भारतीय क्रांतीची कविता 

भारतीय क्रांतीची कविता 

प्रातिनिधिक चित्र

दोन वर्षांपूर्वी फिडेल कॅस्ट्रो गेला तेव्हा एका मैत्रिणीचा मेसेज आला- “ आपल्या ऐन उमेदीत विसाव्या शतकाचा नायक गेला.” क्रांती हा शब्द ऐकताच फिडेल कॅस्ट्रो डोळ्यासमोर उभा राहतो. क्यूबासारख्या छोटेखानी देशात त्यानं केलेला आमूलाग्र बदल हा मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘फिडेल,चे आणि क्रांती’ या अरुण साधूंच्या पुस्तकातून या माणसाविषयी विलक्षण जवळीक निर्माण झाली. खरंतर क्रांत्यांनी अनेक नायक आपल्याला दिले पण क्रांतीची यशस्विता ही क्रांतीनंतर काय घडते यावर अवलंबून असते. इंग्लंडमधील वैभवशाली क्रांती असो वा फ्रेंच क्रांती अथवा रशियन क्रांती, त्याच्यानंतर काय घडते आणि त्या क्रांतीचा अर्थ कसा टिकतो यावर सारी भिस्त असते. पण मुळात आजकाल सर्रास कुठेही वापरला जाणारा क्रांती हा शब्द कसा समजून घ्यावा, हा मोठा प्रश्नच आहे.

ढोबळमानाने क्रांती या शब्दाचा अर्थ कमी काळात आमूलाग्र, कायापालट घडविणारा बदल असा घेतला जातो. उत्क्रांती मात्र सावकाश होत असते. उत्क्रांतीच्या कल्पनेत बदल टप्प्याटप्याने नैसर्गिक क्रमाने होणे अभिप्रेत आहे, असे मानले जाते. अर्थातच, कमी काळ, कायापालट, आमूलाग्र या सा-या शब्दांचे अर्थ, अन्वयार्थ व्यक्तिसापेक्ष आहेत आणि त्यामुळेच अगदी छोट्या मोठ्या गोष्टीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदलाला क्रांती असे संबोधले जाते. भारताच्या संदर्भात विचार करताना आपल्या लक्षात येते की ९ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस म्हणून साजरा होऊ लागला तो ‘चले जाव’ चळवळीतील ऐतिहासिक घोषणेमुळे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन हा जगाच्या इतिहासातील एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण असा अध्याय आहे.

विशेषतः गांधींनी ज्या अभिनव मार्गाचा वापर करत स्वातंत्र्य चळवळीला योगदान दिले त्या सा-या लढ्यातून भारतात एक प्रकारची क्रांती झाली, असे मानले जाते. भारताचे वेगळेपण असे की पारंपरिक अर्थापेक्षा वेगळ्या प्रकारची क्रांती इथे घडली आहे. फ्रेंच अथवा रशियामध्ये ज्या प्रकारची क्रांती झाली तशी भारतात झाली नाही. स्वातंत्र्य मिळवण्याचा टप्पा गाठेपर्यंत होणारा आमूलाग्र बदल स्वीकारण्याची, पचवण्याची ताकद निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. संविधान सभेतील भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्याच्या मूल्याचा उदघोष केला पण समतेचा बळी दिला. रशियन राज्यक्रांतीने समतेच्या मूल्याला अधिक महत्त्व दिले आणि स्वातंत्र्याच्या मूल्याला पायदळी तुडवले. स्वतंत्र भारतासमोर स्वातंत्र्य आणि समता या दोन्हींचं सहअस्तित्व टिकवणे हे मोठं आव्हान आहे.

एका अर्थाने स्वातंत्र्य आंदोलनाच्या क्रांतीच गमक टिकवण्याचं सूत्र बाबासाहेब सांगतात. राजकीय लोकशाहीचं सामाजिक लोकशाहीमध्ये रुपांतर झालं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली होती. स्वतंत्र भारतानं त्या दिशेने प्रवास केला आणि काही अंशी त्यात यश आलं. मुळात एवढ्या विविधतेने नटलेला आणि विषमतेने ग्रासलेला देश टिकतो आणि झेप घेतो हे सारेच क्रांतदर्शी आहे. विशेषतः नव्वदच्या दशकापर्यंत ओळख नि अस्तित्व नसलेला मोठा वर्ग मेनस्ट्रीममध्ये आला. भारतीय लोकशाहीची ही दुसरी लाट आहे, अशी मांडणीही राजकीय विश्लेषकांनी केली. त्यानंतर मध्यमवर्गाच्या सहभागासह लोकशाहीची तिसरी लाट आली असेही बोलले गेले. ख्रिस्तोफर जेफरलॉट यांच्यासारख्या संशोधकाने इंडियाज सायलेंट रेव्होल्यूशन  या पुस्तकात उत्तर भारतातील कनिष्ठ जातींचा उदय, त्यांचं अभिसरण या संदर्भाने मांडणी केली आहे.

गांधी म्हणायचे ‘अंत्योदय झाला पाहिजे. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत लाल किल्ल्यावर पडलेले सूर्यकिरण पोहोचले पाहिजेत.’ आंबेडकरांच्या लोकशाहीच्या व्याख्येनुसार रक्ताचा थेंबही न सांडता आमूलाग्र बदल घडवण्याची आकांक्षा व्यक्त केली गेली आहे. मार्क्सच्या स्वप्नानुसार वर्गविहीन, राज्यविहीन, समताधिष्ठित समाज ही क्रांती असेल. क्रांतीचे असे अनेक अर्थ आहेतच पण भारताच्या संदर्भात विचार करताना स्वातंत्र्य, समता, बंधुभगिनीभाव यांच्या पायावर देश उभा करणं आणि टिकवणं हे कुठल्याही क्रांतीहून कमी महत्त्वाचे नाही.

अलिकडेच ‘बिलियन कलर स्टोरी’ हा सिनेमा आला. या सिनेमात हरी अझीझ नावाचा लहान मुलगा भारताच्या वैविध्यतेत, बहुसांस्कृतिकतेत दडलेली कविता टिकवण्याचं कळकळीचं आवाहन करतो. ते पाहताना वाटतं-समाजामध्ये जो बदल हवा आहे तो बदल स्वतःमध्ये घडवणं आणि आपल्याला अपेक्षित असलेला मूल्याधिष्ठित समाज उभा करण्याच्या वाटेवरून चालत राहणं याहून रोमॅन्टीक काय आहे!
निदा फाजली यांनी म्हटलेलं आहे-
“घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें
किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाए”
अपेक्षित क्रांतीचा सारा आसमंत कवटाळता येईलच, असे नाही मात्र आपल्या परीने जे शक्य आहे त्यानुसार बदल घडवत जाणं आपल्याला शक्य आहे. आज भारत ज्या अधिष्ठानावर उभा आहे त्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ या विचारालाच धोका निर्माण झाला आहे. अशा वेळेस आपल्या सर्वांच्या सामूहिक असण्याचं गाणं गात राहणं, त्यातली लय टिकवणं हेच मोठं आव्हान आहे. भारतीय सामूहिक सहभावाच्या सौंदर्याची कविता क्रांतीसारखीच सर्वार्थाने देखणी आहे. त्या कवितेला सार्थकी लावू या!


– श्रीरंजन आवटे

(लेखक समाज-संस्कृतीचे अभ्यासक आहेत)

First Published on: August 5, 2018 4:15 AM
Exit mobile version