भारतीय तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती

भारतीय तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती

जे. कृष्णमूर्ती हे प्रख्यात भारतीय विचारवंत. आध्यात्मिक उन्नती ही गुरू, संस्था किंवा धर्म यांच्यामार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेने पाहून आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण या आधारांवर होऊ शकते, अशा तत्त्वज्ञानाची त्यांनी मांडणी केली. त्यांचा जन्म ११ मे १८९५ तामिळनाडू राज्यातील मदनपल्ली (जि. चित्तूर) या गावात नारायणअय्या आणि संजिवाम्मा या दाम्पत्यापोटी झाला. त्यांचे आडनाव जिद्दू होते. या दाम्पत्याला एकूण दहा मुले होती. त्यांपैकी कृष्णमूर्ती हे आठवे अपत्य. म्हणून त्यांचे नाव आवडीने कृष्ण असे ठेवले. डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी कृष्णमूर्ती व त्यांचा लहान भाऊ नित्यानंद (नित्या) यांचा प्रथमपासून सांभाळ केला.

डॉ. अ‍ॅनी बेझंट व सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना कृष्णमूर्तींमध्ये भावी काळातील मैत्रेय जगद्गुरूंच्या मीलनाची शक्यता जाणवली. डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी खासगीरीत्या नामांकित शिक्षकांकरवी इंग्लंडमध्ये कृष्णमूर्तींचे शिक्षण पूर्ण करून घेतले. त्या अनुषंगाने कृष्णमूर्तींच्या आध्यात्मिक कार्याकरिता व येऊ घातलेल्या जगद्गुरूंच्या आगमनाच्या तयारीसाठी १९११ मध्ये ‘पूर्वतारक संघ’ (द ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट) या संस्थेची आणि तिच्या हेराल्ड ऑफ द स्टार या मुखपत्राची स्थापना करण्यात आली. संघाच्या प्रमुखपदी कृष्णमूर्तींच्या नावाची घोषणा केली गेली. या संघाचे वार्षिक मेळावे भरत. तसेच जगद्गुरूंशी मीलन झाल्याची घोषणा होऊन कृष्णमूर्तींची स्वतंत्र विचारांची प्रवचने होत. त्यामुळे त्यांची कीर्ती जगभर झाली.

नंतरच्या काळात १९२८ मध्ये कृष्णमूर्ती थिऑसफिकल वातावरणापासून दूर झाले. प्रत्येकाने स्वत:ची मुक्ती स्वत: नव्याने शोधायची असते, कोणतीही संघटित धर्मसंस्था किंवा गुरू आपल्याला सत्याप्रत नेऊ शकत नाही; किंबहुना सत्याकडे जाणारा कोणताही मार्ग नाही, असे प्रतिपादन करत १९२९ च्या जाहीर प्रवचनात कृष्णमूर्तींनी या जागतिक स्वरूपाच्या संस्थेचे विसर्जन केले आणि अखेरपर्यंत त्यांनी जगभर प्रवास करून लोकांशी संपर्क व संवाद साधून मानवाच्या मूलभूत जाणिवांमध्ये बदल होणे कसे गरजेचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाचा किंवा धर्माचा पुरस्कार केला नाही; किंबहुना या गोष्टीच माणसाला माणसापासून कशा विभक्त करतात व त्यांतून कसा संघर्ष निर्माण होतो, याचेच सातत्याने त्यांनी विवेचन केले. दैनंदिन जीवनातील मानवीसमस्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच समाजातही कसा कलह निर्माण करतात व त्यामधूनच कशाप्रकारे हिंसा, स्पर्धा निर्माण होते आणि अंतर्गत सुरक्षा व आनंदाचा शोध यांची गरज मानवी जीवनात कशी निर्माण होते, याची त्यांनी मीमांसा केली. या सर्वांच्या पलीकडे जाण्यासाठी मानवी जीवनात असलेली सजग अवधानाची गरज त्यांनी सातत्याने प्रतिपादिली.

कृष्णमूर्तींच्या मते, सत्य जाणून घेण्यासाठी किंवा सत्याप्रत येण्यासाठी कोणत्याही धर्मनियोजित मार्गाची किंवा संस्थेची वा गुरूची आवश्यकता नाही. ज्याने त्याने ही उन्नती स्वत:च साध्य करावयाची असते. सत्याप्रत पोहचण्याचे विविध मार्ग पूर्वीपासून सांगितले जातात; परंतु सत्याप्रत जाण्याचा कोणताही मार्ग नाही, हेच सत्याचे खरे सौंदर्य आहे. अशा या थोर तत्वज्ञाचे १७ फेब्रुवारी १९८६ रोजी निधन झाले.

First Published on: May 12, 2021 3:15 AM
Exit mobile version