सुखाच्या शोधात…

सुखाच्या शोधात…

happiness

मानवी सुखाचा शोध हा न संपणारा आहे. या शोधातच इतिहासाच्या घडामोडी दडल्या आहेत. केवळ भौतिकतेचा विचार करून भागणार नाही याची जाणीव पूर्वीपासूनच होत आहे; पण लालसा त्यावर मात करीत आहे. आनंद खरेदीत असतो ही धारणा सध्याच्या बाजार व्यवस्थेत कोरली गेली आहे. मग सुरू असतो अर्थव्यवहार, खरेदीतून मिळणार्‍या आनंदासाठी. किती याने सोडली. आत-बाहेर जे जे विज्ञानाच्या कक्षेत येत आहे ते सर्वच चिरफाड करीत सुखाचा शोध सुरू आहे.

तो धावत होता. सुखासाठी, आनंदासाठी. त्याने खूप अभ्यासही केला. खूप शोध लावले. आरामाच्या अनेक वस्तूही बनविल्या. निसर्गाची धूळधाणही केली, स्वतःच्या सुखासीनतेसाठी; पण अजूनही तो शोधत आहे पूर्णत्व. आता माहितीचा बादशहा झाला आहे तो, एका सेकंदात सर्व माहिती त्याच्या चक्षुसमोर उभी असते. तंत्रज्ञानाने मनाचे कोपरेन्कोपरे धुंडाळत होता, काय झालं की मन काबीज होईल, तोही प्रयत्न जोरदार करत आहे.
वाटतं ना खूप प्रगत आहे तो..मग, हे काय..

शरीरशास्त्रात प्रगती झाली. आयुमान वाढले. लोकसंख्या वाढली. या वाढीव लोकसंख्येला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचा पुरवठा कसा होणार होता. त्याचं काही नियोजन एक प्रजाती म्हणून होते का त्याच्याकडे. दुर्दैवाने नव्हते. या लोकसंख्येतील किती टक्के जास्त उपभोग घेत होते. जर त्यांची संख्या कमी असून संसाधने जास्त वापरत होते, मग एक प्रजाती म्हणून त्याने व्यवस्था का नाही बदलली की, उत्क्रांती केवळ मूठभरांची गुलाम होती?

अन्न पुरविण्यासाठी अनेक हरित क्रांत्या झाल्या. उत्पादन वाढले. तंत्रज्ञानाने शेती सहज केली. रासायनिक खते आणि किटकनाशके पिकांना संरक्षण देतील आणि भरघोस पीक येईल, अशी अपेक्षा होती. काही वेळा पीक आलेही. पण, ते पीक भुकेल्या पोटांपर्यंत पोहचले का? कुणी अडविले ते अन्न? का कुपोषणाने मृत्यू होत राहिले?
आणि अन्न पिकविणारा आत्महत्या का करू लागला? नगदी पिकांची हाव का लागली त्याला, की कुणी लावली जबरदस्तीने. पैशाची गरज अन्न गरजेपेक्षा जास्त महत्त्वाची ठरली. आरोग्य आणि शिक्षण सुविधा या का आवाक्याबाहेर गेल्या .

बर, ते अन्न तरी पौष्टिकता वाढविणारे होते, तर नाही. सर्वत्र विविधता होती अन्न पदार्थांची ती जाऊन एकसारखेपणा आला. जमिनीचा कस का कमी होत गेला,जमिनी क्षारपड का होत गेल्या, उत्पन्न का घटत गेलं. या शेती व्यवस्थेचा फायदा नक्की कोणाला झाला. कोण श्रीमंत झाले. शेतकरी की बियाणं, अंतिम उत्पादन विकणार्‍या कंपन्या. मध्यमवर्गाला स्वस्तात अन्न मिळण्यासाठी शेतकरी गरीब ठेवला गेला का?

जीवन म्हणजे पाणी. हुशार माणसाने पाण्याचे काय केले. मुबलक शुद्ध पाणी मिळणे हे प्रगतीचे लक्षण. मग नक्की काय झाले, एकही नदी प्रत्यक्ष पाणी ओंजळीत पिण्यायोग्य का नाही राहिली. बाटलीतून का पाणी प्यावे लागत आहे.
भूजल पातळी खाली-खालीच का जात आहे पाणी महाग का होत आहे. सर्व नद्या, खाड्या गटार का होत आहेत.
पाण्यासाठी लांब-लांब रांगा, भाईगिरी, टँकर माफिया, भांडणं का होत आहेत. अत्यावश्यक पाणीच जर नाही मिळवू शकलो एक प्रजाती म्हणून, काय प्रगती केली.
आधी सर्वत्र जंगल, घनदाट वृक्ष राजी होती. समृद्धतेचे लक्षण ते. पण आता काय अवस्था आहे. जंगलतोड होत असताना कोणी का थांबवू शकत नाही. जंगलाच्या अधिवासात राहणारे प्राणी-पक्षी आता कमी होत चालले आहेत. कावळा, कबुतर, मैना, भटकी कुत्री या शहरी उकिरड्यांवर जगणार्‍या प्राण्याची संख्या वाढत गेली. जंगलं जेव्हढी समृद्ध तेव्हढी पाणी आणि हवा शुद्ध एवढा साधा नियम प्रगत प्रजातीला कळला नाही.
जमिनीचा वरचा थर जो कसदार असतो, तो कुठे गेला. लाखो वर्षांच्या प्रक्रियेने जो तयार होतो तो मातीचा थर कुठे गायब झाला. विटा करण्यासाठी तो भाजला गेला की रसायनानी तो दूषित केला. भरणीसाठी तो वापरला गेला की त्यावरच इमारती उभ्या राहिल्या.
या प्रगत प्रजातीने स्वतःच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला निवार्‍याची योग्य सोयही नाही केली. झोपड्या बनवून, रस्त्यावर, अगदी घाणीत का राहत आहेत या प्रजातीचे प्राणी.
इतक्या गगनचुंबी इमारती उभ्या नक्की कुणासाठी होत आहेत. त्या रिकाम्या का राहत आहेत.
घरांची अवस्था भयानक का होत आहे.
बरं, या शहरातल्या लोकांचं सांडपाणी अजून तसेच नदी, खाडी,समुद्रात प्रक्रिया न करता टाकले जात आहे. अजून 60टक्के सांडपाणी प्रक्रियेविना निसर्गात टाकून दिले जाते. प्रगत प्रजातीचा मापदंड कोणता.
चला, हवा तरी श्वास घ्यायला शुद्ध राहिली का? श्वसनाच्या आजारांनी मरणार्‍यांची संख्या लाखोंवरती गेली. मास्क लावावे लागू लागले. किती यंत्रणा आहेत, किती तंत्रज्ञान आहे, मग ते नापास झाले का, की काही तरी चुकलेच आहे, या प्रजातीचे. 50 टक्क्यांहून अधिक शहरे आज वायू प्रदूषणग्रस्त आहेत.

ही अवस्था येईपर्यंत परिस्थितीचे अवलोकन करून उपाय करण्याची बुद्धी नव्हती का, या प्रजातीकडे.

आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत शांतता वाढली की घटली. सुरक्षितता वाढली की घटली. कौटुंबिक आनंद वाढला की स्ट्रेस वाढला. देशादेशामध्ये युद्ध वाढली की शांतता प्रस्थापित झाली. शस्त्रास्त्र निर्माण करणार्‍या कंपन्या कमी झाल्या की वाढल्या. त्यांचा टर्न ओव्हर वाढला की कमी झाला.

धार्मिक, वांशिक भेद का वाढत गेले. एव्हढी सुधारित प्रजाती, एव्हढ्या तुकड्यात का अगदी टोकाची भूमिका घेऊन वाटली गेली आहे. याच प्रजातीला उत्क्रांत मेंदू आहे असं म्हणतात. हा उत्क्रांत मेंदू ,म्हणजे दुधारी शस्त्र म्हणायचं का. जो स्वतःचाच घात करत आहे.

मानवी सुखाचा शोध हा न संपणारा आहे. या शोधातच इतिहासाच्या घडामोडी दडल्या आहेत. केवळ भौतिकतेचा विचार करून भागणार नाही याची जाणीव पूर्वीपासूनच होत आहे. पण लालसा त्यावर मात करीत आहे. आनंद खरेदीत असतो ही धारणा सध्याच्या बाजार व्यवस्थेत कोरली गेली आहे. मग सुरू असतो अर्थ व्यवहार, खरेदीतून मिळणार्‍या आनंदासाठी. जास्तीत जास्त जमा करण्यासाठी, जास्तीत जास्त सुरक्षित होण्यासाठी. अवकाशही धुंडाळून काढले. किती याने सोडली. आत-बाहेर जे जे विज्ञानाच्या कक्षेत येत आहे ते सर्वच चिरफाड करीत सुखाचा शोध सुरू आहे.

पण, एकंदर प्रजाती म्हणून आपण स्वतःला, अन्य सजीवांना, या पृथ्वीला सुखी ठेवण्यात अपयशी ठरलो आहोत.

सर्वच ओरबाडून घेऊन स्वतःच्या नाशाला कारणीभूत होऊ इथपर्यंत वेळ येऊन ठेपली आहे. उद्या पृथ्वीचा, या पृथ्वीवरील मानवाचा इतिहास परग्रहावरील वासी अभ्यास करतील की कसे जगता नये होते.

First Published on: February 10, 2019 4:12 AM
Exit mobile version