गाण्याचे प्रेमवीर!

गाण्याचे प्रेमवीर!

गाण्यावरच्या प्रेमात वाहून जाणारी माणसं कशी असतात पहा…रेडिओच्या काळातली गोष्ट…एका पानाच्या ठेल्यावरचा पानवाला नेहमी रेडिओ लावून सर्वांचं मोफत मनोरंजन करायचा. त्या काळात विविध भारती हा हिंदी सिनेसंगीताचा कार्यक्रम जोरात असायचा. हा पानवाला त्यावेळी त्याच्याकडे येणार्‍या ग्राहकांची एक गंमत बघायचा. त्याच्याकडे येणारा एखादा ग्राहक त्याला पान बनवायला सांगायचा आणि त्याच्याकडच्या रेडिओवर लागलेल्या गाण्यावर इतका नादावून जायचा की पानवाल्याने त्याने सांगितलेलं पान बनवून दिल्यानंतरही त्याच्या पानाच्या ठेल्यावर काही मिनिटं रेंगाळत राहायचा. त्याची नजर दुसरीकडे असायची; पण कान रेडिओवर लागलेल्या त्याच्या आवडीच्या गाण्यावर स्थिरावलेले असायचे.

हाच पानवाला म्हणाला, ‘एके दिवशी माझ्या ठेल्यावरच्या या रेडिओवर गाणं लागलं…‘आ आ भी जा, रात ढलने लगी, चाँद छुपने चला.’ ‘तिसरी कसम’मधलं. हे सुरेल गाणं कुणालाही आपल्याकडे ओढून आणतं. त्या गाण्याने खरोखरच एका गृहस्थाला माझ्या ठेल्याकडे ओढून आणलं. तो गृहस्थ काही पान खाणार्‍यांपैकी नव्हता. पण निव्वळ ह्या गाण्याचे सूर ऐकून तो ठेल्याकडे आला आणि त्याने बहाणा कसला केला तर बडिशेप विकत मागण्याचा!

अस्सल रसिक हे असे असतात. ‘ही चाल तुरूतुरू’ ह्या गाण्याचे संगीतकार देवदत्त साबळे यांच्या बाबतीतला असाच एक किस्सा…एकदा ते त्यांच्या स्कुटरवरून त्यांच्या एका वादकमित्राला घेऊन चालले होते. त्यांच्या मागे बसलेल्या त्या मित्राला लहर आली आणि त्याने स्कुटर चालवणार्‍या देवदत्त साबळेंच्या पाठीवर तबल्याचा ठेका धरला. देवदत्त साबळेंनी लागलीच त्याला विचारलं, ‘दिंडी चालली’ हे गाणं वाजवतो आहेस का तू?‘ मित्राने मान डोलावली आणि पाठीवर धरलेल्या नुसत्या ठेक्यावरून गाणं ओळखणार्‍या देवदत्त साबळेंना सलाम ठोकला. गाणं बजावण्याच्या वेडातूनच असे प्रसंग घडत असतात.

नेहा बागवे ह्या अशाच संगीतावर परमभक्ती असणार्‍या शिक्षिका. त्यांच्या आवडीचं गाणं त्यांच्या कानावर पडलं की त्यांची पावलं तिथल्या तिथे खिळतात. एके दिवशी त्यांच्या सोसायटीतून खाली उतरत असताना एका फ्लॅटमधून त्यांच्या कानावर सुमन कल्याणपुरांच्या ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ ह्या गाण्याचे सूर पडले. ते सूरच असे आहेत की ऐकताच ते गाणं कुणालाही स्पर्श करतं. नेहा बागवेंना ते गाणं ऐकताच राहवलं नाही. त्यांनी लागलीच त्या फ्लॅटची बेल वाजवली. आपल्यालाही ते गाणं ऐकायचं असल्याचं त्या फ्लॅटमधल्या लोकांना सांगितलं. त्यांनीही आनंदाने त्यांची विनंती मान्य केली. नेहा बागवेंनी सुमनताईंचं गाणं पूर्णपणे ऐकलं आणि मगच त्या तिथून निघाल्या. संगीतावर अपरंपार भक्ती, अपार प्रेम होतं म्हणूनच नेहा बागवेंनी ते गाणं ऐकून त्यांच्या शेजार्‍यांच्या दाराची बेल वाजवली होती. गाण्यावरचं प्रेमही माणसाला काहीतरी करायला लावतं ते असं!

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हृदयनाथ मंगेशकरांचा ‘भावसरगम’ हा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी रंगायतनने नियम केला होता. कोणत्याही कार्यक्रमाने रात्रीची बाराची वेळ पार केली की ते त्यांच्याकडून दंड आकारायचे. त्यामुळे हृदयनाथ मंगेशकर आपली मैफल बाराच्या आत संपवायच्या तयारीत होते. पण पहिल्या रांगेत बसलेल्या अशोक पोहेकर नावाच्या रसिकाने त्यांच्या गाण्याला तेवढ्यातच वन्समोअर दिला. हृदयनाथ मंगेशकर त्यांना समजावणीच्या सुरात म्हणाले, ‘हे पहा, बाराच्या पुढे घड्याळाचा काटा गेला की इथे दंड लावला जातो, तो भरायला लागू नये म्हणून मला माझा हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतो आहे, कृपया मला समजून घ्या.‘ पण अशोक पोहेकर काही हृदयनाथ मंगेशकरांची विनंती मानायला तयार नव्हते. ते तडक रंगमंचावर गेले, त्यांनी सरळ हृदयनाथ मंगेशकरांना पैसे देऊ केले आणि म्हणाले, ‘तुम्हाला जो काही दंड होईल तो मी भरायला तयार आहे; पण आमचं मन तृप्त होईपर्यंत तुम्ही गात राहा.‘ शेवटी एका रसिकाच्या त्या ओतप्रोत रसिकतेची कदर करत हृदयनाथ मंगेशकर गायले. त्यांनी बाराच्या ठोक्याकडे आणि त्या नियमाकडे पाहिलं नाही…आणि हो, एका जातिवंत रसिकासाठी स्वत:ची पदरमोड करून दंडही भरला; पण एका रसिकाला अतृप्त ठेवलं नाही. आज हे अशोक पोहेकर या जगात नाहीत; पण महाराष्ट्राचे माजी मंत्री गणेश नाईक ह्यांचे ते निकटचे सहकारी होते ही त्यांची ओळखही अशासाठी सांगायला हवी की राजकारणात असूनही हा माणूस गीतसंगीताचा सच्चा पाईक होता!

आजच्या राजकारणातले फायरब्रॅन्ड नेते जीतेंद्र आव्हाड हे तर ऑर्केस्ट्रा सहसा चुकवत नाहीत. गाणं या गोष्टीवर असलेलं त्यांचं निरातिशय प्रेम त्यांना ऑर्केस्ट्राकडे घेऊनच येतं. पहिल्या रांगेत न बसता ते ऑर्केस्ट्राला सर्वसामान्य रसिकासारखे अधेमधे कुठेतरी बसतात. ऑर्केस्ट्रातल्या कलाकारांना त्यांचं संगीतावरचं प्रेम माहीत असतं. मग तेही त्यांना स्टेजवर येऊन गाण्याची विनंती करतात. मग आव्हाडही कधीमधी ‘जीवन से भरी तेरी आँखे‘सारखं एखादं गाणं आपल्या अंदाजात गाऊन जातात. आव्हाड ऑर्केस्ट्रासाठी येताना आपलं नेतेपण बाजूला ठेवतात आणि जातिवंत रसिक बनतात. गाण्याचा रसिक असाच असतो. स्वत:ला विसरणारा!

First Published on: January 6, 2019 5:04 AM
Exit mobile version