पतंगाला भावना असतात; ते व्यक्त होतं!

पतंगाला भावना असतात; ते व्यक्त होतं!

गेल्या कित्येक वर्षांपासून अवकाशात भरारी घेणारं पतंग दिसलं नाही. मात्र, या पतंगीच्या छटा अंतरी अजूनही ताजेतवाने आहेत. सध्या पत्रकारितेच्या अवकाशामध्ये आयुष्याच्या पतंगाने भरारी घेतली आहे. कधीकधी सामाजिक आणि राजकीय मुल्यांची पतंग कापली जातात तेव्हा हे पतंगही हवेत डुलक्या मारायला लागतं. पतंगालाही भावना असतात. ते हळवं असतं. त्यालाही त्रास होतो, जेव्हा कुठलंतरी दुसरं पतंग कुरघोडी करून त्याचा धागा कापतो, नव्हे नव्हे त्यालाच कापतं, तेव्हा या सजीव पतंगाच्या अंतरी मोठी जखम होते. ही जखम भळभळणारी असते आणि लेखणीतून वेदना व्यक्त करते.

आज मकरसंक्रांत! या सणाचं आणि माझं एक वेगळं असं नातं आहे. लहानपणी सुरतच्या गल्ल्या-गल्यांमधून कापलेली पतंग पकडण्यासाठी मोठी तारांबळ उडायची. मकरसंक्रांतच्या पंधरा दिवसांअगोदरच पतंगाचे वेड अंगामध्ये संचारायचं. गल्लीतील माझ्यापेक्षा मोठ्या वयाची दादा मंडळी पतंग उडवायला देतो, असं आमिष दाऊन धाग्याची फिरकी पकडायला सांगायची. पतंग कापलं गेलं की, या मंडळींसोबत जीव तुटेस्तोर पळायचो. कापरेली पतंग कधी हातात आली किंवा पकडली, असं मला कधीच आठवत नाही. पण, मी आपणहून त्या पतंगीला पकडण्यासाठी धावत जायचो. हातात पतंग नाही आलं तरी मी कधीच नाराज झाल्याचे मला आठवत नाही. पतंगीसाठी कितीही खटाटोप केला, तरी पतंग मिळत नसे. पतंग मिळाले तर उडवता येत नसे. परंत, त्यावेळी माझ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच तेज जाणवायची, असं माझी आई सांगते. प्रचंड जिद्द आणि चिकाटी त्या डोळ्यांमध्ये जाणवायची.

गुजरातमध्ये मकरसंक्रांतीची एक वेगळी अशी परंपरा आहे. या दिवशी प्रत्येक घराच्या गच्चीवर छोट्यांपासून मोठ्या लोकांची पतंग उडविण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी लोकांमध्ये एक वेगळा असा उत्साह असतो. या सुवर्ण क्षणांचा आस्वाद मिळणं म्हणजे एक अल्हादच! तसा माझा जन्म महाराष्ट्रातलाच. पण, माझं बालपण गुजरातमध्येच गेलं. या गुजरातने खुप काही दिलं. बालपणीच्या आठवणींच्या कप्यांमध्ये मकरसंक्रांतची आठवण ही फार आगळीवेगळी आहे. हे असं आपल्यासोबत नेहमी घडत असतं. दररोजच्या जडणघडणीतील काही घटना, काही क्षण असतात असे, जे मनाच्या खोलवर रूतलेल्या स्मरणशक्तिच्या कप्यामध्ये साचले जातात. हा स्मरणशक्तीचा कप्पा वेळोवेळी त्या क्षणांची आठवण करून देतो आणि त्या आठवणींमध्ये आपण न्हाऊन निघतो. आपल्यालाही पुन्हा त्या क्षणांमध्ये रममान व्हायचे असते. परंतु, आता आपल्या आयुष्यरूपी पतंगाने जमिनीपासून फार लांबवर भरारी घेतलेली असते. दिवसामागून दिवस निघत जातात आणि या पतंगाच्या फिरकीमधून धागा सूटत जातो. या धाग्यासोबत आयुष्याचे पतंगही लांब लांब उडत जातं. या पतंगाला हवेत मुक्तपणे उडण्यासाठीही अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. अनेक वादळ येतात. हे वादळ पेलताना पतंग हवेत गिरक्या देखील मारायला लागतं. परंतु, परिस्थितीनिरूप धागा सैल सोडायचा की मागे ओढायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो.

First Published on: January 15, 2019 2:17 PM
Exit mobile version