भारत नापासांत पहिला

भारत नापासांत पहिला

औरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ; ७३७ रुग्णांवर उपचार सुरु

चीनमार्गे जगभर पसरलेल्या करोना विषाणूच्या महामारीपासून स्वत:ला दूर ठेवण्यात कुठल्याही देशाला यश मिळत नाही. या करोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरांमध्येच स्वत:ला कोंडून घेणे हाच एकमेव पर्याय असल्याचे जगभरातील सरकारांचे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचेही एकमत झाल्यामुळे जगातील बहुतांश देशांनी स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले आहे. मागील महिनाभरापासून सर्व जगासाठी लॉकडाऊन हा शब्द म्हणजे जणू जगण्याचे प्रमाणपत्र बनला आहे. अशा स्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधन करताना भारतातील लॉकडाऊन आणखी १९ दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला. हे जाहीर करताना मोदी यांनी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे, मात्र, अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांचे प्राण महत्त्वाचे असल्याने ते नुकसान सोसण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले आहे. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी मांडलेल्या भूमिकेचे आणखी लॉकडाऊन वाढवल्याचे देशातील जनतेबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेनेही स्वागत केले आहे.

या आधीही मोदी यांनी सुरुवातीला जनता संचारबंदीचे आवाहन करून लोकांच्या प्रतिसादाची चाचणी घेऊन २४ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यावेळीही जीव असेल तर जगत आहे, अशी भावनिक साद घालून पंतप्रधान मोदी यांनी लोकांना या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हा भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या ५०० होती. त्याच्या २१ व्या दिवशी मोदींनी या लॉकडाऊनचा कालावधी जाहीर करण्यासाठी केलेल्या संबोधनावेळी देशातील करोनाबाधितांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलाडला होता. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या क्रमवारीत तेव्हा भारत ४४ व्या क्रमांकावर होता, तर आता भारत १९ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात भारतातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून त्यावरून विरोधी पक्षांंकडून सरकारच्या निर्णयांवर टीकाही होत आहे. मात्र, आपल्या टीकाकारांना उत्तर देण्यापेक्षा देशवासीयांना संबोधन करताना नरेंद्र मोदी यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

जगभरातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारताकडील आरोग्यविषयक संसाधनांची कमतरता असल्याने करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी पुन्हा जनमनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील आकडे वाढत असले तरी जगातील प्रगत देशांच्या तुलनेत आपली ही संख्या कमी आहे. आपल्याला अर्थव्यवस्था आणि लोकांचे जीव यापैकी जीव वाचवण्यास प्रारंभ द्यायचा असला तरी आपल्याला लोकांच्या दैनंदिन जगण्याचीही काळजी घ्यायची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत सांगितले होते. कालच्या संबोधनातही त्यांनी २१ एप्रिलपर्यंत लोक घरात थांबले व त्यांनी या महामारीस आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केल्यास काही ठिकाणी परिस्थितीनुसार लॉकडाऊनचा पुनर्विचार करण्याचे सुतोवाचही केले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनचा कालावधी किती वाढणार हे पूर्णपणे लोकांच्या प्रतिसादावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था चालवणे, लोकांचे दैनंदिन जीवनमान गतिमान होण्याबाबत कुठलाही निर्णय घेणे सरकारच्या हाती नाही, तर लोकांच्या हाती आहे.

तरीही लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी या लढाईत भारताने इतर देशांच्या तुलनेत करोना विषाणूला अटकाव करण्यात चांगली कामगिरी केली असली तरी भारतातील करोनाचा धोका संपल्याचे कोठेही दिसत नाही, असेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. रोज नवनवे हॉटस्पॉट निर्माण होत आहेत. त्यामुळे एकीकडे माणसांचे जीव वाचवणे आणि दुसरीकडे जीव वाचलेल्या लोकांच्या जगण्याचा प्रश्न सोडवणे अशा यक्षप्रश्नांमधून वाटचाल करण्याची मोठी जबाबदारी या महाकाय लोकसंख्येच्या देशासमोर आहे. त्यामुळे लॉकडाऊनची ही चैन भारतासारख्या मोठी लोकसंख्या दारिद्य्ररेषेखालील असलेल्या देशाला परवडणारी नाही. त्यामुळे २१ एप्रिलनंतर भारताला येथील दैनंदिन जीवनमानाला गती देण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाऊन असूनही बाधितांची संख्या वाढणार असेल, लोक लॉकडाऊनचे पालन करणार नसतील व जीवनावश्यक सेवांसाठी मर्यादित प्रमाणात चलनवलन होणार असेल तर सरकारला त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन एकाच वेळी संपूर्ण देशभरात नसले तरी नवीन रुग्ण न आढळणार्‍या व अद्याप एकही रुग्ण न आढलेल्या भागांमधील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी लागणार आहे.

भारतातील करोना विषाणूचा संसर्ग तिसर्‍या टप्प्यात पसरण्यापासून रोखला हे जागतिक पातळीवरील मोठे यश आहे. भारतात चाचण्या कमी आहेत, म्हणून रुग्ण कमी असल्याच्या खोडसाळ टिकांमध्ये काही अर्थ नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. करोनाबाधितांच्या संख्येत भारत १९ व्या क्रमांकावर असला तरी चाचण्यांच्या बाबतीत ११ व्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ भारतापेक्षा अधिक रुग्ण आढळलेल्या देशांपेक्षाही भारतात करोना विषाणूच्या चाचण्यांची संख्या अधिक आहे. ही संख्या ३० एप्रिलपर्यंत वाढून भारत ३० एप्रिलपासून रोज एक लाख चाचण्या घेऊ शकणार आहे. त्यामुळे करोनाच्या दहशतीला घाबरून घरात बसण्याची गरज उरणार नाही. करोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेऊन योग्य अंतर ठेवून, हॅण्डग्लोव्हज वापरून व तोंडाला मास्क लावून लोकांना आपली दैनंदिन कामे करणे सहज शक्य होऊ शकणार आहे. त्यासाठी आणखी काही कालावधीची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. सध्या करोना विषाणू भारतातील आम जनतेत पोहोचला नसून केवळ दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये त्याचा जनता संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. तो आटोक्यात आणण्यासाठीच लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या गोळ्या अशा वस्त्यांमध्ये देऊन त्याला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

भारत हा १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ साडेअकरा हजार करोनाबाधित रुग्ण असल्यामुळे जगाच्या दृष्टीने आश्चर्याचा विषय झाला आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे व पंतप्रधान मोदींचेही कौतुक केले आहे. भारताने करोना रोखण्यासाठी जानेवारीपासून राबवलेल्या विविध उपाययोजना, मार्चपासून लागू केलेले लॉकडाऊन आणि भारतातील नागरिकांबरोबरच जगभरात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी राबवलेली मोहीम यामुळे भारताचे कौतुक होत असले तरी लॉकडाऊननंतर भारतातील नागरिकांनी सरकारला पुरेसे सहकार्य न केल्यानेच ही संख्या दहा हजाराच्या पार जाऊन काही मोजक्या ठिकाणी तर त्याचा प्रसार आम जनतेत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील उपाययोजनांचे कौतुक होत असले तरी सध्याची भारताची कामगिरी ही जगभरातील नापास देशांच्या तुलनेत चांगली आहे. आपण अजूनही करोनाविरोधातील लढाई जिंकलेली नाही; पण या लढाईत नापास झालेल्या देशांच्या क्रमवारीत आपण प्रथम आलेलो आहोत, हे लक्षात घेऊनच आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

First Published on: April 16, 2020 5:26 AM
Exit mobile version