जखमी संघ जिंकेलच कसा ?

जखमी संघ जिंकेलच कसा ?

प्रो - कबड्डी

या सामन्यात महाराष्ट्राचे खेळाडू गतविजेज्याप्रमाणे खेळताना दिसलेच नाही.आक्रमकताही नव्हती. महाराष्ट्राचा संघ बचावात्मक खेळत होता हे त्यांच्या देहबोलीतूनच दिसून येत होते. महाराष्ट्राचे बहुतेक खेळाडू प्रो -कबड्डीत खेळत होते. त्यामुळे ते थकले होते, असे सांगितले जात आहे. ही लंगडी सबब आहे. इतरही राज्यांतील खेळाडू देखील प्रो – कबड्डीत खेळत होते. उत्तरप्रदेश, हरियाणा, रेल्वे, सेनादल या संघातील खेळाडू देखील प्रो – कबड्डी स्पर्धेत खेळूनच राष्ट्रीय स्पर्धेसाठी आले होते. परंतु ते कुठेही थकलेले दिसले नाहीत. राहूल चौधरी, प्रदीप नरवाल, धर्मराज चेरलाथन, पवनकुमार शेरावत, मोनू गोयल हे खेळाडू प्रो – कबड्डीत खेळाले. त्याच जोशाने ते राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळताना दिसत होते.

रोहा येथे झालेल्या 66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आपल्या घरच्या मैदानात खेळताना महाराष्ट्राचा संघ विजेतेपद मिळवले अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. महाराष्ट्राचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. महाराष्ट्राच्या गटात विदर्भ व गुजराज हे तुलनेने दुबळे संघ होते. कदाचित उत्तरप्रदेश, उत्तरारखंड , हिमाचलप्रदेश हे संघ असते तर महाराष्ट्राचा संघावर साखळीतच गारद व्हायची नामुष्की ओढवली असती. महाराष्ट्राच्या संघाचा खेळ त्यांच्या लौकिकास साजेसा झालाच नाही. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये जोश नव्हता, खेळाडू थकलेले दिसत होते. काही खेळाडू जखमी होते. अशा थकलेल्या व जखमी खेळाडूंचा भरणा असलेला संघ राष्ट्रीय स्पर्धेत जिंकूच शकत नाही.

महाराष्ट्राच्या गटात विदर्भ व गुजराज हे तुलनेने दुबळे संघ होते. खरा कस लागणार होता तो बाद फेरीतच. उपउपांत्यपूर्व फेरीत केरळ व उपांत्यपूर्व फेरीत बिहार या दोन राज्यांच्या संघांनी देखील महाराष्ट्राला झुंजवले. तेथेच महाराष्ट्राच्या संघाची क्षमता दिसून आली. हे दोन सामने पाहिल्यानंतर रेल्वेपुढे महाराष्ट्राचा निभाव लागणार नाही, असेच जाणकार बोलू लागले होते आणि तसेच घडले. महाराष्ट्राचा संघ रेल्वे विरूध्द पराभूत झाला. या सामन्यात कुठेही चुरस दिसली नाही. महाराष्ट्र आक्रमण व बचाव या दोन्ही क्षेत्रात कमी पडाला. बचावामध्ये गिरीश इरनाक, विशाल माने, विकास काळे यांच्यावर तर आक्रमणात रिशांक देवाडिगा, अजिंक्य पवार, तुषार पाटील यांच्यावर मदार होती. हे सर्व अपयशी ठरले. पवनकुमार शेरावतने आपल्या आक्रमक चढायांनी महाराष्ट्राचा बचाव पूर्ण भेदून टाकला. सुरूवातीलाच बसलेल्या धक्क्यातून महाराष्ट्राचे खेळाडू सावरूच शकले नाहीत.

प्रदीप नरवाल, राहूल चौधरी, पवनकुमार शेरावत हे खेळाडू सलग चार – चार चढाया करत होते. बाद होऊन संजीवनी मिळाल्यानंतर पुन्हा मैदानात आल्यावर हे खेळाडू दमदार चढाया करत होते. धर्मराज चेर्लाथनसारखा खेळाडू उत्तम बचाव करत होता. उपांत्य फेरीचा सामना संपल्यानंतर केवळ 45 मिनिटांमध्ये सेनादल व रेल्वेचे खेळाडू अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. तरी देखील पवनकुमारच्या चढायांमधील आक्रमकता कमी झालेली दिसली नाही.या उलट महाराष्ट्राचे चढाईपटू सलग दोन चढाया करू शकत नाहीत अशी परिस्थिती होती. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तरेतील खेळाडूंकडून काही तरी शिकले पाहिजे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. खेळाडूंकडे चांगले तंत्र आहे. परंतु ताकद आणि तंदुरूस्तीत कमी पडतात. त्यांनी आपल्या तंदुरूस्तीकडे लक्ष दिले पहिजे. खरेतर जे खेळाडू तंदुरूस्त नाहीत अशा खेळाडूंची निवडच संघात कशी केली जाते हाच प्रश्न आहे. जखमी असून देखील त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली होती. अशा जखमी व थकलेल्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षाच करू शकत नाही. जर महाराष्ट्राला पुढे कबड्डीत अच्छे दिन पाहायचे असतील तर वशिलेबाजी थांबवली पाहिजे. खेळाडूंचे नाव पाहून त्यांची संघात निवड होता कामा नये. तर कामगिरी व तंदुरूस्ती पाहूनच खेळाडूंची निवड केली गेली पाहिजे.

– प्रकाश सोनवडेकर

First Published on: February 3, 2019 4:16 AM
Exit mobile version