ट्रेकिंगच्या जगात…

ट्रेकिंगच्या जगात…

ट्रेकिंग (सौजन्य - इंडियाहाईक्स)

पावसाळा सुरू झाला की, सर्वात जास्त योजना आखल्या जातात त्या ट्रेकिंगच्या. रायगड, ठोसेघर, राजमाची, कोंढाणेलेणी, आंबोली, कास, कात्रज, सिंहगड, नाणेघाट, हरिश्चंद्रगड ही ट्रेकर्सची काही आवडीची ठिकाणे. पावसाळ्यात ट्रेकिंग करणे हे जेवढे मजेचे तितकेच ते धोक्याचेही असते. पावसाळ्यात होणारे बहुतेक अपघात अतिआत्मविश्वास किंवा परिसराचे नसलेले भौगोलिक ज्ञान या गोष्टींमुळे होतात. त्यामुळे स्वतःला आणि इतरांनाही सांभाळायचे असेल तर ट्रेकिंगला जाताना सर्व गोष्टींची योग्य माहिती असायला हवी. ट्रेकिंग करण्यासाठी नक्की काय आवश्यक असते आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल आपण जाणून घेऊया.

ट्रेकिंग म्हणजे नेमके काय?

निसर्गाच्या जास्त जवळ जाणे, आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांबद्दल अधिक जाणून घेणे, आपला इतिहास आणि निसर्ग नक्की कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रेकिंगचा उपयोग होतो. ट्रेकिंग करताना आपण निसर्गाच्या अधिक जवळ जात असतो. निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण करत असताना आपण त्यांची नोंद लेखी किंवा फोटोच्या रुपात करतो.

ट्रेकिंगला निघताना काय लक्षात ठेवावे?

⦁ आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घ्यावी. आपल्या आधी त्या ठिकाणी कोणी जाऊन आले असेल तर त्याच्याकडूनदेखील इत्यंभूत माहिती घ्यावी.
⦁ सोबत काय साहित्य घ्यायचे ते ठरवावे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत सोबत असलेल्या बॅगा आणि बाकीच्या वस्तू आपल्याच पाठीवर असणार आहेत याची योग्य ती कल्पना सहकार्‍यांना असावी.
⦁ प्रवासासाठी बस अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असल्यास वेळापत्रक ‘योग्य ऑथॉरिटीकडून’ व्यवस्थीत पडताळून घ्यावे. स्वतःचे वाहन असल्यास, योग्य तऱ्हेने त्याचे सर्व्हिसिंग झाले आहे की नाही हे तपासून घ्यावे.
⦁ निघण्यापासून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक आपल्याव्यतिरिक्त अन्य कोणत्यातरी व्यक्तीकडेदेखील देऊन ठेवावे. आपल्याकडून हरवल्यास, इतर कोणाकडे असल्यामुळे फजिती होणार नाही.

कोणत्या गोष्टी कायम बरोबर असाव्या?

ट्रेकिंगला जाताना काही गोष्टी कायम आपल्या बॅगमध्ये आवश्यक आहे. त्याशिवाय ट्रेकिंग पूर्ण होऊच शकत नाही.
१) उन्हापासून संरक्षण होईल अशी टोपी अथवा गॉगल (पावसाळा असला तरीही)
२) प्रवासात आणि ट्रेकिंग करताना पुरेल इतके पाणी
३) आवडते खाद्यपदार्थ
४) औषधे व फर्स्ट एड बॉक्स
५) स्वीस नाईफ
६) काडेपेटी किंवा लाईटर – काडेपेटी भिजून पटकन निरूपयोगी होवू शकते त्यामुळे लाईटरदेखील जवळ ठेवावे.
७) पिशव्या (आता प्लॅस्टिक बंदी आहे त्यामुळे कापडी पिशव्या ठेवल्या तरी चालतील)
८) खाली बसण्यासाठी अथवा कचरा गुंडाळण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे
९) जंगलामध्ये फिरताना जळू चिकटल्यास हळद हा एक उत्तम उपाय आहे. आणखी एक जालीम उपाय म्हणजे तंबाखू. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जवळ ठेवाव्यात.

ट्रेकला जाताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी

⦁ ट्रेकदरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. ही गोष्ट करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
⦁ ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग सॅक न्यावी. सॅक पाठीवर वागवताना ती शरीराच्या शक्य तितक्या जवळ असावी, यामुळे वजन जाणवत नाही आणि चालताना योग्य नियंत्रण राहते. ही सॅक आपल्या शरिराचा एक भाग होईल अशा प्रकारे सांभाळावी. सॅकला रेन कव्हरदेखील असावे.
⦁ ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग शूज अथवा सवयीचे असे मजबूत शूज असावेत. ट्रेकमधे चालताना पावलांजवळ तयार होणारी उष्णता तसेच घाम यामुळे पायाला त्रास होऊ शकतो. वेळोवेळी शूज आणि सॉक्स काढून पायांची शक्य तितकी काळजी घ्यावी.
⦁ ट्रेकदरम्यान भडक रंगाचे कपडे न घालता साध्या हलक्या रंगाचे कपडे असावेत. कपड्यांचे जादा जोड सोबत असावेत.
⦁ सहकारी शक्यतो नवीन परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देणाची तयारी असणारे असावेत. प्रसंगानुरूप जबाबदारीने वागणारे आणि सर्वतोपरी मदत करणारे सहकारी असावेत.
⦁ ट्रेकदरम्यान सोबत पाणी आणि अन्नपदार्थांचा भरपूर साठा सोबत बाळगावा.
⦁ जंगलातून चालताना चित्र विचित्र आवाज काढून प्राणी पक्ष्यांना त्रास देऊ नये.
⦁ ट्रेकदरम्यान अन्न शिजवताना चूल पेटवायची असल्यास अत्यंत काळजीपूर्वक हवे तितकेच वाळलेले लाकूड अथवा फांद्या तोडाव्यात. हे टाळता येणे शक्य असेल तर टाळावे.
⦁ होकायंत्र आणि नकाशे सोबत असावेत. आपण जाताना एखाद्या खुणेच्या आधाराने स्टार्टिंग पॉईंट व मार्ग बघून ठेवावा. गूगल मॅप्स, GPS वगैरे बाबींबर फारसे अवलंबून राहू नये कारण या यंत्राने, मोबाईलच्या रेंजने किंवा कनेक्टिवीटीने दगा दिला तर हेच आपल्याला योग्य दिशा मिळवून देतात.
⦁ आपल्याजवळ असलेले कॅमेरा अथवा मोबाईल हे साहित्य व्यवस्थित जपावे. कॅमेरा कव्हर अथवा मोबाईल कव्हर घालून मगच ट्रेकिंगसाठी निघावे.
⦁ ज्याप्रमाणे आपण पावसाळ्यात भटकंतीसाठी बाहेर पडतो, त्याचप्रमाणे अनेक सरपटणारे प्राणीदेखील बिळात पाणी शिरल्यामुळे बाहेर पडतात. त्यामुळे भटकंती करताना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात भटकंती करताना खासकरून जंगलातून किंवा चिखलातून जाताना जळवांचा त्रास होतो. अशावेळी पायाला मीठ लावावे.
⦁ पावसात भटकंती करा, पण भटकंती करत असताना स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या. भटकंती करताना संयम ठेवा. भटकंती करताना मला सर्व माहिती आहे, हा अतिआत्मविश्वास दाखवू नका. धबधबा अथवा पाण्याच्या ठिकाणी अतिआत्मविश्वासाने वावरू नका.
⦁ वाहनचालकांनी अनोळखी वळणांवर गाडी चालवताना काळजी घ्यावी. गाडी चालवताना केल्या जाणाऱ्या कसरती कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. वेळ वाचविण्यासाठी अथवा वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या उद्देशाने अनोळखी वाटांवर गाडी नेणे सर्वांसाठीच डोकेदुखी अथवा त्रासदायक ठरू शकते.

सर्वात जास्त ट्रेक करण्यात येणारी ठिकाणे

१. रायगड किल्ला – ट्रेकर्ससाठी रायगड हा सर्वात जवळचा किल्ला आहे. सर्वात अवघड आणि तितकाच अभ्यास करायला लावणारा असा हा किल्ला आहे. उंच आणि वरील बाजूस निमुळत्या होत गेलेल्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला होता. याच्या तिन्ही बाजूंनी असलेले खोरे याला सह्याद्री पर्वतापासून वेगळे करते. त्यामुळे हा किल्ला चढायला जरी कठीण असला तरी तो एकदा सर केला की, त्याचा आनंद अवर्णनीय आहे.
२. राजगड – राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. या किल्ल्याला शिवरायांच्यावेळी राजधानी समजले जात असे. अतिशय दुर्गम असल्यामुळे उत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून जागतिक पातळीवर राजगडचा गौरव केला जातो.
३. हरिश्‍चंद्रगड – या किल्ल्यासंदर्भात अनेक शौर्यगाथा, कथा प्रचलित आहेत. हा गड पावसाळ्यात चढायला जितका कठीण तितकाच ट्रेकर्सच्या तो आवडीचा आहे.
४. माळशेज घाट – पाऊस आणि माळशेज घाट हे समीकरणच आहे. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे. या सगळ्यातून मार्ग काढत ट्रेकिंग करण्याची मजाच और आहे.
५. कळसूबाई – नाशिकमधील कळसूबाई हेदेखील ट्रेकर्ससाठी चांगले ठिकाण आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक ट्रेकिंगचे ग्रुप इथे ट्रेकिंगसाठी येतात आणि ट्रेकिंगची मजा लुटतात.

First Published on: June 14, 2018 8:31 AM
Exit mobile version