किंगमेकर

महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना -भाजप युतीचा मुख्यमंत्री बसून सत्ता आली त्यावेळेला सत्तेचा रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती होता. हा रिमोट कंट्रोल इतका पॉवरफुल्ल होता की त्याच्या प्रभावाखाली येऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी बाळासाहेबांचे शोफर व्हायलाही तयार असल्याचे त्यांनी जाहीररित्या म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग झाला होता. शिवसेना- भाजपची सत्ता आली त्यावेळेला मुख्यमंत्रिपदावरून शरद पवार यांना पायउतार व्हावे लागले होते.

आता त्याच शरद पवारांनी भाजपला सत्तेपासून दूर लोटताना आपली राष्ट्रवादी आणि सोनियांची काँग्रेस यांना साथीला घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसवले. अर्थात ते करताना त्यांना अनेकदा आपल्या चाणक्यनीतीचा प्रत्यय द्यावा लागला. तेवीस तारखेला भल्या सकाळी फडणवीस अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर धूर्त, चाणाक्ष आणि चाणक्यनितीने राजकारण खेळणार्‍या पवारांनी त्यादिवशी प्यादी अशी काही हलवली की अख्खा महाराष्ट्र आणि सारा देश अवाक् झाला. 79 वर्षांच्या पवारांच्या पायाला गेले वीस दिवस दुखापतीने हैराण केले, पण तरीही सत्तेचा किल्ला त्यांनी नेटाने लढवला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर जरी आपल्या मित्राचा स्व.शिवसेनाप्रमुखांचा मुलगा बसला असला याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. पवारांच्या मागच्या अनुभवांमुळे त्यांच्या जुन्या काँग्रेस पक्षाची भूमिका सावध आहे.त्यांना खरा ‘किंगमेकर’ मीच आहे हे पवारांनी दाखवून दिले आहे.शिवाजी पार्कवर सगळ्या मान्यवरांच्या शेवटी आगमन झालेल्या पवारांच दर्शन होताच उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांचा गलका करून मराठी मुलखाचा ‘किंग मेकर’दुसरा तिसरा कुणी नसून फक्त शरद पवारच असल्याचे आपसूकच जाहीर करून टाकले.

First Published on: November 29, 2019 6:48 AM
Exit mobile version