ऑनलाइन पेमेंटचा वाढता वापर !!

ऑनलाइन पेमेंटचा वाढता वापर !!

आजचे युग हे ऑनलाइनचे आहे. तुम्ही एरवी काय करता याला तितकेसे महत्व नाही, पण तुम्ही कितीवेळ ऑनलाइन असता त्यावर तुमची कार्यक्षमता, मैत्री आणि सामाजिक प्रतिष्ठा मापली जाते. कोणे एकेकाळी आपण वस्तूंची देवाण-घेवाण करत आपल्या गरजा भागवत होतो, हे आता कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. कागदी चलन, प्लास्टिक कार्ड्स अशी स्थित्यंतरे करत आता आपण इंटरनेट माध्यमाशी निगडित अशा ऑनलाइनच्या जगात येऊन पोहोचलो आहोत. मोबाईल आणि इंटरनेटने आपल्याला बरेच काही शिकवले, पण आर्थिक व्यवहार-खरेदी-विक्री करण्याचे विकसित व सोयीचे तंत्र फारच क्रांतिकारक ठरले आहे. नोटबंदीमुळे अनेक संकटे आणि विविध दुष्परिणाम भोगायला लागले असले तरी, एका झपाट्यात डिजिटलचा प्रसार करण्याचे पुण्यकर्म त्याने झालेले आहे.

रोकड रकमेच्या वापरातून होणारे भीषण परिणाम केवळ आपला देशच नव्हे तर, संपूर्ण जगच भोगते आहे. उदाहरणार्थ-काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था, दहशतवाद आणि विघातक व्यवहारांना होणारा अर्थ व शस्त्र पुरवठा हे सर्व कमी म्हणून की, काय अनेक बेहिशेबी व्यवहार करून कर चुकवणे व बेहिशेबी मालमत्ता निर्माण करणे असेही अनर्थकारक उद्योग चालतात. म्हणून एका अर्थी ऑनलाइनचे प्रस्थ वाढते आहे, हे चांगलेच आहे. मात्र ते नीट वापरले पाहिजे, त्यातील धोके टाळले तर नक्कीच एक वरदान म्हणता येईल. आज अर्थसाक्षरता म्हणून आपण विविध प्रकारचे ऑनलाइन व्यवहार कसे करावेत आणि काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत.

पार्श्वभूमी – इंटरनेटच्या क्रांतीने मानवी जीवन सुलभ करण्याची अनेक दालने उघडली गेली. संपर्क माध्यमात अभूतपूर्व अशी क्रांती झाली. पाठोपाठ करमणूक आणि आर्थिक बाबतीत खूप परिवर्तन झाले. इलेक्ट्रॉनिक पेमेंट -डिजिटल पेमेंट सिस्टीमने नोटा आणि नाणी यात अडकलेला आर्थिक व्यवहार खुपसा वेगवान आणि सुटसुटीत असा झाला. प्लास्टिक म्हणजेच कार्ड संप्रदायदेखील मागे पडेल की काय? अशी चिन्हे दिसू लागलेली आहेत. केवळ महानगरातच नव्हे तर आता खेडोपाडी रूपे-गुगल-पे असे शब्द परवलीचे होऊन बसलेले आहेत. ओला-उबेर या जोडगोळीने तर मोबाईल पेमेंट सिस्टीम जनमानसात जलदगतीने रुजवली. अशा या आधुनिक पेमेंट पद्धती कशा आहेत आणि या पद्धतीचे फायदे-तोटे काय आहेत, हे आपण आधी पाहूया.

डिजिटल पेमेंट पद्धती – या इंटरनेट आणि मोबाईलद्वारे केल्या जाणार्‍या पेमेंट्सची ठळक वैशिष्ठ्ये आपण पाहणार आहोत-
1) सुरक्षा – जगातील कोणताही व्यवहार-विशेषतः व्यापारी व व्यावसायिक पातळीवरील करताना सर्वात आधी महत्व दिले जाते, ते संपूर्ण यंत्रणेच्या सुरक्षिततेला. कारण पैसे देणारा आणि घेणारा यांच्यातील आर्थिक व्यवहार जर सुरक्षितपणे होणार नसेल, तर कोणीही तशी पद्धती स्वीकारणार नाही, अगदी फुकट दिली तरीही नाहीच. त्या कारणाने कोणतीही पेमेंट व्यवस्था निर्माण करताना हा निकष फार महत्वाचा असा मानला जातो. बाकी कितीही चांगल्या सोयीसुविधा दिल्या आणि सुरक्षा नसेल तर बाकीचे शून्य आहे. देण्याघेण्याचे आर्थिक व्यवहार कोणत्याही असुरक्षित सिस्टीममध्ये पूर्णच होऊ शकणार नाहीत. आज जगभरात सर्वमान्य आणि सर्वाधिकपणे प्रचलित असलेल्या पेमेंट सिस्टीमकडे पाहिले तर आपल्याला लागलीच या विधानाची प्रचिती येईल.

2) विश्वासार्हता – सुरक्षेपाठोपाठ येणार हाही तितकाच महत्वाचा मुद्दा. विश्वासार्हता, पैशाची देवघेव करताना जसा दोन पार्टीचा परस्परांवार विश्वास असणे जसे महत्वाचे असते,तसे पेमेंट करण्यासाठी जे माध्यम निवडले जाते त्याच्याबद्दल विश्वास असणे हेही जरुरीचेच असते. बोगस-बनावट व्यवस्था कधीच तग धरू शकत नाही हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. अशी सिस्टीम उभी करताना ती कोणी उभी केली आहे? हा महत्वाचा मुद्दा असतो. सरकार, सरकारची कार्यक्षम यंत्रणा, बँक, मध्यवर्ती बँक आणि जागतिक स्तरावरील वित्तसंस्था, नामांकित अशी आंतरराष्ट्रीय संघटना याचा सहभाग असेल तर त्याबाबत विश्वासार्हता आपसूक निर्माण होते. आज निर्यात व्यवहाराबाबत वापरले जाणारे लेटर ऑफ क्रेडिट हे गेली अनेक वर्षे असंख्य देशातील निर्यात व्यवहार सुकर आणि विश्वासार्ह करीत आहे. आज अधिक लोकप्रिय असलेली डेबिट आणि क्रेडिट कार्ड सिस्टीम चालवणारे मास्टर आणि व्हिसा या मातब्बर संस्था विश्वासार्हतेवरच उभ्या आहेत.

3) अधिकाधिक व्यवहार करण्याची क्षमता – कोणतीही पेमेंट सिस्टीम उभारताना ती किती मोठ्या प्रमाणावर काम करू शकते. तसेच जास्तीत जास्त कार्यक्षम, निर्दोष आणि परिणामकारक यंत्रणा निर्माण कशी करता येईल हा मुख्य हेतू असतो. केवळ एका राज्यापुरती किंवा देशभरात करता येईल अशी व त्याहीपेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरही तितक्याच प्रभावीपणे कामकाज करू शकेल इतकी सशक्त सिस्टीम उभी करण्याबाबत विचार -नियोजन व कृती आवश्यक असते.

4) स्वीकार करणे -सर्वमान्यता एखादी नवीन योजना ही सर्व घटकांना, ग्राहकांना, उपभोक्त्यांना सोयीची वाटली पाहिजे. म्हणजे ज्याला त्याला अपेक्षित असलेले व्यवहार, त्याबाबतची पेमेंट्स करण्याची सुविधा त्यात असली पाहिजे. सोयीस्कर असल्यास ती अधिक प्रमाणात स्वीकारली जाऊ शकते. अशी जर स्वीकृती मिळणार असेल तर त्यात ग्राहक अधिक प्रमाणात सहभागी होऊ शकतात. पेमेंट सिस्टीमची माहिती व उपयुक्तता सर्व प्रकारच्या व्यवहारांना सोयीस्कर आहे असा बोलबाला झाला की, ती अधिक स्वीकारली जाते. त्यात काही दोष, गैरसोयी असल्यास ती स्वीकारली जात नाही. व्यवहार करताना काही मर्यादा, नियम लादले जात असतील तरीही त्या सिस्टीमचा अधिक प्रमाणावर स्वीकार केला जात नाही.

5) गोपनीयता – व्यापारी, आर्थिक व्यवहारात हा मुद्दा महत्वाचा असतो. कारण एकमेकांचे व्यवहार कळण्याने गैरकारभार, फसवणूक, अफरातफर किंवा निधी हडप करणे असे विघातक व्यवहार होण्याची शक्यता असते. अर्थात कायदेशीरपणे सरकारने काही माहिती मागितली तर ती द्यावीच लागते. स्विस बँकेसारखी गुप्तता पाळून चालत नाही.

6) ग्राहक – कोणत्याही पेमेंट यंत्रणेला ग्राहक मिळणे महत्वाचे असते. कारण ग्राहक नसेल तर अशी स्कीम ही निकामी, निरुपयोगी ठरू शकते. ग्राहकाच्या गरजेला अनुरूप अशी पेमेंट व्यवस्था असल्यास ग्राहक मिळणे तसे अवघड जात नाही.

7) लवचिकता – कोणतीही यंत्रणा, पेमेंट व्यवहार करणारी सिस्टीम ही एकदम नियमबद्ध, ज्याला इंग्रजीत ‘रिजिड’ म्हणतात तशी असू नये. फक्त ठराविक प्रकारचे व्यवहार आम्ही स्वीकारू. इतर व्यवहार आम्ही करणार नाही. अशी मर्यादित सिस्टीम सहसा स्वीकारली जात नाही. मूळ सिस्टीम उभारताना काही गोष्टी उपलब्ध नसतील आणि पुढे ग्राहकांची मागणी, गरज आणि बदलत्या आर्थिक-व्यापारी कारभाराची आवश्यकता म्हणून नवीन बाबी अंतर्भूत कराव्या लागल्या, तर वाईट काय? नवीन बदल स्वीकारण्याची, नव्यांना सामावून घेण्याची योजना एखाद्या सिस्टिमला मोठे करते. कारण असे केल्याने त्याची व्याप्ती व महती वाढते. लवचिकता ही आता काळाची गरज झालेली आहे. अर्थात लवचिकता म्हणजे नियम झुगारून काही करणे असेही नाही.

8) कार्यक्षमता – हा तर कोणत्याही व्यवसायाचा, कारभाराचा मोठा आवश्यक असा गुण आहे. साहजिकच पेमेंट सिस्टिमला जरुरीचा आहे. आज कोणतीही नवीन गोष्ट बाजारात येते, ती किती चकाचक आहे किंवा शोभेची आहे म्हणून काही विकली जात नाही. तर त्यापासून किती फायदे होणार आहेत, किती कार्यक्षम आहे, हे पाहून ती घेतली जाते. उदाहरणार्थ-मोबाईल किंवा फ्रिज हे कितीही आकर्षक असले तरी त्यांची उपयोगिता -त्यात वेगवेगळ्या सोयी-सुविधा फीचर्स असणे आणि मुळात कार्यक्षम असणे हाच त्यांचा ‘युएसपी’ असू शकतो. निष्प्रभ, अकार्यक्षम, दोषरहित पेमेंट सिस्टीम कोणाच्या कामाची ?

9) सोप्पी, सोयीस्कर – कोणतीही यंत्रणा ही वापरण्यास सोयीची असली पाहिजे. विनाकारण गुंतागुंतीची असेल. तर ग्राहक त्यापासून दूरच राहतात. सर्व प्रकारच्या ग्राहकांना सोप्पी व सोयीची असेल तर तिला मान्यता लागलीच मिळते. अवघड यंत्रणेतील ग्राहक नव्याने निर्माण झालेल्या यंत्रणेत सहजपणे दाखल होतात. सोप्पी म्हणजे व्यवहार करण्यास, हाताळण्यास सुलभ, भ्रष्टाचार वा सायबर फ्रॉड करण्यास सोपी असे नव्हे.

10) बदलास सोयीची – अशी यंत्रणा हवी की, जी भविष्यातील गरजेनुरूप बदलता येऊ शकते. नवीन काही गरज त्यात चटकन सामावल्या जाऊ शकतात. त्याकरिता पुन्हा गुंतवणूक किंवा अधिक खर्च करण्याची जरुरी नसते.

डिजिटल पेमेन्टचे फायदे-
1) वेळेची बचत – अमुक वेळेत करा. अशी अट नसल्याने इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धती अधिक प्रमाणात वापरली जात आहे. व्यावसायिक-व्यापारी सौद्यात वेळेला, वेळेवर पैसे देण्याला अतिशय महत्व असल्याने ही आधुनिक व्यवस्था व्यापारी वर्गात अधिक प्रमाणात रुळली. वेळेवर पैसे मिळाल्याने एखादी सेवा किंवा वस्तू आपल्याला वेळेवर मिळू शकते, हा ग्राहकांना होणारा फायदा मोलाचा आहे. रियल टाइममध्ये पेमेंट मिळून व्यवहार पूर्ण होतात.

2) कागद बचत -आजवरची पेमेंट सिस्टीम ही कागदी होती, ज्यात अधिक प्रमाणात कागदाचा वापर व्हायचा, या उलट इंटरनेट व मोबाईल यांच्या माध्यमातून होणारी पेमेंट्स ही ऑनलाइन होतात, पेपर्सचा संबंध नाही. हे एकार्थी उत्तम. कारण यातून झाडे कापली जाऊन निसर्गाची हानी होत नाही. म्हणून डिजिटल पेमेंट सिस्टिमकडे पर्यावरणस्नेही म्हणून पाहिले जाते.

3) कमी श्रम -अधिक मनुष्यबळाची गरज नाही. कागदी पेमेंट सिस्टीममध्ये नोंदी करणे, दस्तावेज तयार करणे हस्तांतर करणे अशा अनेकविध प्रक्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे कुशल, अकुशल स्वरूपाचे मनुष्यबळ लागायचे, तशी आताच्या डिजिटलमध्ये गरज उरलेली नाही. शिवाय क्लिक पद्धतीने व्यवहार जलदपणे होऊ शकतात.

4) रियल टाइम-जेव्हा व्यवहार ठरतो, तेव्हाच त्याच वेळेत पेमेंट दिले जात असल्याने व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतो. पैसे वेळेवर मिळाल्याने बँकेकडून किंवा आपल्या पुरवठादाराकडून कर्ज, उधारी घेऊन किंवा त्याकरिता व्याज देण्याची आवश्यकता भासत नाही. परिणामी आर्थिक बोझा कमी होतो, ग्राहकाला, व्यापार्‍यांना काही प्रमाणात याचा लाभ होऊ शकतो. पेमेंट उशिरा मिळणे, मालाची डिलिव्हरी किंवा सेवा मिळण्यास विलंब वा खोळंबा होणे असे काही प्रकार आपसूक टाळले जातात. रोकड किंवा चेक पेमेंटबाबत असे घडण्याची शक्यता असते, ती येथे अनुभवायला लागत नाही.

5) रोख पैशाची जोखीम नाही- जेव्हा जेव्हा पैसे हाताळायला लागतो तेव्हा चोरीचे, फसवणुकीचे प्रमाण अधिक असते. डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास तशी जोखीम सोसावी लागत नाही. मात्र डिजिटल-सायबर गुन्हांचे जे अनेक प्रकारचे धोके असतात, त्यांना सामोरे जावे लागते.

6) ई-कॉमर्स -ऑन लाईन शॉपिंगला मदत, आज इंटरनेट व मोबाईलद्वारे खरेदी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पेमेंट ऑनलाइन मिळाल्याने मालाची निवड आणि डिलिव्हरी ही साहजिकच वेगाने होऊ शकते. पारंपरिक व्यापार करण्यापेक्षा असा व्यवहार आता अधिक प्रमाणात -विशेषतः तरुण वर्गात वाढत चाललेला आहे.

7) कॅशलेस धोरणाशी सुसंगत – आपल्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा, बोगस व्यवहार कमी व्हावा आणि बेहिशेबी मालमत्ता कमावण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून आपल्या सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अंगिकारले आहे. हे व्यवहार सुरक्षित, सोयीस्कर, वेळेच्या दृष्टीने सोयीचे असल्याने अधिक प्रमाणात वापरले जात आहेत. रांगा लावणे, स्वत: जाऊन पैसे देऊन वस्तू घेणे यात वेळ जातो. वेळ, स्थान, प्रवास अशा अनेक सुविधा देणारा नवा मार्ग म्हणून डिजिटल व्यवहारांकडे पाहिले जात आहे.

डिजिटल पेमेंटचे धोके – आजवरची कोणतीच पेमेंट व्यवस्था तशी फुलप्रूफ म्हणजेच दोषमुक्त नसते, काहीना काही त्रुटी असतातच. याही बाबतीत काही मुख्य धोके काय आहेत हे पाहूया .

1) सायबर गुन्हे – आज जगभरात दहशतवादापाठोपाठ ‘सायबर क्राईम’चे प्रमाण सर्वाधिक असे आहे. विविध प्रकारे पेमेंट सिस्टीम हॅक करणे, बँकेच्या खात्याची सुरक्षाव्यवस्था तोडून त्यातील पैसे लुबाडणे असे प्रकार वारंवार होत आहेत. यंत्रणा कितीही सुरक्षित असली तरीही सायबर दरोडेखोर नवनवीन शक्कल लढवून बँकांच्या पेमेंट सिस्टिमला खिंडार पाडत असतात. आपण व्यक्तिगत व्यवहार करताना जागरूकता बाळगणे जरुरीचे असते.

2) फ्रॉड, भ्रष्टाचार – सिस्टीममधील पळवाटा शोधून अफरातफर करणे हे कितीही प्रयत्न केले तरी चालू असते, म्हणून आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

ऑनलाइन पेमेंट व्यवस्था उपयोगी – आपण योग्य काळजी घेतली तर ही सिस्टीम आजवरच्या अनेक व्यवस्थेपेक्षा अधिक सोयीची आहे. आपला पासवर्ड-त्याची गोपनीयता सांभाळली तर इतकी जलद सोय मिळणार नाही. आपण स्वतः जाऊन खरेदीचा आनंद हा वेगळाच असतो, पण फास्ट लाईफमध्ये तितका वेळ असतो कोणाकडे? म्हणून तर विदेशात रुळलेली आधुनिक व्यवस्था मालाचे वितरण, वाहतूक हे काही प्रश्न सोपे करतात. ग्राहक म्हणून आपल्याला एका क्लिकने पेमेंट केले की, दाराशी ‘होम डिलिव्हरी’ मिळते त्या कारणाने प्रवासाची यातायात-वेळेची बचत आणि ऑनलाइनवर निवडलेली खरेदी चटदिशी मिळते हा मोठा फायदा आहे. डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन व्यवहार हे आता पुढील काळात हातात-हात घालून चालणार यात शंकाच नाही. मोबाईल खरेदी वाढेल, इंटरनेटचा वेग वाढत राहील तसे ऑनलाइन पेमेंट आणि सेलचे प्रमाण नक्कीच वाढत राहील.

राजीव जोशी-बँकिंग व अर्थ-अभ्यासक

First Published on: September 22, 2019 5:40 AM
Exit mobile version