कॅशलेस पेमेंटमधला देशी फंडा

कॅशलेस पेमेंटमधला देशी फंडा

UPI

दिवाळी ही परंपरेने वर्षातील सर्वाधिक रिटेल खरेदीची वेळ. यंदाच्या दिवाळीत खरेदीसाठी ऑनलाईन बाजारपेठांना ग्राहकांनी अपेक्षेप्रमाणे अधिक प्रतिसाद दिला. तिथले विक्रीचे आकडे मोठे होते आणि दिवाळी संपल्यानंतरही वस्तुंची पाकिटे घरोघर वाटण्याचे काम सुरूच असलेले दिसते. या खरेदीसाठी कॅश ऑन डिलिव्हरी या पद्धती प्रमाणेच ऑनलाईन पेमेंट व्यवस्था मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली आहे. दुसरीकडे पेट्रोलसाठीच्या रांगांतून पेमेंटसाठी नोटांऐवजी कार्ड बाहेर काढणार्‍या ग्राहकांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढताना दिसत आहे. पेट्रोल पंपांवर कार्ड वापरण्यासाठी प्रोत्साहन देणारे संदेश दिसत आहेत.

विसाव्या शतकात, जगाच्या आर्थिक क्षेत्रात एक नवीच पद्धत विकसित झाली आणि डिजीटल युगात तर ती प्रचंड विस्तारली. ती म्हणजे पेमेंटसाठी रोख रकमेऐवजी कार्ड वापरण्याची पद्धत. क्रेडिट कार्डे आणि एटीएमच्या उदयानंतर मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी डेबिट कार्डे यांनी जगाच्या आर्थिक व्यवहारांत महत्वाचे स्थान मिळवले. जगाच्या बाजारात कार्ड कंपन्यांनी किरकोळ पेमेंट्स सेटलमेंटमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे, बजावत आहेत.

आपल्या देशात अर्थव्यवस्था कागदी नोटांच्या आधाराने चालवीत राहणे खर्चिक आहे तसेच ते व्यवहारांच्या गतीवरही परिणाम करते. त्यामुळे डिजीटल तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर, ते पुरेसे सुरक्षित होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर त्या दिशेने स्वाभाविकच वाटचाल सुरू झाली. देशात डिजीटल व्यवस्थेवर विश्वास दाखवित त्या दिशेने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि काही मोठ्या बँकांनी पुढाकार घेतला. या पुढाकारातून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एनपीसीआय) स्थापना २००८च्या अखेरीस झाली. त्याआधीच्या काळात देशात धनादेश (चेक) हे पेमेंट्सचे एक प्रमुख माध्यम होते. पेमेंट सेटलमेंटसाठी देशात तब्बल एक हजार क्लिअरिंग हाऊसेस तयार केली होती. यावरूनच या कारभाराचे अवाढव्य स्वरूप लक्षात यावे. अर्थव्यवस्थेची वाढ म्हणजे आर्थिक व्यवहारांच्या संख्येतली वाढ. भारतीय अर्थव्यवस्थेचे विस्तारणारे स्वरूप पाहता क्लिअरिंग हाऊसेसची संख्या आणि त्यांच्यावरचा कामकाजाचा वाढता दबाव ही न संपणारी गोष्ट ठरली असती. त्यामुळे बँकिंग व्यवस्थांचे नियमन करणार्‍या सर्वोच्च संस्थेने वेळीच योग्य ते पाऊल उचलून डिजीटलायझेशनचा मार्ग स्वीकारला हे योग्य झाले.

त्यापूर्वी एटीएम यंत्रे आली होती. जगातल्या प्रमुख कार्ड पेमेंट नेटवर्क्सनी भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला होता. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांच्या सहकार्याने क्रेडिट आणि डेबिट कार्डे भारतातील ग्राहकांना वितरित करण्यात आली होती. प्लास्टिक मनी नावाने ओळखल्या जाणार्‍या या व्यवस्थेत भारतीय ग्राहकांचाही प्रवेश झाला होता. कार्डे एटीएम वापरापुरती मर्यादित न राहता, ती दुकाने आणि व्यावसायिक संस्थांमधूनही वापरली जायला लागली. कार्डाद्वारे पेमेंटच्या पद्धतीला गती मिळाली.

एनपीसीआयने २०१२ मध्ये रुपे कार्ड या नावाने देशी (डोमेस्टिक) पेमेंट कार्डची व्यवस्था लॉन्च करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ही एक नवीच सुरवात होती. त्यानंतर गेल्या सहा वर्षांत अनेक भारतीय बँकांनी ग्राहकांना रुपे कार्ड मोठ्या प्रमाणात वितरीत केली आणि आता त्याद्वारे व्यवहार वाढताना दिसतात. विशेषतः अगदी अलीकडच्या काही वर्षांत यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कार्डाद्वारे पेमेंट करण्याच्या मार्केटमध्ये यूपीआयने देशात नवी स्पर्धा निर्माण केली आहे.
हे घडत असतानाच वित्तीय तंत्रज्ञानाच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा समांतर रितीने सुरू झाला होता. ऑनलाईन पेमेंट्सचा मार्ग खुला झाला. या व्यवस्थेत नोटा लागत नाहीत तसेच कार्डेही लागत नव्हती. देशात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ही जगातली एक अद्वितीय व्यवस्था विकसित झाली.

तंत्रज्ञानातला हा पुढाकार लक्षणीय ठरला. स्मार्टफोन सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, त्यात बँका आणि इतर संस्थांची अ‍ॅप्स उपलब्ध होणे याने या कॅशलेस व्यवस्थेला बळ दिले. ऑनलाईन बाजारपेठांत भरभराट आणली. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी या यूपीआयच्या पेमेंट पद्धतीला आपल्याही अ‍ॅपमध्ये सहभागी केले. कितीही लहान रकमेचे चटकन हस्तांतर करण्याची सुविधा असल्याने या पद्धतीला किरकोळ खरेदी- विक्रीतही मोठे स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अगदी दैनंदिन जीवनातल्या लहानसहान खरेदीसाठी त्याचा सर्वत्र वापर सुरू झाला आहे, असे अजून दिसून येत नाही. येत्या काळात त्यात वाढ होईल अशी एक अपेक्षा आहे.

रिटेल पेमेंटच्या उपयोगासाठी रुपे कार्ड आणि ऑनलाईन ट्रान्सफरसाठी यूपीआय या दोन व्यवस्था एनपीसीआयने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा वापर वाढतो आहे त्याप्रमाणे त्यांचा मार्केट शेअरही वाढतो आहे. या नोव्हेंबरमध्येच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत, देशातल्या एकूण कॅशलेस पेमेंटपैकी, रुपे आणि यूपीआय याद्वारे केलेल्या पेमेंटचे प्रमाण निम्माअधिक आहे. ते खरे असेल तर तितका मार्केटशेअर एनपीसीआयच्या या दोन साधनांनी मिळवला आहे. साहजिकच त्याने पेमेंट मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. कॅशलेस पेमेंट मार्केटमधला हा नवाच देशी फंडा यापुढे कोणते वळण घेतो हे पाहणे महत्वाचे आहे.

त्याइतकीच महत्वाची आहे ती फायनॅन्शीअल टेक्नॉलॉजी नावाची तंत्रज्ञानाची शाखा. ही एक अत्यंत वेगाने विकसित होणारी तंत्रज्ञान शाखा आहे. आर्थिक देवाणघेवाण आणि साठवणुकीचे वेगवेगळे मार्ग त्याद्वारे हाताळले आणि विकसित केले जात आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षितता या आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या घटकाच्या दृष्टीनेही तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा होत असतात. या मंथनातून नवीच काही रचना पुढे येईल. तंत्रज्ञान आपल्यापुढे काय घेऊन येते हेही पहावे लागेल, तोवर रूपे कार्ड आणि यूपीआय भारतात आपणासोबत असतीलच, असे मानायला हरकत नाही.

First Published on: November 14, 2018 5:37 AM
Exit mobile version