भारताची युद्धसज्जता आणि फसवणूक

भारताची युद्धसज्जता आणि फसवणूक

संपादकीय

१९९९साली कारगिल युद्धाच्या वेळी विदेशातून दारूगोळा आणि शस्त्रसाठा मागवताना संबंधित देशांनी भारताकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकाळून बदल्यात अत्यंत जुना शस्त्रसाठा देऊन भारताला लुबाडले, असा खळबळजनक दावा तत्कालीन सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी केला. चंदीगड (पंजाब) येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. कारगिल युद्धाच्या वेळी ज्या देशांकडून तेव्हाच्या सरकरने तोफा आणि तोफगोळे मागवले होते, ते १९७०सालातील होता. त्यातील बहुतांश कालबाह्य झाल्या होत्या. मागवल्या होत्या. तसेच सॅटेलाईट इमेज मागवल्या होत्या. प्रत्येक इमेजसाठी ३५ हजार रुपये खर्च केले होते. त्याही इमेज २ वर्षांपूर्वीच्या होत्या. या सर्वांचा परिणाम म्हणून कारगिल युद्धात देशाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सैनिकांमधील शौर्यामुळे देश जिंकला. माजी सैन्यदलप्रमुख मलिक यांनी केलेला हा खुलासा धक्कादायक आहे. याचा स्पष्ट अर्थ होतो की, ज्यावेळी कारगिल युद्ध झाले, तेव्हा भारताकडे शस्त्रास्त्रे नव्हती, ऐनवेळी शस्त्रास्त्रांची खरेदी केल्यामुळे भारताची फसवणूक झाली. युद्ध काळात सैनिकांमध्ये पराक्रम गाजवण्याची धमक असावी लागते, ती भारतीय सैनिकांमध्ये आहेच, मात्र त्यासोबत त्यांच्याकडे उत्तम दर्जाचा शस्त्रसाठा, प्रगत तंत्रज्ञान त्याचबरोबर उत्तम रणनीती असण्याची गरज आहे. कालपर्यंत भारताने शस्त्रास्त्रांच्या निर्मिती स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने कधी प्रयत्न केले नाही, तसेच पाकिस्तानसारख्या क्रमांक १च्या शत्रूविरोधात जागतिक पातळीवर कधी विश्वासू मित्र कमावला नाही. त्यामुळे पाकिस्तान अमेरिकाकडून वारंवार आधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन त्यांचा वापर भारताच्या विरोधात करत असतो, भारतीय सैनिक मात्र अशा प्रकारे तडजोडी करत युद्ध जिंकत आहेत. सैनिकांना अत्याधुनिक बंदुका, तोफा, रडार उपलब्ध करून देणे हे खरेतर राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, परंतु कारगिल युद्धाच्या काळात भाजप सरकार काय किंवा त्याआधी काँग्रेसच्या ६ दशकांच्या कार्यकालात काय, याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी ऐन युद्धकाळात शस्त्रास्त्रांची टंचाई सैन्याने अनुभवली. सैन्यदल वेळोवेळी शस्त्रास्त्रांची मागणी करत असते, परंतु त्यावर तातडीने निर्णय घेण्यात विलंब होणे, खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांचा दर्जा सुमार असणे असा अनुभव सैन्यदल मागील ५-६ दशके घेत आला आहेे. काँग्रेसच्या काळात इतर देशांकडून खरेदी केलेल्या तोफा, हेलिकॉप्टर यांच्या खरेदीतील घोटाळ्यांच्या प्रकरणांनी देशातील वातावरण ढवळून निघायचे. परदेशातून संरक्षण साहित्य खरेदी म्हणजे त्यात काहीतरी घोटाळा झालाच पाहिजे, असे समीकरण बनले होते. खरेतर भारत एव्हाना शस्त्र निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होऊन शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश म्हणून नावारुपाला येणे अपेक्षित होते. अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक वर्षे शीतयुद्ध चालू आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांना तुल्यबळ शस्त्रास्त्रे शोधणे, तंत्रज्ञान शोधणे, प्रगत शस्त्रांची निर्मिती करणे, असे सातत्याने करत असतात. अमेरिकेने ‘मदर-ऑफ-ऑल-बॉम्ब’ (एमओबी) तयार केला, तर रशियाने ‘फादर-ऑफ-ऑल-बॉम्ब’ तयार (एफओबी) तयार केला. रशियाकडे एस् ४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे, तर अमेरिकेकडेही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत. त्यामुळे हे दोन्ही देश तुल्यबळ आहेत. त्या तुलनेत भारताला पाकिस्तानसारखा अमेरिकेची शस्त्रास्त्रे घेऊन लढणारा शत्रू, तर दुसर्‍या बाजूला तंत्रज्ञानात प्रगत असलेला चीनसारखा बलाढ्य शत्रू आहे. अशा वेळी तंत्रज्ञानात भारताने एव्हाना वरचढ होणे अपेक्षित होते, मात्र दूरदृष्टी नसल्याने आजवरच्या राज्यकर्त्यांमुळे भारत युद्धाच्या सारख्या परिस्थितीत परावलंबी राहिलेला आहे. रशियाकडून आपण मिग विमाने आता कालबाह्य झाली आहेत. प्रत्येक महिन्यात एकातरी मिग विमानाचा अपघात होऊन काही घटनांमध्ये आपण वैमानिकही गमावत असतो. ही विमाने उडत्या शवपेट्या म्हणून ओळखल्या जावू लागल्या. मोदी सरकारने पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळी अत्याधुनिक विमानांची नितांत आवश्यकता भासली. कोणताही देश आयत्यावेळी मागणी केल्यावर तातडीने युद्धसामग्री पुरवू शकत नाही. त्यासाठी काही महिने, काही वर्षे प्रतीक्षा करावी लागते. युद्ध चालू असताना हा अवधी परवडण्यासारखा नसतो. या वेळी तातडीने युद्धसामग्रीच्या खरेदीतून हमखास फसवणूक होते. दुसरीकडे भारताशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे देशही मोजके आहेत. वरवर मित्रत्वाचे संबंध दाखवणारे देश ऐनवेळी मात्र चार हात लांब राहतात. शस्त्रास्त्र व्यवहारात तर अधिक कठोर बनतात. हे भारताने वेळोवेळी अनुभवले आहे. प्रसंग येतो तेव्हाच कोण आपला आणि कोण शत्रूचा याचा प्रत्यय येत असतो. कडाक्याच्या थंडीत पुरेशा साधनसामुग्रीअभावी भारतीय सैन्य कारगिल येथील पर्वतरांगावरून खाली उतरले आणि त्याच कडाक्याच्या थंडीत आधुनिक साधनसामुग्रीच्या सहाय्याने पाकिस्ताने सैनिक त्याच पर्वतरांगांवर घुसखोरी करून त्यावर ताबा मिळवतात. अशा वेळी पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय सैनिकांची होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि पाकिस्तानच्या सैनिकांचा वेध घेण्यासाठी भारताकडे यंत्रणा नव्हती. इस्रायलकडे मदत मागितल्यावर त्यांनी तात्काळ त्यांच्याकडील ‘लेझर बॉम्ब’ भारताला पुरवले. ज्यांच्या आधारे पाकिस्तानी सैनिकांना अचूकपणे टिपून भारताने युद्ध जिंकले. युद्ध हे कधी सांगून होत नसते. भारताच्या शेजारील पाकिस्तानाकडून हल्ले करणार्‍या दहशतवाद्यांचा बिमोड करणे म्हणजे युद्धाला निमंत्रण दिल्यासारखेच असते. त्यामुळे प्राधान्याने युद्धसाहित्य निर्मिती करणारे कारखाने भारतात चालू होणे आवश्यक आहे. भारत शस्त्रविद्या, युद्धकला यांचा उद्गाता आहे. त्यामुळे शस्त्रास्त्रे ‘मेक-इन-इंडिया’ नव्हे तर पूर्णत: भारतीय बनावटीचीच हवीत हे सरकारने ध्यानात घेतली पाहिजे. कुणालाही युद्ध नको असते, म्हणून आजूबाजूचे देशही अहिंसावादी असतील आणि तेही महत्त्वाकांक्षी नसतील, अशा भ्रमात राहणे चुकीचे आहे. म्हणून भारताने युद्धसज्ज राहणे हे आवश्यक आहे. त्याकरता राफेलसारख्या लढाऊ विमानांच्या खरेदीसारखे व्यवहार अधिकाधिक प्रमाणात होणे देशाच्या हिताचे आहे.

First Published on: December 24, 2019 5:29 AM
Exit mobile version