कंगना-गोखलेंचा देशद्रोह नव्हे काय?

कंगना-गोखलेंचा देशद्रोह नव्हे काय?

आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना दहशतवादी म्हणवणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्यानंतर मग बाई भारताला १९४७ मध्ये मिळाले स्वातंत्र्य ही भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, अशी बेताल बडबड सुरू आहे. कंगनाने हे वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. तिथे सूट बूट घालून आलेल्या अनेकांनी त्यावर टाळ्या वाजवल्या. या स्वातंत्र्यसैनिकांना तुम्ही समाजमाध्यमांवर जे व्हिडिओ व्हायरल झालेत त्यात टाळ्या वाजवताना पाहू शकता, तिथे एक व्हिडिओ असेल. बरं कंगनाने जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे एक आहे की हे लोक स्वातंत्र्य मिळालं हे मान्य करतात. नाहीतर कालपर्यंत हे भारताचं स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर मिळालेलं आहे. १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांची सत्ता पुन्हा येणार आहे, असंच सांगितलं जात आहे. त्यामुळे यासाठी कंगनाचं यासाठी आपल्याला स्वागत करावं लागेल.

कंगना जे काही स्वातंत्र्याबद्दल बोलली ते काही पहिल्यांदाच बोलली असं नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला बदनाम करण्यासाठी याआधी देखील अनेक प्रयत्न झाले. जे लोक स्वातंत्र्याचा अपमान करत आहेत ती एका विशिष्ट गटातली आहेत हे स्पष्ट आहे. या गटाला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु आदी नेते खुपतात. त्यांची यथेच्छ बदनामी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. विविध प्रकारचे नवनवीन पूर्वग्रह आणि खोटे पसरवले जातात, हे असे करणार्‍यांना माहीत असते. अशा प्रकारे कोट्यवधी लोक तयार झाले आहेत. पद्मश्री पुरस्कार विजेती कंगना रनौत हिचं विधान म्हणजे समाजात आधीच होत असलेल्या विधानांना व्यासपीठ देण्यासारखंच आहे. अशा पद्धतीची बेताल वक्तव्ये करायची आणि मुळ विषयांपासून भरकटवायचं हेच यामगचं उद्दीष्ट असतं. याचं कारण म्हणजे काहीजण महागाईचं पण समर्थन करतात. बरं महागाईचे समर्थन करणारे आकाशातून पडलेले नाहीत, तर या राजकीय प्रयोगशाळेत तयार झाले आहेत, जे केवळ वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमातच नव्हे, तर रस्त्याच्या चौकाचौकात आणि चहाच्या दुकानांवरही पाहायला मिळतात.

ऑक्टोबर महिन्यात कंगनाला झाशीच्या राणीच्या पात्रावर आधारित चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. उपराष्ट्रपतींनी हा पुरस्कार दिला, जे या देशाचं दुसरं सर्वोच्च घटनात्मक पद आहे. काही दिवसांनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पद्मश्री पुरस्कार देतात. राष्ट्रपती पद हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोन्ही संज्ञा स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झालेल्या संविधानातून घेतल्या गेल्या आहेत, हे वेगळे सांगायला नको. तुम्ही ही पदे आणि त्यांचे निर्णय राज्यघटनेपासून वेगळे करू शकत नाही. तसंच इथे बसलेले पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना वेगळे करता येणार नाही. झाशीच्या राणीने ब्रिटिश राजवटीशी लढताना हौतात्म्य पत्करले होते, याची जाणीव चित्रपट अभिनेत्रीला असेल. या वादग्रस्त मुलाखतीत कंगनाने झाशीच्या राणीची स्तुतीही केली, पण या स्तुतीच्या बदल्यात भीक मागून स्वातंत्र्य मिळालं, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं वक्तव्य करण्याचा परवाना मिळत नाही.

ज्या दिल्लीत हा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, त्याच दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना रनौत म्हणते की, आपल्याला भीक मागून स्वातंत्र्य मिळालं आणि खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं. तिच्या वक्तव्यापेक्षाही जास्त अपमानास्पद गोष्ट म्हणजे स्टेजखाली बसलेल्या लोकांच्या टाळ्या. कंगना स्वातंत्र्य भीक मिळालं असं म्हणाली. पुढे तिने या विधानानंतर माझ्यावर खटले होणार आहेत, असं वक्तव्य केलं. मग न्यूज अँकर म्हणते की तू आता दिल्लीत आहेस, मुंबईत तुझ्यासोबत असं होतं. कंगना दिल्लीत आहे, मुंबईत नाही, खरं तर हीच गोष्ट कंगनाच्या वक्तव्याला खासगीत पाहता येणार नाही हे स्पष्ट करते. या अँकरने दिल्लीला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं म्हणायला वाव आहे. दिल्लीत काही होणार नाही, प्रोत्साहन देण्यासाठी आणि दिल्ली तुमच्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी अँकर अशी बोलली असावी. याबाबत शंका असल्यास काही जुन्या घटनांकडे नजर टाका. दुसरे कोणी असते तर भीक मागून स्वातंत्र्य मिळाले या विधानावर देशभरात देशद्रोहाचे आणि यूएपीएचे गुन्हे दाखल झाले असते. भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक विचारवंतांना अटक करण्यात आली. यात गौतम नवलाखा, सुधा भारद्वाज, वरावरा राव असतील यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. फादर स्टॅन स्वामी यांचं तर तुरुंगात असताना निधन झालं. तर दुसरीकडे जेएनयूचा माजी विद्यार्थी आता काँग्रेसमध्ये असलेला कन्हैया कुमार, त्याचा सहकारी उमर खालिद यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करुन तुरुंगात डांबण्यात आलं. मात्र, आता कंगना ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीरांचा अपमान करतेय यावर मात्र केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसलं आहे.

कंगना ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या लढ्याला भीक म्हणत आहे, केंद्रातील मोदी सरकारने जाहीर भूमिका घ्यावी. २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये सांगितले होतं की, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित गाण्यांची स्पर्धा आयोजित केली जात आहे. पंतप्रधानांनी सांगावं की त्या गाण्यातून स्वातंत्र्याची भीक मागितली जात होती का? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलच्या पंतप्रधानांना साबरमतीत घेऊन गेले. त्या ठिकाणी चरखाचे महत्व समजावून सांगितलं. चरखा हे भिकेचं प्रतीक आहे का? गांधीजींनी भीक मागितली होती तर मग गांधींबद्दल आदर का दाखवताय? गांधीजींनी भीक मागण्याच्या गुन्ह्यासाठी ब्रिटिश राजवटीत सहा वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला होता का? जेव्हा कधी गांधी जयंती येते तेव्हा गोडसे झिंदाबाद जोरदार ट्रेंडिंग होत असतं. भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान नथुराम गोडसे देशभक्त होता आणि देशभक्तच राहणार असल्याचं म्हटलं होतं. गांधींच्या मारेकर्‍याला देशभक्त म्हणणार्‍या प्रज्ञा ठाकूरला भोपाळचे लोक मतदान करतात आणि संसदेत आल्यावर ती पुन्हा गोडसेला देशभक्त म्हणते. एकीकडे स्वातंत्र्य चळवळीतील वीरांबद्दल आदर असल्याचं दाखवायचं आणि दुसरीकडे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍यांचा हुतात्म्यांचा अपमान करायचा हा छुपा विचार कोणाचा आहे आणि कोण बळ देत हे लपून राहिलेलं नाही.
बरं कंगनाला माहीत नसलं तरी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अंतर्गत देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आज कंगना म्हणतेय २०१४ साली स्वातंत्र्य मिळालं उद्या अनेकजण येतील २०१४ नंतरच स्वातंत्र्य मिळाल्याचं छाती ठोकून सांगतील.

स्वातंत्र्याबाबत बोलल्यानंतर या कंगनाबाई एवढ्यावरच न थांबता आणखी चेकाळल्या. एकीकडे ज्यांनी त्यांना पुरस्कार दिलाय ते केंद्रातील मोदी सरकार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतानाही आपला २०१४ च्या स्वातंत्र्याचा मुद्दा कसा योग्य होता हे पटवण्यात अधिकच मग्न झाल्या. हे महत्व पटवताना या बाई चक्क महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाची खिल्ली उडवायला लागल्या आहेत. एक गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत नाही, हे नट्टापट्टा करताना स्वत:चेच गाल रंगविणार्‍यांनी, लेखक- दिग्दर्शकांच्या सांगण्यानुसार डायलॉग उच्चारणार्‍यांनी देशाला सांगावं, यापेक्षा मोठा विनोद नाही. बरं यानंतर विक्रम गोखले नावाच्या मराठी नटाने कंगना नावाचा वेताळ खांद्यावर घेताना धीरगंभीर चेहर्‍याने काहीतरी तत्वज्ञान मांडतो आहोत, असा आव आणत कंगना जे बोलली ते खरंच आहे. मी त्या वक्तव्याचं समर्थन करतो, असं म्हटलं. १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक म्हणून मिळालं आहे, त्या वक्तव्याला माझं समर्थन आहे. कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळालेलं नाही, ते भिकेनेच मिळालं आहे. स्वातंत्र्य ज्या योद्ध्यांनी मिळविण्याचा प्रयत्न केला, ते फाशीवर जाताना मोठे मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. ब्रिटिशांच्या विरोधात हे लोक उभे राहत आहेत, हे बघूनसुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही. असे लोक केंद्रीय राजकारणामध्ये होते, असं वादग्रस्त वक्तव्य गोखले यांनी केलं. बरं गोखले पितृस्थानी असल्याने ते काहीतरी विचार करूनच बोलले असतील, असे अवधूत गुप्ते नावाचे आणखी एक थोर वगैरे गायक, संगीतकार बोलले. ही सगळी मंडळी कुणाला खूश करण्यासाठी सत्य इतिहासाचे विडंबन करताहेत, हे सार्‍यांनाच माहिती आहे. बरं गोखले महाशयांनी मी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन का केलं याचं स्पष्टीकरण देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत असा काही आव आणून हे महाशय बोलत होते जणू काही या देशात तेच तत्वज्ञ आहेत आणि त्यांनाच सर्व इतिहास माहिती आहे. या महाशयांनी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन का केलं हे पटवून सांगताना २०१४ सालचा गार्डीयन या वृत्तपत्राचा दाखला दिला. बरं त्यात काय लिहिलं आहे हे काही या गोखले महाशयांनी सांगितलं नाही. असो.

देशभक्ती कोणत्याही पारतंत्र्यात असलेल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातून सुरू होते. प्रत्येक देशभक्त जगात आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा अभिमानाने छाती फुगवून सांगतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाले असे म्हणणे ही देशाची जगासमोर नाचक्की आहे. यापेक्षा देशद्रोह वेगळा तो काय? आता स्वातंत्र्य मिळालेच नाही तर भीक मिळाली असं म्हणणार्‍यांबद्दल काय बोलणार?

First Published on: November 20, 2021 6:05 AM
Exit mobile version