आरमारी दलाचे आद्यस्थान – सिंधुदुर्ग किल्ला

आरमारी दलाचे आद्यस्थान – सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळाकभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली. असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. भारत सरकारने या किल्ल्याला २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली.

First Published on: November 25, 2019 6:35 AM
Exit mobile version