नाट्यसंहितेच्या शोधात.. 

नाट्यसंहितेच्या शोधात.. 

मराठी नाटकातील एक दृष्य

नाट्य लेखन हे कादंबरीप्रमाणेच दीर्घ बैठकीचे काम आहे. हे काम तंत्राचेही आहे आणि मंत्राचेही आहे. त्यात अनेक गोष्टींचे भान एकाच वेळी असणे गरजेचे आहे. याला वेळ लागतो. एक नाटक पूर्ण करायला लेखकाला सहा महीने ते वर्ष-दोन वर्षांचा काळ लागू शकतो. एवढे केल्यावर मनाजोगते नाटक लिहून झाल्यावर त्याचे करायचे काय? हा प्रश्न असतो. नाटककार आणि प्रेक्षक यात थेट संबंध नसतो, तर त्यामध्ये अनेक टप्पे येतात. निर्माता आणि दिग्दर्शक हे प्रमुख टप्पे. पण त्यांच्याकडे संहिता पोहोचावी अशी त्यांची अपेक्षा असते. नवख्या नाटककाराची यातील कुणाशीही ओळख नसते. त्या लेखकाने पुण्या-मुंबई पलीकडे राहत असल्यास आपल्या नाटकाचा प्रयोग होणे, ही दुर्मिळ बाब समजायला हरकत नसते. नाटककार शिकतो तो संहिता ते स्टेज, या प्रोसेसमधून. ती वाट्यालाच आली नाही तर त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या संहितेत सुधारणा ती काय होईल? म्हणजे नाटककाराचा शिकण्याचा प्रवास जवळ-जवळ ठप्प असतो.

आज नाट्यलेखक जे नाटककार म्हणूनही ओळखले जातात, ते ही क्वचित नाटक लिहताना दिसतात. डेली सोप्स लिहिणारे जर नाटकाकडे फारसे वळत नसतील तर, त्याचे कारण अर्थकारणात असेल का? थोडक्यात नवे, जुने मिळून अनेक नाट्य लेखक आहेत, पण संहितांचा वानवा ही, तरीही तक्रार आहे. माध्यमावर लिखाणाला ताबडतोब पावती मिळते. कथा किंवा लेखाला उपलब्ध पत्रांचा प्लॅटफॉर्म मिळतो. अगदी कादंबरीही एखाद्या प्रकाशकाला आवडू शकते. नाटकाचे तसे नाही. बहुतेक याचे कारण या सर्व लेखकांनी नाट्य लेखनाबाबत गंभीर नसणे, हे असेल. ज्या प्रमाणे तेंडुलकर, मतकरी, दळवी, कानेटकर, मयेकर, सुरेश जयराम आदि असे का होते?

नाट्यलेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे वर्कशॉप घेण्याचा पहिला प्रयत्न १९७३ मध्ये पुण्यात, पंडित सत्यदेव दुबे यांनी केला. त्या शिबिरांतून ज्या नाटककारांना मार्गदर्शन झाले, त्यात गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार आदी लेखक होते. ‘गार्बो’, ‘वासनाकांड’, ‘उध्वस्त धर्मशाळा’ आणि शंकर शेष यांचे ‘एक और द्रोणाचार्य’ इत्यादी नाटके हे त्या शिबिराचे फलित. त्यानंतर तितका मोठा प्रयत्न कधी झाला नाही. म्हणजे मराठीत चांगले नाटककार व्हावेत म्हणून एका हिन्दी अवलियाने तेव्हा आणि पुढे वैयक्तिक पातळीवर सतत अथक  प्रयास केला. त्या नंतर चार दशकांनी ‘आविष्कार’ने अशा प्रकारचे एक शिबिर घेतले, ज्यात शफाअत खान, जयंत पवार आदि मान्यवर नाट्य लेखकांनी नव्या लेखकांना मार्गदर्शन केले.  ज्यातून युगंधर देशपांडे सारखे लेखक लिहिते झाले. प्रश्न असा की हे प्रयास पुरेसे आहेत का?

आपले  आजचे स्पर्धेतील नाटक पाहीले तर ते  दिग्दर्शकीय कलाकुसरीने भरलेले, पण संहिता लेखन पातळीवर चटपटीत कल्पनेच्या पलीकडे, सकस नाट्य निर्माण करू न शकणारे दिसते. याला अर्थातच सन्माननीय अपवाद आहेत. पण ते लेखक-दिग्दर्शक असलेल्या तरूण रंगकर्मींकडून येत आहेत. म्हणजे नाट्य लेखकाला दिग्दर्शनाचे ज्ञान असावे का? या प्रश्नाचे उत्तर हो असेच मिळावे, अशी देव बाभळी, अनन्या सारखी नाटके यंदा गाजली.
केवळ लेखन प्रक्रियेशी प्रामाणिक राहणार्या लेखकांमध्ये पाहीले तर, स्पर्धांमधून आज चमकत असलेल्या स्वप्नील जाधव, इरफान मुजावर, संदीप दंडवते आणि अन्य काही लेखक दिसतात. नुकतेच, ‘माकड’, हे व्यावसायिक नाटक लिहिणारे चैतन्य सरदेशपांडे सारखे नव्या पिढीतील लेखक आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्याच वेळी सुरेश जयराम, श्रीनिवास भणगे, गजेंद्र कोरे, वामन तावडे यांच्या जुन्या लेखणी कडूनही नव्या संहिता अपेक्षित आहेत. या दोन पिढ्यांच्या  मधील पिढीतील लेखक कुठे आहेत? त्यांची नाटके नेमाने का येत नाहीत? असे प्रश्न आहेत. जयंत पवार, अभिराम भडकमकर, संजय पवार, प्रशांत दळवी या दिग्दर्शकेतर लेखकांची नाटके कुठे आहेत?

जेव्हा जेव्हा नाट्य परीषद आणि निर्माता संघ किंवा खाजगी संस्थांनी प्रयत्न केले तेव्हा ते प्रयोगा सोबत  जोडलेले असल्याने त्याचे वेगळे परिणाम झाले तरी लेखक घडण्याच्या प्रक्रियेपासून आपण थोडे लांबच गेलो ही वस्तुस्थिती आहे. सराव आणि एक्सपोजर नाही म्हणून सफाई नाही, अशी ही वर्तुळाकार समस्या आहे.


-आभास आनंद

First Published on: July 4, 2018 3:00 PM
Exit mobile version