पावसाचा शेतकऱ्यांना चकवा

पावसाचा शेतकऱ्यांना चकवा

फोटो सौजन्य - फर्स्ट पोस्ट

यंदा उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेली जनता मान्सूनची अधिक आतुरतेनं वाट पाहत होती. अशात या वेळी देशात मान्सूनचं आगमन काहीसं लवकर होणार असल्याच्या अंदाजानं साऱ्यांनाच दिलासा मिळाला. एरव्ही मान्सूनचे अंदाज चुकतात, असं सर्वसाधारण चित्र दिसतं. परंतु हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आणि नियोजित वेळेपेक्षा काही दिवस आधी मान्सून देशाच्या विविध भागात धडकला. त्याच्या आगमनानं साऱ्यांना आनंद होणं स्वाभाविक होतं. त्यानुसार साऱ्या सृष्टीनं या मान्सूनचं स्वागत केलं. आपल्या देशातील शेतीचं गणित पावसावर अवलंबून असतं. त्यामुळे शेतकरीवर्ग मान्सूनच्या आगमनाकडे विशेष लक्ष ठेवून असतो. यंदा पाऊस लवकर सुरू होणार हे समजल्यावर शेतकऱ्यांची पेरणीच्या तयारीसाठी लगबग उडाली. सारेजण कामाला लागले आणि पेरणीपूर्व मशागतीची कामं झपाट्यानं उरकली. पाहता पाहता अनेक ठिकाणी या हंगामातील प्रमुख पिकांच्या पेरण्या झाल्या आणि त्याला पावसाची उत्तम साथही मिळाली. योग्य वेळी वाफसा मिळाल्यानं पेरणीचं गणित बरोबर ठरल्याची भावना अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. परंतु गेले काही दिवस पावसानं दिलेल्या ओढीमुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर दुबार पेरणीचं संकट ओढवणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

खरं तर यावेळी पावसाचं आगमन काहीसं लवकर होत असलं तरी नंतर त्यात खंड पडेल, असा अंदाज मी दोन महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता. जागतिक हवामान तज्ज्ञांनीही महाराष्ट्रात पावसाची सुरूवात वेळेत होणार असली तरी नंतर त्याचा ताण राहील, असं म्हटलं होतं. शिवाय जूनच्या अखेरपर्यंत अपेक्षित प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता नाही, असंही या तज्ज्ञांचं मत होतं. आता नेमकी तशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. घाईघाईनं पेरणी केल्यानंतर आता पाऊस नसल्यामुळे आणि स्वच्छ ऊन पडत असल्यानं पावसाची शक्यता दिसत नसून दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. आपल्या हवामान शास्त्रज्ञांनी यंदा पावसाचं प्रमाण ९७ टक्के इतकं राहील, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, हा अंदाज वर्तवताना पावसात पडणारा खंड किंवा उघडीप याबाबत काहीही मार्गदर्शन करण्यात आलं नाही. आता काही शास्त्रज्ञ २२ जूननंतर पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त करत आहेत. परंतु, एकंदर अभ्यासानुसार ३० जूनपर्यंत पाहिजे तसा पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. वास्तविक, शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षातील पावसाचा पडताळा घेतला किंवा निरिक्षण केलं तर असं आढळतं की, मृग नक्षत्रात पाऊस वेळेवर सुरूवात झाल्यास शेतकऱ्यांना त्यानंतर पावसाचा ताण सहन करावा लागतो. दुबार पेरणी करावी लागते. यावेळी असंच होण्याची शक्यता अधिक आहे. तसा विचार करता जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे शेतीक्षेत्रातील हंगामानुसार लागवडीला काहीही महत्त्व राहिलेलं नाही. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हंगामानुसार पिकं घेण्याची पध्दत, सवय बदलली पाहिजे.

खरं तर शेतकऱ्यांसाठी वेळेवर पाऊस पडणं महत्वाचं असतं. कारण त्यांना सुरूवातीला ६० दिवसाचं मुगाचं पीक घेऊन नंतर ज्वारीची पेरणी करता येते. त्यामुळे त्यांना फायदा होतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे गोकुळाष्टमीच्या सुमारास ज्वारीची पेरणी करण्याची पध्दत आहे. याचं कारण त्यापूर्वी हाती असलेल्या साठ दिवसांच्या कालावधीमध्ये मुगाचं पीक घेता येतं. मात्र, पाऊस उशिरा झाला तर शेतकरी मुगाची पेरणी करत नाहीत. कारण काढणीच्या वेळी तो मूग पावसात सापडतो आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं. जागतिक तज्ज्ञांच्या अभ्यासाप्रमाणे पावसामध्ये जून महिन्यात खंड पडतो, तसाच खंड गोकुळाष्टमीच्या सुमारासही पडतो. अशा परिस्थितीत ज्वारीच्या पेरण्या उशिरा कराव्या लागतात. हे लक्षात घेऊन पावसाच्या ओढीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत मूग पेरला तरी काही नुकसान होण्याची शक्यता नाही. आपल्याकडील रब्बी हंगाम आणि त्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या गहू, हरभऱ्यासारख्या पिकांना थंडीची आवश्यकता असते. या वर्षीच्या अंदाजानुसार थंडीचा कालावधी कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी थंडीत उत्तम येणाऱ्या जातींची निवड पेरणीसाठी करावी लागणार आहे. आतापासून त्याची तयारी केली तर ऐन वेळी धावपळ होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे. परंतु अल्केल या वाटाण्याच्या जातीला कमी थंडी असली तरी चालते. स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक आहे. परंतु परदेशातील शास्त्रज्ञांनी कमी थंडीत येणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या जाती विकसित केल्या आहेत. हे लक्षात घेऊन या जातींच्या लागवडीला प्रोत्साहन देणं हिताचं ठरेल.

आणखी एक बाब म्हणजे ३० जूननंतर पेरणी करायची असेल तर तिळाचं पीक चांगलं ठरेल. सूर्यफुलाचं पीकही लागवडीसाठी योग्य ठरणारं आहे. मात्र, यावेळी जमिनीच्या प्रतीनुसार पिकाची निवड करावी लागते. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी पिकं करावी लागतील. उदाहरणार्थ, विदर्भातील जमीन काळी, कसदार आहे. त्यामध्ये तिळाचं पीक चालू शकेल. परंतु, हलक्या जमिनीत ते येऊ शकणार नाही. या देशात डाळी आणि तेलबिया यांची मागणी मोठी असून त्या मानानं देशांतर्गत उत्पादन होत नाही. त्यामुळे बाजारात डाळी आणि तेलबियांची टंचाई पहायला मिळते. हे लक्षात घेऊन देशांतर्गत सूर्यफुलाच्या लागवडीला महत्त्व दिल्यास भारताला ८० हजार कोटींचं जे खाद्यतेल आयात करावं लागतं, त्यात कपात करता येऊ शकते. महाराष्ट्रातील बागायत क्षेत्र स्वातंत्र्यानंतर फारसं वाढलेलं नाही. ते १७ टक्क्यांपर्यंत सिमित झालं आहे.

सिंचन प्रकल्पातील अनेक घोटाळ्यांमुळे या प्रकल्पांची कामं एक तर पूर्ण झाली नाहीत किंवा झालेल्या कामांमधील त्रुटींमुळे ती परिणामकारक ठरत नाहीत. शिवाय एकूण बागायती क्षेत्रातील जमिनीपैकी बरीचशी जमीन उसाखालील आहे. उर्वरित जमीन फळं आणि भाजीपाल्याखाली आहे. या क्षेत्रामध्ये पीक पध्दतीबाबत फारसा बदल दिसत नाही. मुख्यत्वे या क्षेत्राचे प्रश्न वेगळे आहेत. अर्थात, धरणं भरली म्हणजे या क्षेत्राचा पाण्याचा मुख्य प्रश्न सुटतो. हे पाणी संरक्षित असल्यामुळे कमी पाऊस झाला तरच बागायती क्षेत्रावर परिणाम होतो.


प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड

First Published on: June 26, 2018 10:13 AM
Exit mobile version