जाणून घ्या शरयू नदीचे महत्त्व आणि इतिहास

जाणून घ्या शरयू नदीचे महत्त्व आणि इतिहास

अयोध्येतील शरयू नदीचा तट

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आज शरयू नदीच्या घाटावर महाआरती करणार आहेत. त्यामुळे शरयू नदी आणि आसपासचा परिसर आज गर्दीने फुलून जाणार, हे नक्कीच. कालपासूनच नदीच्या तीरावर पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली आहे. तर शिवसैनिकांनी नदीचा परिसर भगव्या रंगाच्या झेंड्यांनी रंगवून टाकला आहे. असं म्हणतात की रामजन्मभूमी आणि राम मंदिराच्या निर्माण आंदोलनात या नदीचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. चला तर जाणून घेऊया या नदीचा इतिहास…

पुराणामध्ये अयोध्येला जसे महत्त्व आहे. तसेच महत्त्व शरयू नदीचेही आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. अनेक ऐतिहासिक शहरे ही नदीकिनारीच वसलेली होती. भारतात गंगा-यमुना आणि गोदावरीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ते शरयूचे देखील आहे. असे म्हटले जाते की, भगवान रामाची माता कौशल्या या शरयू नदीवर स्नान करण्यासाठी येत होत्या. तसेच दशरथ यांनी आपल्याला पुत्र व्हावा यासाठी शरयू मातेला साकडे घातले होते आणि त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळेच कार्तिकी पोर्णिमेला अनेक भक्त शरयू नदीत स्नान करण्यासाठी येत असतात.

शरयू नदीचे उगमस्थान हे मानसरोवर येथे असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता ही नदी उत्तर प्रदेशच्या लखीमपुरी जिल्ह्यातील सिंगाहीच्या जंगलातून वाहत वाहत अयोध्या नगरीत वाहत येते. वाल्मिकी रामायणाच्या २४ व्या अध्यायात या नदीचे वर्णन लिहिलेले आहे, मात्र बदलत्या भौगोलिक परिस्थितीमुळे या नदीवर संकट ओढवलेले आहे. वामन, ब्रह्म आणि वायुपुराणात गंगा, यमुना, गोमती, शरयू आणि शारदा नद्यांची माहिती देताना सांगितले आहे की, या नद्या हिमालयातून उगम पावतात. शरयूचा प्रवाह कैलास मानसरोवर येथून कधी बंद झाला, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही.

शरयूची लांबी १६० किमी आहे.

पुराणकथांमध्ये शरयू, घाघरा आणि शारदा या नद्यांचा त्रिवेण संगम होत असल्याचा उल्लेख आढळतो. असे म्हटले जाते की रामाचे पुर्वजांनी शरयू आणि गंगा नदीचा संगम केला होता. मात्र पुराणात असंही म्हटलं आहे की, शरयूचा उगम विष्णूच्या नेत्रातून झाला. भगवान विष्णूने मत्स्य रुप धारण करुन दैत्याचा वध केला आणि ब्रह्माला वेद पुन्हा हस्तांतरित केले. त्यावेळी भगवान विष्णूच्या डोळयांमधून आनंदाश्रू ओघळले. ब्रह्माने या अश्रूंचे जतन करत ते मानसरोवरात टाकले. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रवाहाला शरयू नदी असे म्हटले गेले.

ऐतिहासिकदृष्ट्या या नदीचे महत्त्व असले तरी आता मात्र नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. रामायणानुसार भगवान राम यांनी याच नदीत जलसमाधी घेतली होती. पुर्वी ही नदी गोंडा तालुक्यात वाहत वाहत घाघरा नदीला जाऊन मिळत होती. पण आता त्याठिकाणी धरण बांधल्यामुळे शरयू आठ किमी पुढे वाहत जाऊन चंदापूर याठिकाणी घाघराला मिळते. अयोध्येपर्यंत या नदीला शरयू नदी म्हटले जाते, त्यानंतर मात्र ही घाघरा नदी म्हणून ओळखली जाते.

First Published on: November 24, 2018 11:43 AM
Exit mobile version