पंख छाटले, आता उडणार कसे?

पंख छाटले, आता उडणार कसे?

एकीकडे सत्ताधार्‍यांविरोधात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रान पेटवत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने फडणवीस यांच्याच मर्जीतील नेत्यांची प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लावली. विधानसभा निवडणुकीनंतर ज्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती, ते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राज्य कार्यकारिणीतील मुख्य जबाबदारीपासून दोन हात लांबच ठेवण्यात आलेले दिसते. खडसे यांच्याकडे विशेष निमंत्रित म्हणून जबाबदारी देण्यात आली असली तरीही निर्णयप्रक्रियेत या पदाला फारसे महत्त्व नाही. असे असले तरी खडसेंऐवजी त्यांची सून रक्षा खडसे यांना कार्यकारिणीत स्थान देऊन नाथाभाऊंना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिलेला दिसतोय’. तर पंकजा मुंडेंऐवजी प्रितम मुंडे यांना कार्यकारिणीत स्थान देऊन सारवासारव करण्यात आली आहे.

पंकजा यांची केंद्रात ‘प्रतिष्ठापना’ करण्याची ग्वाही देत पक्ष आता वाद टाळण्याचा प्रयत्न होतोय; प्रत्यक्षात त्यांना कार्यकारिणीतून हद्दपार करून महाराष्ट्राच्या राजकारणातूनच ‘विसर्जित’ करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. पंकजा यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर फडणवीसांविरोधात मोर्चा उघडला होता. त्यांनी गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेत पक्षाला आव्हान दिले होते. विधानसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाचे खापर त्यांनी काही पदाधिकार्‍यांवर फोडले होते. एवढेच नाही तर यापुढील काम गोपीनाथ मुंडे फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारून त्यांनी पक्षालाच समांतर व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला. या बंडात पंकजा यांना एकनाथ खडसे यांची साथ लाभली. त्यामुळे आता पक्षाने सावध पवित्रा घेत ओबीसी समाजाचे नवे नेतृत्व उभे करून पंकजा यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या गळ्यात थेट प्रदेश सरचिटणीसपदाची माळ टाकण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष हा शेटजी आणि भटजींचा पक्ष आहे; ओबीसी समाज या पक्षाने जोडलेला नाही. त्यामुळे पक्षाला विस्तृत जनाधार मिळू शकला नाही, असे यापूर्वी वारंवार बोलले जायचे. याच पार्श्वभूमीवर माळी-धनगर आणि वंजारी समाजातील प्रमुख नेत्यांनी माधव पॅटर्नला जन्म दिला. त्याचा सकारात्मक परिणामही पक्षाला दिसून आला. या पॅटर्नमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व. ना. स. फरांदे यांनी. त्यांनी माधव पॅटर्नच्या माध्यमातून पक्षातील ओबीसींचे संघटन वाढवले. त्याचा दृश्य परिणामही पुढील काळात पक्षाच्या वाटचालीवर दिसून आला. आज मात्र पक्षाने या माधव पॅटर्नच्या शिलेदारांचेच वारसदार एकमेकांच्या समोर उभे केल्याचे चित्र दिसते आहे. मुंडेंची कन्या पंकजा यांना बाजूला सारताना ना. स. फरांदे यांच्या सुनबाई देवयानी फरांदे यांना काही महिन्यांपूर्वी प्रतोदपदी काम करण्याची संधी दिली.

राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले हे पद फरांदेंच्या पदरी अनपेक्षितपणे पडले. त्यानंतर सहाच महिन्यांच्या अवधीने त्यांना थेट प्रदेशाच्या सरचिटणीसपदी संधी देवून पक्षानं पंकजा मुंडे यांना ‘चेक’ दिलेला दिसतोय. या माध्यमातून ओबीसी नेत्यांची आमच्याकडे कमतरता नसल्याचा संदेशही पक्षाने मुंडेसह अन्य नाराज ओबीसी नेत्यांना दिल्याचे दिसते. याशिवाय माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपमध्ये महत्वाची भूमिका निभावणारे आशिष शेलार, आ. अतुल भातखळकर यांचा उपाध्यक्षांच्या यादीत समावेश अपेक्षित होता. मात्र, या नेत्यांचीही खडसेंप्रमाणेच विशेष निमंत्रित म्हणून बोळवण करण्यात आली. फडणवीस यांचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांनाही विशेष निमंत्रितांच्या यादीत टाकून खडसेंवरील अन्यायाचे काही प्रमाणात ‘परिमार्जन’ केलेले दिसते. महाजनांना चांगले पद दिले असते तर कदाचित खडसेंचा नाराजीचा बॉम्ब पुन्हा एकदा फुटला असता असा पक्षश्रेष्ठींना अंदाज होता. त्यातून महाजन यांना मोठ्या पदापासून दूर ठेवलेले दिसते.

पक्षात बंड केल्यास त्याचा परिणाम काय होतो हेदेखील प्रतिस्पर्ध्यांचे पंख छाटण्याच्या कृतीतून फडणवीसांनी दाखवून दिले आहे. परिणामी आता पंख छाटले गेलेल्या नेत्यांना उडण्याची चिंता लागून आहे. जुन्या नेत्यांना बाजूला सारत बाहेरच्या पक्षातून आलेल्या आयारामांचेही भाजपने चांगलेच लाड पुरवल्याचे कार्यकारिणीवरून दिसते. १२ नव्या उपाध्यक्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले प्रसाद लाड, कपिल पाटील, चित्रा वाघ आणि भारती पवार यांना चक्क उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. कार्यकारिणीच्या निमंत्रित यादीत ७९ सदस्य आहेत. त्यामध्येही आयारामांना अधिक स्थान आहे. त्यात कोल्हापूरचे धनंजय महाडिक, नगरचे वैभव पिचड, पालघरचे राजेंद्र गावित, सिंधुदुर्गचे नीलेश राणे, नवी मुंबईचे संजीव नाईक, सोलापूरचे लक्ष्मण ढोबळे, सातारचे मदन भोसले अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माजी नेत्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारीबाबत अन्याय होत असलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीची फारशी फिकीर न करता चिटणीसपदी नेमण्यात आले हेदेखील विशेष. बावनकुळे हे नाराज नेत्यांच्या टीममधील एक होते. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीसाठी वरिष्ठांकडून काही दबाव आला की काय याविषयी शंका उपस्थित होते.

जातीय आणि विभागीय संतुलन करण्याचा प्रयत्न या कार्यकारिणीत केल्याचेही बोलले गेले. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देणार्‍या काही जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच मिळालेले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही नेत्याला या कार्यकारिणीत संधी देण्यात आलेली नाही. खरेतर प्रदेश चिटणीस असणारे डॉ. विनय नातूंकडे उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने त्यांच्याऐवजी माजी आमदार बाळासाहेब माने यांना यावेळी प्रदेशवर संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यांनाही कार्यकारिणीत संधी देण्यात आलेली नाही. दुसरीकडे अहमदनगरसारख्या जिल्ह्याला भरभरून मिळाले आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना यात चांगले स्थान मिळाले आहे. तसेच, कार्यकारिणी सदस्यांमध्ये भानुदास बुरड, निमंत्रित सदस्यपदी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, चंद्रशेखर कदम तसेच विशेष निमंत्रित समितीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड यांचीही नियुक्ती झाली आहे. मात्र, अडीच तप आमदार असलेले आणि राजकारणातील मुरब्बी म्हणून ओळख असलेले माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना कार्यकारिणीपासून दूर ठेवण्यात आले आहे.

नाशिकमधील काही नेत्यांना महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आले आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांना निमंत्रितांच्या यादीत टाकण्यात आले आहे. याशिवाय मनसेतून भाजपात प्रवेशित झालेले माजी आमदार वसंत गिते आणि शिवसेनेतून भाजपात आलेले सुनील बागूल या दोघांकडील प्रदेश उपाध्यक्षपद काढून त्यांना निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले आहे. एकूणचे ‘कहीं खुशी, कही गम’ असं वातावरण या नव्या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर झाले आहे. वाटेतील अडथळे दूर करत आपली नवी फौज घेऊन फडणवीस आता सत्ताधार्‍यांवर तुटून पडण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाकाळात महाविकास आघाडीची कामगिरी फारशी समाधानकारक असल्याचे दिसत नाही. त्याचाच फायदा घेत आता विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांवर फडणवीसांची नवी फौज तुटून पडेल यात शंकाच नाही. त्यासाठी फडणवीसांनी कोरोनाकाळातही वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दौरे करणे सुरू केले आहे. विरोधी पक्षाला बळकट करण्यासाठी या प्रभावी चाली आहेत, यात शंकाच नाही!

First Published on: July 6, 2020 8:02 PM
Exit mobile version