को टाल कैसे सकते. बच्चा क्या सिर्फ माँ का होता है.. क्या आपकी कोई जिम्मेदारी नहीं? आप ऐसा कह भी कैसा सकते है? अगर सबकुछ मम्मी करती है तो वो ही क्यों नही आयी.’
‘बीमार है इसलिए आना पडा.’

‘वरना आप तो आते नहीं! स्कुल में बच्ची क्या कर रहीं है, छुट्टीयाँ कितनी हो रही है, ये सब कुछ जानना आपको जरुरी ही नहीं लगता! एक बात समझिये, अगर मम्मी हर बार ध्यान देती है और अगर इस सब में उनका दोष है तो आपका भी है. आपको भी अपनी बच्ची की पढाई पर ध्यान देना होगा और उसके पढाई में, परवरीशमें शरिक भी होना होगा. वहाँ बैठकर अ‍ॅप्लीकेशन लिख दिजीये, इतनी छुट्टी क्यों हुई. वरना कल उसे में क्लास में बैठने नहीं दूंगी.’
त्या पालकाला किंचित अपमानितही वाटलं असेल पण तरीही त्याच्या चेहर्‍यावरचे भाव अपराध्यासारखे नव्हते. बाईंनी चिठ्ठी लिहून देण्यास सांगितलं तरी जराही हालचाल न करता ते थोडावेळ थांबून राहिले आणि मग त्यांनी हळूच तिथून काढता पाय घेतला. दुसर्‍या दिवशी त्या मुलीला वर्गात बसू दिलं की नाही ठाऊक नाही. किंवा बिचार्‍या आजारी आईनं येऊन पुन्हा बाईंची भेट घेतली असेल कोण जाणे!

मुलांची जबाबदारी आईचीच असते असं आजही या तर्‍हेच्या पुरुष पालकांना बिनदिक्कतपणे वाटतं याचं आश्चर्यच वाटत होतं. मुलाचं पालनपोषण, शिक्षण, संस्कार वगैरे सारं काही आईच्याच पारड्यात टाकून मोकळं व्हायचं. मग त्यात काही कसूर राहिली तर पुन्हा तिच्यावर दोषारोप करायला मोकळंच रहायचं. ‘पैसे कमवून आणून देतो बाकी सारं तू बघ’, असा भाव अशा पुरुषांच्या एकूण वागण्यात असतो. पण याच वाक्याचा न्याय लावायचा झाला तर स्त्रीनं मी घरदार सांभाळते, ती जर नोकरदार असेल तर मी घर-नोकरी करते असं म्हणून हात वर केले तर चालतं का? मूल जन्माच्यावेळीच पालक म्हणून येणार्‍या बाळाची जबाबदारी दोहोंची ही गोष्ट का ध्यानात घेतली जात नाही. अनेकदा तर पित्याला आपलं लेकरू कुठल्या इयत्तेत शिकत आहे याचा पत्ताच नसतो आणि ही बाब ते फार अभिमानाने मिरवत असतात. ‘मुलांकडे हीच बघते, तीच त्यांचा अभ्यास घेते. तिला सारं माहीत असतं.’ असं आईचं कौतुक करून वडील लोक स्वत:च खूश होत असतात.

‘तुझं मुलांकडे लक्ष नाहीये हां, बघ किती टीव्ही पाहतात किंवा बघ किती उलटं बोलतोय किंवा इतकं चुरूचुरू बोलायला कुठून शिकतात किंवा मुलगा/मुलगी जर का पुन्हा असं वागली तर तुझ्याकडे आधी बघून घेईन किंवा आपली मुलं चांगलीच निघायला पाहिजेत हं किंवा तुझं काम गेलं तेल लावत आधी मुलांकडे बघ, त्यांना खायला दे किंवा मोबाईल बास झाला तुझा, लेकरू बघ काय म्हणतंय किंवा..किंवा..किंवा..’ अशा असंख्य वाक्यांनी आयांचा उद्धार करून मुलांची जबाबदारी किंवा त्यांना संस्कारक्षम मूल बनवण्यात त्यांचाच सर्वाधिक वाटा आहे हे ठसवून सांगितलं जातं. यामध्ये आपल्या आयांनाही काही खटकत नसतं. मुलं नीट नाही वागलं, समारंभात आगाऊपणा केला, भांडण केलं तर त्यांनाच ते कमीपणाचं वाटत राहतं. त्यामुळे अनेकदा आया मुलांना त्यांच्या बालसुलभ गोष्टींवरही संस्कारचं लिंपन चढवण्याच्या नादात असतात. त्यातूनच त्या मुलांना मुलांसारखं वागू न देता खेकसत राहतात. कारण कुठंतरी बॅक ऑफ माईंड त्यांच्या डोक्यात असतंच की मूल नीट नाही वागलं, बोललं तर त्याचा जबाब त्यांनाच विचारला जाणार आहे. पण आईच्या वागण्यातला गोंधळ कुणाच्या लक्षात येत नाही.

मुलांची सुदृढ वाढ व्हायची असेल तर त्यांना आईवडील दोघांचं प्रेम आवश्यक आहे. दोघांचा वेळ आणि नुसता वेळ नव्हे तर अटेंटिव्ह वेळ देणं आवश्यक असतं हे त्या पुरूष पालकाच्या गावीच नाही याचं वाईट वाटत होतं. पण मला त्या बाईंचं फार कौतुक वाटलं. जितक्या वेळा त्या पालकानं मुलीच्या अभ्यास किंवा सुट्टीविषयी विचारणा केल्यावर आईकडे दोष ढकलला तितक्यावेळा बाईंनी तो खोडून काढला. मुलीची जबाबदारी फक्त आईचीच नाही तर तुमचीसुद्धा आहे हे वारंवार खडसावून सांगण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर या सर्व प्रकरणात जर तिचा दोष असेल तर तुमचाही आहे हेही सुनावलं. त्या पालकाने ते किती मनावर घेतलं ठाऊक नाही मात्र त्या घटनेनं एक गोष्ट लक्षात आली की, आपलं मूल लोकशाहीवादी बाईंच्या हातात आहे. घरात लोकशाही आणि समता असावी असा विचार ज्या बाई करत होत्या त्यांच्या शिकवणीतून मुलाची शैक्षणिक पायाभरणी होणार आहे याचं समाधान वाटत होतं.

First Published on: November 10, 2019 5:10 AM
Exit mobile version