घरकाम आणि पितृसत्ता

घरकाम आणि पितृसत्ता

दिवाळी आली, गेली. त्याआधी निवडणूक आली होती, ती मात्र जिथे जायला हवी होती तिथे पोहोचलीच नाही. आपल्या राज्यातील सर्व नागरिकांनी आपलेवाले निवडले होते; पण ते त्यांचे कर्तृत्व दाखवण्याआधीच त्यांचा खेळ संपवला गेला. लोकशाहीत लोक धर्म वेडे, जात वेडे, जाहिरात वेडे, सत्ता वेडे, खोट्याचे वेडे होतात तेव्हा त्या देशावर हीच वेळ येते. स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून जीवाचे रान केलेल्या सावित्रीबाई यांच्या नावाने आता एक विद्यापीठ आहे आणि त्या वेळच्या तुलनेने आता शेकडो स्त्रिया शिकायला लागल्या आहेत. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडतो असं म्हणणार्‍या काही शिकलेल्या स्त्रिया आहेत आणि त्या गावभर तशी भाषण देत फिरत आहेत आणि टाळ्याही घेत आहेत; पण त्यांचे बोलणे मनोरंजनापुरतेच लोक ऐकत आहेत. त्यांचे म्हणणे लोक तंतोतंत अंमलात आणत नाहीत हा एक फार मोठा आशावाद मला दिसत आहे.

धर्मशास्त्राप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला येणारा संक्रांत हा सण दरवर्षी कोणाच्या ना कोणाच्या नावाने असतो. म्हणजे आपण म्हणतो ना या वेळेची संक्रांत कोणावर आहे? मग पंचांगवाले ते जाहीर करतात. मग अशा लोकांना ती संक्रांत धोक्याची असते म्हणे. तसं आता सर्व सणांचे व्हायला लागले आहे. आता सण आला आहे हे आपल्याला माध्यमांमुळे समजते. मार्केटमध्ये त्या त्या सणाच्या गरजेनुसार लागणार्‍या वस्तू ढिगाने दिसायला लागतात, त्या वस्तूंच्या जाहिराती जास्त यायला लागतात की, आपल्याला कळते की, आता हा सण आला आहे. मग मार्केट दाखवेल त्याप्रमाणे आपण वस्तू विकत घ्यायला लागतो किंवा तसेच वागायला लागतो. उदा. पूर्वी दिवाळीच्या फराळासाठी लागणार्‍या सर्व खाद्य पदार्थांसाठीच्या वस्तू घरी आणून घरीच सर्व फराळाचे पदार्थ बनवले जायचे. आता सर्व दुकानात सर्व प्रकारचे फराळाचे पदार्थ अतिशय उत्कृष्ट चवीचे, काळजीने बनवलेले, सर्व शास्त्र पाळून केलेले उपलब्ध आहेत. त्यामुळे काही घरात पूजेपुरते पदार्थ घरात होतात बाकी सर्व विकत आणून खाल्ले जातात. पूर्वी घरातल्याच बाईने रात्र रात्रभर जागून पदार्थ करणे कसे आवश्यक आहे, तरच देव पावतो अशा अनेक खोट्या स्टोर्‍या तयार केलेल्या होत्या आणि आमच्या बायाही त्यावर विश्वास ठेवून दिवसभर घरातली इतर साफसफाईची कामे करून रात्रीच्या पदार्थ बनवत असत. अर्थात काही घरात तळण्यासाठी किंवा चकल्या काढून देण्यासाठी घरातले पुरुष मदत करायचे. पण आता बायांना कळले आहे की, देवाला फराळातलं काहीही फरक कळत नाही. त्यामुळे बाय आता बिनधास्त ओळखीच्या बाई शोधतात किंवा आता कॉलनीत असे पदार्थ बनवून देणार्‍यांची टीम येते. ते मोठे चूलान लावतात आणि असे पदार्थ बनवून देतात. बायका आता पैसे कमवण्यासाठी बाहेर पडायला लागल्यानंतर जे जे बदल झाले त्यात हा मोठा सांस्कृतिक बदल झालेला दिसतो आहे.

नोकरी करणार्‍या स्त्रियांच्यामुळे आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे अशा घरांमध्ये कामवाली ताई/मावशी नावाची आणखी एक बाई घरात यायला लागली. आज आपण या ताई किंवा मावशी या कॅटगरीबद्दल बोलणार आहोत. तुम्ही म्हणाल हा काय विषय आहे जाहीर चर्चा करण्याचा? तर हो हा खूप गंभीर विषय आहे आणि तो जाहीर चर्चा करण्याचा विषय आहे. या दिवाळीत बर्‍याच कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये या कामवाली ताई किंवा मावशी यांचा समावेश केला होता. बरं हा समावेश फक्त नावापुरता नव्हता तर या वेळेच्या बर्‍याच जाहिरातींमध्ये ही ‘मावशी’ हेच मध्यवर्ती पात्र होतं. मी ज्या दोन तीन ब्रान्डच्या जाहिराती पहिल्या त्यातले ते श्रीमंत मालक स्त्री-पुरुष त्यांचे स्वतःचे घर दिवाळीसाठी अतिशय सुंदर सजवतात आणि त्यांच्या कडच्या मावशीचे घर अगदी तिच्या घरी जावून आवरुन सजवतात. मला या सर्व जाहिराती पाहून खोटं वागण्याची पण सीमा असते असे वाटायला लागले आहे. किती खोटं? अर्थात आपला कुटुंबप्रमुखच खोटं बोलण्यात मास्टर आहे तेव्हा आपण तर वारसा चालवणारच ना! मला मात्र खूप त्रास झाला आणि तो जाहीर व्यक्त करायचा मी ठरवला आहे म्हणून हा सर्व प्रपंच. पहिली जाहिरात तर आपल्या प्रमुखानेच केली ती म्हणजे सफाई कामगारांना बोलावून त्यांचे पाय धुण्याची. ती जाहिरात पहिल्यापासून आपल्या सर्वांमध्ये ‘भूमिका आणि जबाबदारी’ यांच्यात खूप घोळ आहे असे मला जाणवायला लागले आहे. सफाई कामगारांची आपल्याला एवढी काळजी वाटते तर त्यांचे वेतन योग्य असावे, त्यांना कामात सुरक्षेचे सर्व सामान नक्की मिळेल याची काळजी घेतली जावी, वेतन वेळेवर मिळेल याची व्यवस्था करावी, त्यांची मुलं शिकतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या कामाच्या सीनियारीटीप्रमाणे त्यांना पदोन्नती मिळते की, नाही याची खबरदारी घेतली जावी. पण नाही आपण इतके खोटारडे आहोत आणि नाटक करण्यात तर आपला कोणी हातच धरू शकत नाही. एक दिवस ‘बैल पोळा’ साजरा करायचा म्हणजे बाकीचे दिवस जू ला बांधायला आपण मोकळे. ‘मावशी’ च्या घरातही जाऊन दिवाळीची रोषणाई करणारे पुरुष पाहिल्या नंतर माझ्या मनात अनेक प्रश्न आलेत ते तुमच्यासमोर मांडते.

पहिला प्रश्न असे घरात बायकोला मदत करून वरतून मोलकरणीच्या घरातही रोषणाई करायला जाणारे पुरुष/ नवरे/ पतीदेव भारत नावाच्या जगाच्या पाठीवर राहतात तरी कुठे? सणाला घरात वाद नको म्हणून बायका एकदा म्हणतात, अहो जरा मदत कराल का? मिळालीच अशी मदत तर जेवढी पदरात पडेल तेवढी घेतात. पण तिकडून जोरात आवाज आला, काय म्हणालीस? तर बायका जणू आधी काही बोलल्याच नव्हत्या अशा गप्प बसून घेतात. बर्‍याच घरातल्या बाया मग या मोलकरणी मावशीलाच थोडे पैसे देऊन, तिच्या वेळा सांभाळत कामे आटोपतात. त्याही पुढे जाऊन मला प्रश्न आहे की, एवढी त्या मावशीची काळजी वाटते तर तिला किमान वेतन द्या ना. कळण्यासाठी उदाहरण देते की एका तासाच्या घरगुती कामासाठी ४५ रु. दिले पाहिजे असे कायदा म्हणतो, म्हणजे ती मावशी आपल्याकडे रोज दोन तास काम करीत असेल तर किमान तिला २७०० रुपये महिना मिळायला हवेत तर आम्ही किती देतो हजार रुपये किंवा पंधराशे रुपये. एक दिवसाचे नाटक करण्यापेक्षा तिला तिचा हक्काचा पगार द्याना म्हणजे तिची ती घरात रोषणाई करू शकेल. दुसरं कायम एक नोबेल चर्चा असते ती म्हणजे आम्ही तिला आम्ही जे खातो तेच देतो. या वाक्याची सत्यता पडताळायचा प्रयत्न केला तर लक्षात आले की, जेव्हा आमचे स्वयंपाक करण्यात काहीतरी गणित चुकते म्हणजे पाहुणे आले होते म्हणून थोडा जास्तीचा स्वयंपाक केला होता; पण तो सगळा संपला नाही की, दे मावशीला. लेकरांना घरात केलेली भाजी आवडली नाही की, ते घरात जेवत नाही किंवा कमी जेवतात मग ती उरलेली भाजी काय करायची तर दे मावशीला. बरं आपण विचारायची तसदी घेत नाही की, तुला देऊ का? आपण तिला निरोप देतो जाताना भाजी घेऊन जाशील, विषय संपला.

या सर्व मावशा इतक्या गरीब कुटुंबातून आलेल्या असतात की, त्यांना त्यांच्या त्यांच्या घरात बोलायची भीती वाटते तर आपल्या घरात बोलणे म्हणजे फारच अवघड गोष्ट असते. त्या परिस्थितीने इतक्या गांजलेल्या असतात की, आपण त्यांना काम दिले म्हणजे जणू उपकारच केले अशी त्यांची भावना असते आणि आपणही हा माहौल तसाच तयार करतो आणि तिला उपकाराच्या खाली दाबून ठेवतो. मग कधीतरी तिच्या पोरांची शाळेची फी भर, आपल्या पोरांच्या दप्तराच्या बॅगा तिच्या पोरींना/पोरांना दे, कपडे दे. या सर्व गोष्टींमुळे तिला आपण म्हणजे परमेश्वराचे अवतार वाटत असतो. मग ती गुमान ते उरलेले जेवण, आपल्याला नको असलेले कपडे, चपला, आपल्या घरातल्या वस्तू घेऊन जाते. त्यात बहुतेकीचा नवरा दारू पिणारा, हिला मारणारा त्यामुळे काहीही झालं तरी त्यांना हे काम, आपल्या घरासारखे सतत देणारे कुटुंब हवेच असतात. काही घरातून तर तिचे दु:खही ऐकले जाते, तिला मानसिक आधार दिला जातो. या सर्व गोष्टींमुळे तिला अशी कुटुंब म्हणजे एक मोठा आधारच वाटत असतो.

माझं या मावशींच्या बाबतीत आणखी एक निरीक्षण आहे ते म्हणजे या मावशा त्या त्या घरातली पुरुषसत्ता/ पितृसत्ता नकळत टिकवत असतात, जी तोडण्यासाठी त्या घरातल्या बाईने या मावशी नावाच्या मदतनीसला घरात आणलेले असते. घरातल्या बाईला मदत म्हणून या मावशीचे घरात आगमन होते. जेव्हा कामाचे ठरते तेव्हा घरातली बाई फक्त धुणीभांडी, झाडू फरशी एवढंच काम सांगते. मग कधीतरी जरा भाजी निवडून दे गं, आज जरा प्लीज लसूण सोलून दे, आज जरा सायबाना/ दादा/ ताईला चहा दे, किंवा जरा नाश्ता वाढून दे अशी सुरुवात होते. मावशीही विचार करते जावू दे चांगलं घर आहे, आल्या आल्या चहा देतात, बरोबर बसून चहा प्यायला देतात. सर्वांचे कप सारखेच आहे म्हणून करतात त्या मदत, पण पुढे जाऊन हळूहळू हे त्या मावशीच्या कामाच्या यादीतच जाऊन बसत. मग त्या घरातल्या ताई/ दादाचे अंथरून उचलण्यापासून तर ताई/ दादाला नाश्ता देण्यापर्यंतची सर्व छोटी छोटी कामे हळूच मावशीच्या खात्यावर जमा होतात. काम केल्याने माणूस काही कमी होत नाही या ‘उपकार पॉलिसी वचना वर’ या मावशींचा जाम विश्वास असतो. त्यामुळे त्यांना कोणी त्यांच्या अधिकारासाठी जागृत करायला गेलं तरी त्या शोषण ज्यांच्याकडून होतं त्यांच्याच बाजूने बोलतात, असे लक्षात आले. परवा एका मैत्रिणीकडे गेले होते. सुखवस्तू घरातली ही बाई मला जरा नर्व्हस वाटली म्हणून ‘काय झालं गं’ विचारलं तर म्हणाली की, अगं घरी कामासाठी येणार्‍या मावशी इतकं माझ्या मुलाच्या आणि नवर्‍याच्या पुढे पुढे करतात की त्यांना कसं थांबवावं हेच समजत नाही. मावशींच्यामुळे दोघेही इतके आळशी बनले आहेत की, विचारु नकोस. मी त्यांना किमान त्यांनी स्वतःचे आतले कपडे स्वतः धुवावेत, त्यांनीच ते वाळतही टाकावेत, स्वतःचा चहा नाश्ता स्वतः वाढून घ्यावा असे सर्व सांगते. यात नवर्‍याचे आयुष्य संपले आहे; पण मुलाचे सर्व आयुष्य जायचे आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात स्वावलंबी झाला नाही तर टिकेल कसा? म्हणून बोलते आणि मावशी मात्र हे सर्व सहज हातात देतात त्यामुळे त्यांना मी म्हणजे दुश्मन आणि मावशी म्हणजेच सर्वकाही असे वातावरण घरात तयार झाले आहे. यावेळेस मावशी त्यांच्या एका महत्त्वाच्या कामासाठी पंधरा दिवस रजेवर होत्या. त्याचं काम फारच महत्त्वाचं होतं म्हणून मी ही कुरकुर केली नाही; पण त्या तिकडून आल्यानंतर एका एकदम फालतू कामासाठी रजा मागत होत्या तर मी नाही म्हणाले आणि त्या कामासाठी रजा घेऊन तुमचा वेळ आणि एनर्जी वाया घालवू नका हे मी त्यांना सांगितले. त्यांनाही ते पटले आणि मी रजा घेणार नाही असे त्या म्हणाल्या आणि कामे आवरुन गेल्या. घडलेली घटना नवर्‍याला सांगितली तर त्याची प्रतिक्रिया, ‘ए बाई मावशीना काही बोलू नकोस हं, तिने काम सोडलं तर दुसरी मावशी शोधणे फारच अडचणीचे होईल.

तीस वर्षांपूर्वी आम्ही पुण्याला एका संस्थेचे काम पाहण्यासाठी गेलो होतो. ही संस्था स्त्रियांना प्रशिक्षित करायची ‘घरकामासाठी आणि पेशंट सांभाळणारी आया तयार करण्यासाठी’. माझ्या आठवणीप्रमाणे दाते नावाच्या बाई त्याच्या प्रमुख होत्या. तीस वर्षांपूर्वी या बाईंनी या प्रशिक्षित स्त्रियांना युनिफॉर्म दिला होता जो कामासाठी सोयीचा असेल आणि त्या स्त्रियांना परवडेलही. त्यांनी नियम केला होता की, ज्या घरात तुम्ही कामासाठी जात आहात तिथले पाणी पण पिऊ नका. स्वतःचे पाणी, जेवण घेऊन जात जा. या स्त्रियांना आठवड्याला एक सुट्टी असायची त्या दिवशी त्या घरी मात्र कोणी ना कोणी कामासाठी जायचेच. म्हणजे दोन्ही लोकांना फायदा. कामाच्या वेळा ठरलेल्या होत्या. त्यापेक्षा कमी वेळ बाईने काम केले तर तिचे पैसे कट व्हायचे. संस्थेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कामवाल्या बाईला जास्तीचे काम देताच यायचे नाही किंवा जास्ती वेळ घरी ठेवताच यायचे नाही.

माझ्या मैत्रिणीकडे झाले तसे बर्‍याच घरात होताना मी पाहते आहे. मावशीच्या भोवती घर फिरतेय असं दिसते आहे; पण त्याचा तिच्या मोबदल्यावर काहीही सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. पण या मावशा म्हणजे घरातल्या पुरुषांचे लाड करणारी अजून एक दुबळ्या बायांची यंत्रणा बनली आहे. साहेबांनी चहा उच्चार करण्याचा उशीर की, मावशी घाईघाईने बनवून द्यायला तयार. माझ्या या मैत्रिणीचा किस्सा मी आमच्या मिटिंगमध्ये सांगत होते तर माझा मुंबईला काम करणारा एक सहकारीही आलेला होता आणि त्याने याला मान्य करत स्वतःच्या घरातला एक अनुभव सांगितला. तो आणि त्याची जीवनसाथी दोघेही नोकरी करतात. जेव्हा जेव्हा हा दौर्‍यावर असतो तेव्हा तेव्हा ती त्यांच्या घरातील स्वयंपाक करणारी ताई घरात बाकीच्यांसाठी वरण भात किंवा फक्त खिचडी बनवणार, पण जेव्हा जेव्हा हा घरात असतो तेव्हा तेव्हा ती ताई साग्रसंगीत सर्व स्वयंपाक करणार. याचा अर्थ तिचं आणि याचं काही वेगळंच चालू आहे असं नाही, पण जे सर्व मावशांना वाटते ते त्या ताईला वाटतं की, हा पुरुष म्हणजे घरातला सर्व करता धरता आहे याला दुखवता कामा नये. घरातली बाई काय आपल्या सारखीच एक कष्टकरी आहे तिला थोडं कमी-जास्त झाले तरी चालेल; पण याला काही कमी पडता कामा नये. म्हणून तर म्हणाले, घरकामासाठी आलेली एक बाई बाईची मदतनीस व्हायच्या ऐवजी पितृसत्तेची पालक झाली.

– अनिता पगारे.

First Published on: November 24, 2019 3:05 AM
Exit mobile version