कादंबरीकार काशीबाई कानिटकर

कादंबरीकार काशीबाई कानिटकर

काशीबाई कानिटकर म्हणजे आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका. आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी, चरित्र आणि कथा या साहित्यप्रकाराचे महिला म्हणून प्रथमता लेखन केले आहे. काशीबाई या पंढरपूरचे कृष्णराव बापट यांच्या कन्या. त्यांचा जन्म २० जानेवारी १८६१ रोजी सातारा जवळील अष्टे या गावी झाला. त्यांच्या दोन भावांना शिकवायला पंतोजी येत, ते ऐकून, बघून त्या माहेरीच लिहायला शिकल्या. त्याकाळात स्त्रीशिक्षणाला विरोध होत असे. पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्या अशा पद्धतीने शिकल्या. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली. तत्पूर्वी वयाच्या ९ व्या वर्षी काशीबाईंचे लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झाले. ते सुधारणावादी होते.

हरिभाऊ आपटे, न्या. रानडे यांच्या सहवासामुळे स्त्रियांनी शिकावे अशा विचारांचे ते होते. पण उघडपणे त्याकाळात काशीबाईंचे शिक्षण सुरू ठेवण्याची सोय नव्हती. पण तरीही काशीबाई टीका सहन करीत चोरून मारून शिकत, वाचत राहिल्या. गोविंदरावांसोबत त्या रविवारी दुपारी प्रार्थनासमाजातील सभांना जात असत, चर्चेत भाग घेत असत. घरी समजले की खूप गहजब होत असे. मग त्यांच्यावर घरातील अवघड व श्रमाची कामे लादण्यात येत असत. पण ते काहीही असले तरी त्यांना या प्रार्थना समाजातील व्याख्याने ऐकून शास्त्रीय विषयांची गोडी लागली. त्यांनी मराठीतील प्राथमिक शास्त्रीय पुस्तके वाचली.

तसेच मंडलिकांचा इतिहास, अर्थशास्त्र, कादंबरीसह भारतसार व पेशवे, होळकर, पटवर्धन, शिवाजी महाराज इ. बखरीही त्यांनी वाचल्या. याशिवाय कुमारसंभव, किरातार्जुनीय, मेघदूत या संस्कृत नाटकातील बरेचसे श्लोक त्यांनी तोंडपाठ केले होते. शाकुंतल, वेणीसंहार, मृच्छकटिक, मुद्राराक्षस इ. संस्कृत नाटकांचे वाचनही त्यांनी केले होते. इंग्रजीही त्या शिकत होत्या. गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी मिळून मनोरंजन आणि निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले.

मनोरंजन, नवयुग आणि विविधज्ञानविस्तार आदी मासिकांमधून काशिबाईंचे स्फुटलेखन प्रसिद्ध झाले आहे. रंगराव (१९०३) व पालखीचा गोंडा (१९२८) या कादंबर्‍या आणि शेवट तर गोड झाला (१९८९), चांदण्यातील गप्पा (१९२१), शिळोप्याच्या गोष्टी (१९२३) हे कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. डॉ.आनंदीबाई जोशी :चरित्र व पत्रे या चरित्रात्मक पुस्तकाने साहित्यात त्यांना बरीच ख्याती मिळाली. हरीभाऊंची पत्रे हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

डॉ. आनंदीबाईंच्या चरित्र लेखनाला हात घालण्याची आपली कुवत नाही, असे प्रामाणिकपणे म्हणतच, इंग्रजी शिकत, आनंदीबाईंसंबंधी देशभगिनीने लिहिणे कर्तव्य आहे या भावनेने त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशींचे चरित्र लिहिले. काशीबाईंचे लेखन हे अनुभवावर आधारित असल्याने प्रत्ययकारी आहे. वर्णने लांबलचक, तपशीलवार असतात. पण त्यातही त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्तीच प्रत्ययाला येते. १९०६ मध्ये पुणे येथील ग्रंथकार संमेलनाचे गोविंदराव कानिटकर अध्यक्ष होते. त्या संमेलनाला त्या एकट्या स्त्री लेखिका उपस्थित होत्या. १९०९ मध्ये वसंत व्याख्यानमालेत काशीबाई अध्यक्ष होत्या.

त्या पहिल्या स्त्री अध्यक्षा ठरल्या. पुणे सेवासदन संस्थेच्या स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग होता. रमाबाई रानडे सेवासदनच्या अध्यक्षा तर काशीबाई उपाध्यक्षा होत्या. पंडिता रमाबाईंबरोबर काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाला हजर असणार्‍या आठ महिला सदस्यांपैकी महाराष्ट्रातील एकमेव हिंदू महिला-काशीबाई उपस्थित होत्या. अशा या महान लेखिकेचे ३० जानेवारी १९४८ रोजी निधन झाले.

First Published on: January 20, 2021 6:04 AM
Exit mobile version