कवी हणमंत नरहर जोशी

कवी हणमंत नरहर जोशी

हणमंत नरहर जोशी, अर्थात ‘काव्यतीर्थ’ कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी सांगली जिल्ह्यातील औदुंबर गावी झाला. ते नामवंत कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. इ.स. १९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. सुधांशूंना एकदा रा.अ. कुंभोजकर यांनी ‘तुम्ही कवी कसे झालात?’ असे विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘मी दोन मातांच्यामुळे कवी झालो.

एक माझी जन्मदात्री माऊली आणि दुसरी कृष्णामाई. एकीने माझ्या अंत:करणात कवितेची बीजे रुजवली आणि दुसरीने आपल्या निर्मलतेने आणि समृद्धीने मला काव्यदृष्टी दिली. ‘सुधांशूंच्या गीतदत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले. भारत गायन समाजात आणि नंतर अन्यत्र पुण्यात झालेल्या कार्यक्रमांना मास्टर कृष्णराव, श्री (ना.र.)मारुलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा. द. खेर, सरदार आबासाहेब मुजुमदार यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती.

कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी स्वातंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. त्यांच्या घरी काही भूमिगत स्वातंत्र्यसैनिक एकदोन दिवसांसाठी गुप्तपणे मुक्कामासाठी राहून जात. गावकर्‍यांच्या कवी सुधांशूंवर असलेल्या अतूट प्रेमामुळे ही बातमी पोलिसांपर्यंत कधीच पोहोचली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. इ.स.१९६० मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५ पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला. कवी सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत.

औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९पासून सदानंद साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणार्‍या या सदानंद साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील साहित्यरसिक येतात. कवी सुधांशूंना शंकराचार्यांकडून काव्यतीर्थ ही पदवी मिळाली. भारत सरकारकडून १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. मराठी साहित्य परिषदेकडून त्यांना कवी यशवंत पुरस्कार मिळाला. एका विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवीही त्यांना मिळाली. सांगलीकरांकडून सांगलीभूषण हा महत्वाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. अशा या महान कवीचे १८ सप्टेंबर २००६ रोजी निधन झाले.

First Published on: April 6, 2021 3:45 AM
Exit mobile version