आरोग्य संपदा त्याला मिळे

आरोग्य संपदा त्याला मिळे

आरोग्य

समर्थ रामदासांनी प्रभाते मनी राम चिंतीत जावा ! असे म्हटले आहे. अभ्यास करुनही लक्षात रहात नाही अशी तक्रार असणार्‍या विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता साधण्यासाठी रात्री जागरण करुन अभ्यास करण्यापेक्षा पहाटे लवकर उठून अभ्यास करावा. तसेच हा काळ शारीरिक दृष्ठ्या वातदोषाचा काळ असल्याने मल-मूत्र या नैसर्गिक संवेदनांची जाणीव व त्यांचे उत्सर्जन या काळात होते. म्हणूनच लवकर निजे लवकर उठे, आरोग्य संपदा त्याला मिळे! असे म्हटले जाते.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रमाण हे वैद्यक विश्वापुढील मोठे आव्हान आहे. संपूर्ण जगभर आज प्रिव्हेंटिव्ह मेडिसीनचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आयुर्वेदासारख्या द्रष्ठ्या शास्त्राने भविष्यातील स्वास्थ्य रक्षणाचे महत्त्व ओळखले होते. म्हणूनच स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य व्याधि परिमोक्ष:। हे आयुर्वेद शास्त्राचे मुख्य प्रयोजन सांगताना आतुरस्य व्याधि परिमोक्ष:म्हणजे रोगी व्यक्तीच्या रोगाचा नाश करुन त्याला निरोगी बनविणे यापेक्षा स्वस्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम् म्हणजे स्वस्थ वा निरोगी व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवणे याला अग्रक्रम देण्यात आला.

आरोग्यरक्षणासाठी आयुर्वेदाने दिनचर्या, त्रतुचर्या, संतुलित आहार, आहारसेवनाचे नियम,योग्य विहार, मानसिक स्वास्थ्य इ.मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत. या सूत्रांपैकी आजच्या या लेखात आपण दिनचर्येबाबत जाणून घेणार आहोत.

दिनचर्याम्हणजे निरोगी व्यक्तीने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे याबाबतच्या नियमांचे वेळापत्रक. दिनचर्येमध्ये सर्वसाधारणपणे प्रातरुत्थान (पहाटे लवकर उठणे), शौचविधी, दंतधावन, जिव्हा – निर्लेखन, अंजन, नस्य, धूमपान, अभ्यंग, व्यायाम, उद्वर्तन, स्नान, आहार, व्यवसाय व रात्रिचर्या असा क्रम आढळतो.

आयुर्वेदाने, मनुष्याने ब्राह्म मुहुर्तावर उठावे असे सांगितले आहे. ब्राह्म मुहूर्तम्हणजे रात्रीचा शेवटचा भाग किंवा सूर्योदयापूर्वी दोन घटका होय. सध्याच्या घड्याळानुसार, पहाटे साडेचार ते साडेपाच हा काळ ब्राह्म मुहूर्त मानायला हरकत नाही. रात्री उशिरापर्यंत टी. व्ही. पहाणे, जागरण करणे या गोष्टी टाळून लवकर झोपल्यास पहाटे लवकर जाग येते. रात्रभर शरीराला व मनाला विश्रांती मिळाल्यामुळे पहाटे लवकर उठल्यावर शरीर व मन प्रसन्न व ताजेतवाने असते. हा काळ ब्राह्म किंवा ईश्वर साधनेसाठी अतिशय योग्य सांगितला आहे. म्हणूनच समर्थ रामदासांनी प्रभाते मनी राम चिंतीत जावा ! असे म्हटले आहे. अभ्यास करुनही लक्षात रहात नाही अशी तक्रार असणार्‍या विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता साधण्यासाठी रात्री जागरण करुन अभ्यास करण्यापेक्षा पहाटे लवकर उठून अभ्यास करावा. तसेच हा काळ शारीरिक दृष्ठ्या वातदोषाचा काळ असल्याने मल-मूत्र या नैसर्गिक संवेदनांची जाणीव व त्यांचे उत्सर्जन या काळात होते. म्हणूनच लवकर निजे लवकर उठे, आरोग्य – संपदा त्याला मिळे! असे म्हटले जाते.

आदल्या दिवशी सेवन केलेल्या अन्नाचे पचन झाले असल्यास दुसर्‍या दिवशी योग्यवेळी मलविसर्जनाची संवेदना येते. मलप्रवृत्तीचा वेग आल्यावर तो कोणत्याही कारणाने अडवू नये. तसेच वेग आला नसतानाही कुंथून वा जोर देऊन मलप्रवृत्ती करु नये. यानंतर हात-पाय-तोंड स्वच्छ पाण्याने धुवून दात बळकट व निरोगी ठेवण्यासाठी कडू-तुरट चवीच्या बकुळ, खदिर (कात), कडुनिंब अशा औषधांच्या वस्त्रगाळ चूर्णाने दात घासावेत याला दंतधावन म्हणतात. सकाळचा काळ हा कफदोषाचा काळ असल्याने तसेच रात्री निद्रावस्थेत तोंडात चिकट कफ साठत असल्याने दंतधावनासाठी कफाचा नाश करणार्‍या कडू-तुरट चवीच्या औषधांनी दंतधावन करणे हितकर असते. त्रिफळा चूर्ण वा त्रिकटू चूर्ण याचाही दंतमंजनासाठी वापर करता येतो. नियमित दंतधावनामुळे मुखाची दुर्गंधी व अरुची नाहीशी होते. यानंतर जिव्हा-निर्लेखन म्हणजेच सोने, चांदी, तांबे इ. धातूच्या पट्टीने जीभ घासावी. हल्ली बाजारात मिळणार्‍या टंग क्लिनरचा देखील जीभ घासण्यासाठी वापर करता येतो. जीभ घासल्यानंतर कोमट पाण्याने चुळा भराव्यात. यामुळे जीभेवर साठलेला कफाचा चिकटा निघून जातो. दंतधावन व जिव्हा – निर्लेखन या उपक्रमांमुळे मुखाचे आरोग्य राखले जाते.

यानंतरचा दिनचर्येतील उपक्रम म्हणजे डोळ्यांचे स्वास्थ्य सांभाळणारा अंजन उपक्रम. आपल्याकडे पूर्वीपासून लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घालण्याची व स्त्रियांनी सौंदर्यप्रसाधन म्हणून काजळ घालण्याची प्रथा आहे. आपण व्यवहारात रोज घरगुती तयार केलेले काजळ अंजनासाठी वापरु शकतो. निरांजनात साजूक तूपाची वात लावून त्याच्या ज्योतीपासून निघालेली काजळी चांदीच्या वा तांब्याच्या ताम्हनावर धरुन घरगुती काजळ बनविता येते. साजूक तूपाऐवजी गाईच्या तूपाचा किंवा एरंडेल तेलाचाही वापर करता येतो. अशाप्रकारे घरगुती पद्धतीने तयार केलेले काजळ चांदीच्या डबीत भरुन रोज स्वच्छ हाताने लावल्यास डोळ्यांना उन व वारा यांचा त्रास होत नाही. डोळे सुंदर होतात व दृष्टी सूक्ष्म होते. डोळ्यांची आग व चिकटपणा नाहीसा होतो. विशेषत: कॉम्प्युटरवर काम करणार्‍यांनी नियमित अंजन केल्यास डोळ्यावरील ताण कमी होतो.

अंजनानंतर नस्यकर्म करावे. नस्य म्हणजे नाकात औषधांचे थेंब घालणे. नाकात योग्य प्रकारे घातलेले औषध मेंदूपर्यंत पोहोचते. नस्यासाठी तीळतेल, अणूतेल किंवा साजूक तूपाचा वापर करावा. खांद्याच्या खाली उशी ठेवून, डोके कलते राहील व नासा मार्ग सरळ रेषेत राहील याची खात्री करुन प्रत्येक नाकपुडीत तेलाचे वा तूपाचे २-२ थेंब घालावेत. रोज नस्यकर्म करणे शक्य नसल्यास नाकपुडीच्या आतल्या बाजूने तूपाचा वा तेलाचे बोट फिरवावे. हल्ली केस गळणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे या तक्रारींसाठी महागडे उपचार घेतले जातात. याऐवजी नियमित नस्य केल्यास या तक्रारी निश्चितपणे दूर होतात. अ‍ॅलर्जीटिक सर्दी देखील बर्‍याच अंशी दूर होते. रोज नस्य केल्यास शरीरातील सर्व इंद्रिये कार्यक्षम होतात. स्मरणशक्ती वाढते. यानंतरचे दिनचर्येतील उपक्रम जाणून घेऊया पुढील लेखात.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे.

First Published on: February 17, 2019 4:49 AM
Exit mobile version