अधुरी गाणी…अधुरी कहाणी!

अधुरी गाणी…अधुरी कहाणी!

गोट्या सिरीयल

इतकं गोड गाणं इतक्या झर्रकन संपल्याची खंत वाटत राहते. क्वचितप्रसंगी गाणं थोडक्यात आटोपून टाकल्याबद्दल मनात किंचित रागही येतो. ’नटरंग’मधलं ’खेळ मांडला’ हे गाणं का कोण जाणे असं थोडक्यात संपल्यासारखं वाटतं. ’तुझ्या पायरीशी कुणी सानथोर नाही’ ह्या पहिल्या ओळीपासून हे गाणं त्यातल्या ज्या सौंदर्याची एकेक पायरी चढत वर जातं ते वरच चढत राहतं. त्यातली ’भेगाळल्या भुईपरी जीव, अंधार जीवाला जाळी’ ही ओळ तर मनाला आतबाहेर स्पर्श करून जाते. पण असं हे गाणं नंतर ती एक अप्रतिम धून वाजवून लांबवलं असलं तरी त्यातले शब्द कधीच संपलेले असतात, त्यामुळे गाणं कधीच संपून गेलेलं असतं. ते असं धसमुसळेपणाने संपल्याचं मनाला लागून राहतं. त्यामुळे नीट ऐकल्यास ते अधुरं वाटतं.

संगीतकार सलील चौधरींची काही सुरेल बंगाली गाणी ऐकताना तर हटकून मनात हा असा विचार येतो. जीवाला वेड लागावं अशी गाणी त्यांनी त्यांच्या बंगाली भाषेत केली आहेत. ’सात भाई चंपा जागो रे जागो रे’ असं एक त्यांचं गाणं आहे. हे गाणं ऐकताना आपल्या देशातल्या कोणत्याही भाषेतल्या संगीतरसिकाला भाषेचा अडसर येऊ नये आणि त्याने ह्या गाण्यात गुंगून पडावं असं हे गाणं आहे, ज्या गाण्यावर हिंदीमध्ये ’प्यास लिये मनवा हमारा ये तरसे’ हे शब्द बेतले गेले आहेत. खरोखरच जीव टाकावं असं हे गाणं आहे, पण अवघ्या दोन अंतर्‍यात गाणं जेव्हा संपतं तेव्हा मनाला चुटपुट लागते. आणखी किमान एक तरी अंतरा हवा होता असं राहून राहून वाटतं.

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ’बंदिनी’ नावाची एक मालिका मराठीत आली होती. गीतकार शांताराम नांदगावकरांनी त्या मालिकेचं शीर्षकगीत लिहिलं होतं. ’बंदिनी…स्त्री ही बंदिनी, ह्रदयी पान्हा, नयनी पाणी, जन्मोजन्मीची ही कहाणी’ अशा साध्यासरळ शब्दांतलं हे गाणं होतं. त्या एके काळी स्त्रीवर्गामध्ये ही मालिका खूप गाजली होती. त्यामुळे आताच्या मालिकांची शीर्षकगीतं जशी सर्वतोमुखी होतात तसंच अनुराधा पौडवालांच्या आवाजातलं अतिशय करूण असं हे शीर्षकगीत सर्वांच्या तोंडी खूप रूळलं होतं. पुढे काही दिवसांनी ही मालिका संपली तरी हे शीर्षकगीत मात्र लोक विसरले नाहीत. म्हणूनच तर पुढे हे शीर्षकगीत पूर्ण आकारातलं गाणं बनून लोकांसमोर आलं. शीर्षकगीत ऐकताना येणारं त्या गाण्यातलं अधुरेपणच त्या पूर्ण आकारातल्या गाण्याने संपवून टाकलं. त्या काळातला गाण्याबद्दलचा हा खरोखरच एक वेगळा अनुभव होता.

आज तर ’आभाळमाया’पासून ’तुला पाहते र’ेपर्यंत मालिकांची अशी कित्येक शीर्षकगीतं आहेत ज्यांची किमान दोन अंतर्‍याची, लोकांच्या तोंडी घोळणारी गाणी सहज होऊ शकतात. (त्यातली बहुतेक गाणी अशोक पत्कींची आहेत ह्याची नोंद न घेऊन कसं चालेल!) कित्येकदा ह्या गाण्यांचाही ऐकताना अधुरा आनंद मिळत असतो. तो आपापल्या टेलिव्हिजनपर्यंत मर्यादित असतो. तो एका नियमित वेळीच मिळू शकतो. अशा वेळी ह्या गाण्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन ती पूर्ण आकारात उपलब्ध झाली तर कुणालाही गाण्याचा पूर्णानंदच मिळेल! आजुबाजूच्या वातावरणात जेव्हा काही रटाळ घडत असतं तेव्हा ही गाणी नक्कीच काहीतरी रसाळ घडवतील..हो की नाही!

– सुशील सुर्वे

First Published on: December 16, 2018 4:27 AM
Exit mobile version