आसिफाला न्याय, ट्विंकलचे काय?

आसिफाला न्याय, ट्विंकलचे काय?

कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. अल्पवयीन आसिफाला अखेर न्याय मिळाला. आसिफावर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. एका आठ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणारे इतके क्रूर कसे होऊ शकतात, असा प्रश्न सर्वांंनाच पडला होता. आसिफाच्या बलात्कारानंतर जगभरातील सहाशे तथाकथित बुद्धिमंत वा मान्यवरांनी भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहून भारतात होत असलेल्या बलात्काराविषयी चिंता व्यक्त केली होती. कुठल्याही देशात वा समाजात होणारे बलात्कार, हा तिथली शासन व्यवस्था व समाजाचे धुरीण यांच्यासाठी नक्कीच चिंतेचा विषय असतो. सरसकट समाजमन या बलात्कारामुळे दु:खी झाले. कठुआ व उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांना माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. त्यानंतर शेकडोंनी मान्यवर त्याचा निषेध करायला पुढे सरसावले. त्याच्या आणखीनच बातम्या झाल्या. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर निश्चितच दबाव आला. पण आसिफाच्या निमित्ताने रस्त्यावर आलेले स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणार्‍या मान्यवरांचा हेतू खरंच शुद्ध होता का? की कोवळ्या आसिफाच्या तोडलेल्या लचक्यातून या लोकांना मोदी सरकारला लक्ष्य करायचे होते? कठुुआ बलात्काराच्या घटनेनंतर दोन वर्षांनी अलिगड येथे ट्विंकल शर्मा या दोन वर्षांच्या मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केला. त्या गोंडस मुलीच्या शरीराचे लचके या लांडग्यांनी तोडले. तिच्या शरीराचा एक-एक अवयव या नराधमांनी वेगळा केला. एका सर्वसाधारण व्यक्तीला ट्विंकलचा पोस्टमार्टेम रिपोर्ट वाचण्याचेही धाडस होणार नाही, इतके तिचे हाल हाल केले. खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती. मात्र त्याच्याविरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. आसिफाला न्याय मिळावा म्हणून गळ्यात फलक अडकवून कॅमेर्‍यासमोर येणारे कुठे दिसले नाहीत. ट्विंकलला न्याय मिळावा म्हणून कोणीही गळा काढला नाही. आसिफाला न्याय मिळावा तर ट्विंकलला का न्याय मिळू नये? ट्विंकल ही हिंदू मुलगी आणि तिच्यावर अत्याचार करणारे मुस्लीम यामुळे स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे पुढे का आले नाहीत? की तिच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी शेकून घेता येणार नाही म्हणून ते गप्प बसले?

कालपरवा हॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी आपल्यावर कसे बलात्कार झाले, त्याची कथने केलेली आहेत आणि ते अजून संपलेले नसल्याचीही ग्वाही दिलेली आहे. त्यासाठी मग यापैकी कोणी त्या व्यवसाय वा क्षेत्रातील जाणत्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे काय? नसेल तर कशाला चिंता वाटलेली नाही? अशाच वर्गात प्रतिष्ठित झालेले व नोबेल पारितोषिकाचे सामूहिक मानकरी ठरलेले महान पर्यावरणवादी पचौरी, यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत. प्रतिष्ठित ज्ञानविज्ञान संस्थांचे उच्चपद भूषवलेल्या पचौरी यांच्यावर असे आरोप झाले, त्यामुळे अशा संस्थामध्ये कार्यरत असलेल्या महिलांच्या चारित्र्य व सुरक्षेला धोका निर्माण होतो, असे त्यांच्याच गोतावळ्यात वावरलेल्या जगभरच्या सहाशे लोकांना कशाला वाटले नाही? उदाहरणे शेकड्यांनी देता येतील. त्यावेळी कुठल्याही संवेदनाशील व्यक्तीला चिंता वाटायला हवी. पण नेमके त्याचवेळी गप्प बसणारे हे मान्यवर लोक, कठुआ आणि उन्नाव येथील दोन बलात्काराच्या विषयाचे अवडंबर माजवून मोदींना पत्र लिहितात, तेव्हा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणे भाग होते. ते खरोखरच मुली महिलांच्या सुरक्षेसाठी चिंतीत झाले आहेत, की आपल्या भोवताली असलेल्या भयंकर सत्यापासून पळण्याचा उद्योग करीत आहेत? ज्या सहाशे मान्यवरांनी असे पत्र लिहून बलात्कारावर चिंता व्यक्त केली, त्यांची लेखणी ट्विंकलवरील बलात्कारानंतर का गोठली? भारतातल्या अनेक अभिनेत्रींनी आसिफाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्याच व्यवसाय उद्योगात महिलांवर कामासाठी वा रोजगार संधीसाठी बलात्कार होतात, त्यावर कधी आवाज उठवलेला होता काय? तरूण तेजपाल या शोधपत्रकारावर बलात्काराचा आरोप झाला, तेव्हा किती प्राध्यापक संपादक बलात्काराच्या मनोवृत्तीवर चिंता व्यक्त करायला पुढे आलेले होते? नसेल तर तेव्हा आणि आता ट्विंकलवरील अत्याचारानंतर गप्प कशाला बसले? आसिफावरील बलात्कारानंतर महिलांच्या सुरक्षेचा इतका उमाळा कशाला आला आहे?

आज आपल्या देशातल्या लोकांना साधा न्याय किंवा सुरक्षा मिळत नाही. गाव गल्लीत कुठल्याही मुलीला घरातून बाहेर पडल्यास सुखरूप परत माघारी येण्याची हमी देता येत नाही. रोजच्या रोज देशभरात कित्येक मुलींवर बलात्कार होतात आणि त्यांचे मुडदेही पाडले जातात. पण त्यविषयी कोणा उच्चभ्रू वा अभिजन वर्गातील शहाण्याला फिकीर आहे काय? लाखो लोकांना सुरक्षा मिळू शकत नाही. अशा देशात व समाजात आविष्कार स्वातंत्र्य उपलब्ध नाही, म्हणून गळा काढला जात असतो. त्याच देशात हजारो कोटीची लूट करून विजय मल्ल्या फरार होतो. त्याला कायदा हात लावू शकत नाही, अशी दुबळी कायदा व्यवस्था झाली आहे. हजारो कोटी रुपयांची लूट करून चिटफंडवाले उजळमाथ्याने जगत असतात. त्यांचा बाल कोणी बाका करू शकत नाही.

इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. अत्याचार आसिफावरचा असो किंवा ट्विंकलवरील असो, तो अत्याचारच असतो आणि त्यात भरडली जाणारी बालिका अबला म्हणूनच चिरडली जात असते. तिची जात धर्म वा त्वचा वर्ण यामुळे तिच्यावर अन्याय होत नसतो. दुबळेपणा हा तिचा गुन्हा असतो आणि म्हणून सबळांना आपल्या मर्दुमकीचे प्रदर्शन मांडण्याची भेकड संधी मिळत असते. जे बेछूट तो गुन्हा करतात व पचवतात, ते प्रतिष्ठित असतात आणि पकडले जाणार्‍यांवर राक्षस म्हणून आरोप करणारे देव वगैरे नसतात. ते पकडले जात नाहीत म्हणून सभ्य असतात व त्याच सभ्यपणाचा तमाशा मांडण्यासाठी आवेशपूर्ण आरोप करीत असतात, हनि इराणी ही जावेद अख्तर यांची पहिली पत्नी, तिने अलिकडेच आपण बाल कलाकार असताना कोवळ्या वयात सोसलेल्या अत्याचाराची कथा सांगितलेली आहे. तिचा अनुभव आजही शेकडो नव्या मुली चित्रसृष्टीत घेतच असतात. त्याविषयी कधी जाहीर चर्चा होते काय? काही वर्षांपूर्वी अशा गोष्टी चव्हाट्यावर आल्या त्यात पडद्यावर खलनायक म्हणून काम करणार्‍या शक्ती कपूरचे नाव होते. किती चित्रतारे तेव्हा आपण याच चित्रसृष्टीत असल्याची लाज वाटते असे सांगायला समोर आले होते? आसिफासाठी ज्यांचा जीव तिळ तिळ तुटतो, त्यांना तेव्हा शक्ती कपूरवर झालेल्या आरोपाचा अभिमान वाटला होता काय? उलट तेव्हा जो गौप्यस्फोट झाला त्यातल्या आरोपींच्या समर्थनाला एकाहून एक नामवंत कलावंत पुढे सरसावले होते. आसिफासाठी जो न्याय असतो, तोच ट्विंकल शर्मा आणि चित्रसृष्टीत नाडल्या जाणार्‍या मुलींच्या अब्रुसाठी गर्भगळित कशाला होतो? यातला दुटप्पीपणा लक्षात घेतला पाहिजे आणि यातले मायावी राक्षस ओळखले पाहिजेत.

आसिफाच्यावेळी सेक्युलर म्हणून रस्त्यावर आलेल्या चित्रपटतारका, नामवंत ट्विंकल शर्माच्यावेळी बिळात लपून राहतात तेव्हा ते स्वत:ला तर बदनाम करतातच पण त्याहीपेक्षा सेक्युलर या शब्दाला ठपका लावत असतात. स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणार्‍या व्यक्तींच्या अशा दुटप्पी वागण्यामुळेच देशात सेक्युलर वाद बदनाम झाला आहे. मुस्लीम, ख्रिश्चनांवर अन्याय झाला तर छाती बडवायची आणि हिंदूंवर मग तो असहाय्य, गरीब असला तरी गप्प रहायचे यातून सेक्युलरवाद म्हणजे हिंदूविरोधी अशी प्रतिमा या कथित सेक्युलरांनी करून दिली आहे. त्याचा फायदा हिंदुत्त्ववादी संघटनांनी करून घेतला आहे. त्यातून धार्मिक धुव्रीकरण होऊन आज सेक्युलर म्हणजे या देशात शिवी होऊन बसली आहे. सेक्युलर म्हणजे भला माणूस, अशी देशातील सर्वसामान्यांची कधी समजूत होती, आज सेक्युलर म्हणजे मुस्लीमधार्जिणा अशी त्याची व्याख्या होेऊ लागली आहे. एखादे विचार तत्त्व हे त्या विचाराच्या कार्यकर्त्यांकडूनच धुळीला मिळवले जाते. सेक्युलरवाद हा असाच त्याचे अवडंबर माजवणार्‍यांकडून नेस्तनाबूत झालेला आहे.

First Published on: June 12, 2019 5:31 AM
Exit mobile version