कोकणच्या शाश्वत विकासाचे पथदर्शी मॉडेल!

कोकणच्या शाश्वत विकासाचे पथदर्शी मॉडेल!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची चर्चा सुरू झाली की, पर्यावरणाचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येतो आणि विकासाची कास सोडून आपण भलतीकडेच भरकटतो. पर्यावरण समतोल अबाधित राखून विकास हे खरे तर एक मोठे आव्हान आहे. मात्र बांबू हे या जिल्ह्याचे असे एक वरदान आहे की, मुबलक नैसर्गिक उपलब्धता, पुनर्निर्माणाची अद्भूतशक्ती, रोजगाराची प्रचंड क्षमता व शून्य प्रदूषण याद्वारे खर्‍या अर्थाने विकासाचा मार्ग चोखाळणे शक्य आहे. याचा पथदर्शी आयाम म्हणजे २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी ‘कॉनबॅक’ संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्तीशी मनुष्यबळाचा मेळ घातला. विकासाची कास धरली. विशेष म्हणजे आज ही बांबू चळवळ उद्योगाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचली आहे.

जगभरात ‘मेक इन जपान आणि जर्मनी’ यांची सर्वच क्षेत्रात मोठी क्रेझ आहे. ‘मेक इन चायना’ हा आपल्या जीवनाचा दुर्दैवाने अविभाज्य भाग आहे. पण या सर्व देशातील उत्पादनांनी जगावर गारुड करण्याचे खरे गमक शोधायचे तर त्या देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाप्रती, आपल्या कामाप्रती ठेवलेली निष्ठा, उपलब्ध साधन सामुग्रीचा केलेला प्रभावी वापर व त्यास अनुसरुन आपल्या जीवनात केलेली अविरत मेहनत यालाच द्यावे लागेल. कोकणातील सर्वांत मोठी उपलब्धी म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे विपुल वरदान होय. त्याचा प्रभावी व पुरेपुर वापर करणे हीच खरी विकासाची किल्ली आहे. मात्र त्यासाठी गरज आहे ती दूरदृष्टीची, चाकोरीबाह्य विचारांची, सखोल संशोधनाची, आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांची, अथक प्रयत्नाची आणि सातत्यपूर्ण कृतीची. याचा पथदर्शी आयाम म्हणजे २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी ‘कॉनबॅक’ संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्तीशी मनुष्यबळाचा मेळ घातला. विकासाची कास धरली. विशेष म्हणजे आज ही बांबू चळवळ उद्योगाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची चर्चा सुरू झाली की, पर्यावरणाचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येतो आणि विकासाची कास सोडून आपण भलतीकडेच भरकटतो. पर्यावरण समतोल अबाधित राखून विकास हे खरे तर एक मोठे आव्हान आहे. मात्र बांबू हे या जिल्ह्याचे असे एक वरदान आहे की, मुबलक नैसर्गिक उपलब्धता, पुनर्निर्माणाची अद्भूतशक्ती, रोजगाराची प्रचंड क्षमता व शून्य प्रदूषण याद्वारे खर्‍या अर्थाने विकासाचा मार्ग चोखाळणे शक्य आहे. २० वर्षांपूर्वी सांगितले असते की बांबू हे या जिल्ह्याच्या भविष्याचा एक महत्त्वपूर्ण आधार देणारे साधन आहे, तर कदाचित त्याला मुर्खात काढले असते. पण गेल्या १६ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर, खर्‍या अर्थाने आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेली बांबूची ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची छुपी अर्थव्यवस्था ‘मेक इन सिंधुदुर्ग’च्या उभारणीत केवळ तात्पुरता टेकू देणारी नव्हे तर या जिल्ह्याच्या आर्थिक उभारणीतील प्रमुख आधारस्तंभ असेल हे मांडण्याचे धाडस मी अनुभवाअंती करत आहे. अर्थात २० वर्षांचे सातत्यपूर्ण विचार मंथन व सलग १६ वर्षांची या चळवळीतील कार्यकर्त्यांची चाकोरीबाह्य धडपड व कारागिरांची निष्ठा हेच या धाडसामागचे सत्य आहे.

बांबू ही तृणप्रधान वनस्पती असून ती फुटवा आल्यानंतर ३ महिन्यात पूर्ण वाढ होते आणि ३ वर्षांत परिपक्व होते. बांबू या वनस्पतीची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ठ्ये म्हणजे त्याच्या लागवडीनंतर ती साधारणत: ४० ते ६० वर्षांपर्यंत निरंतर पीक देतो. त्यामुळे परिपक्व बांबू कापल्यानंतर त्याला अधिक जोमाने फुटवे येतात व ते जसे कापाल तसे अधिकाधिक वाढत जातात. त्याच्या या दुर्मिळ गुण वैशिष्ठ्यामुळे बांबू व त्याच्या साहित्याला जगात पर्यावरण पूरक साहित्य म्हणून खूप मोठी मागणी आहे. दुसरे बांबूचे वैशिष्ठ्य म्हणजे इतर झाडांच्या तुलनेत ही वनस्पती एक हेक्टर लागवडीच्या क्षेत्रात २०० टन कार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेते. तर इतर झाडांच्या तुलनेत १५० टन जास्त ऑक्सिजन देते. जगभरात होणार्‍या वाढत्या प्रदूषणाच्या बाजूचा विचार करता बांबू खूप उपयोगी ठरू शकतो. बांबूचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे बांबू व इतर जंगलातील लाकूड यांची तुलना करावयाची झाल्यास बांबू हे योग्य प्रक्रियेनंतर कोणत्याही पारंपरिक लाकडापेक्षा अधिक बळकट, टिकावू व लवचिक साहित्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

जगात वर्षाला ३६ अब्ज डॉलर्सचा (सुमारे २५२० हजार कोटी रु.) मूल्यवर्धीत बांबू व्यवसाय होत असतो. बांबूचे १५०० अधिकृत वापर असून जन्मापासून मरणापर्यंत बांबूचा वापर अनादी काळापासून चालत आलेला आहे. चीन, जपान, जर्मनी, व्हिएतनाम, कोलंबिया या देशांनी बांबू क्षेत्रात औद्योगिक क्रांती घडवून आणली आहे. यामध्ये बांबू हस्तकलेपासून, फर्निचर व बांबूच्या पर्यावरण पूरक अत्यंत किमती मूल्य असणार्‍या वस्तूंचा समावेश होतो. कोलंबियासारख्या देशामध्ये अती भव्य स्वरुपाच्या बांबूच्या इमारती हे गर्भश्रीमंतीचे प्रतीक मानले जाते. या देशात २५ वर्षांपूर्वी उभारलेला १७० फूट लांबीचा बांबूचा पूल आजही अस्तित्वात असून त्यावरून ३ टन वजनाच्या गाड्यांची वाहतूक होते. स्पेनमधील मॅन्डीट हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांबूपासून उभारण्यात आले आहे. जपानमधे फुटबॉल स्टेडियम बांबूपासून उभारण्यात आले आहे.

भारतीयांच्या सर्वसाधारण कल्पनेनुसार हस्तकला, टोपल्या आणि स्थानिक पातळीवरील किरकोळ वस्तू यापुरताच बांबूचा उपयोग होतो. मात्र हे चित्र साफ चुकीचे असून बांबूतून फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. एकट्या भारतातील बांबू उद्योगाची वार्षिक उलाढाल २०४३ कोटी रुपयांची आहे. देशातील या व्यवसायाची क्षमता सुमारे ६५०६ कोटींची असून वार्षिक सरासरी वाढ १५ ते २० टक्के आहे. ग्रामीण रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला हा व्यवसाय मानला जातो. विशेषत: महिलांकरता हस्तकला क्षेत्रामधे या व्यवसायामुळे मोठी उलाढाल होते. याचा विचार करून केंद्र शासनाने राष्ट्रीय ‘बांबू मिशन’ या नावाने विशेष अभियानही सुरू केले आहे. आपल्या देशात आजही बांबू म्हणजे गरिबांच्या उपयोगितेचे साधन यापलिकडे आपली दृष्टी पोचलेलीच नाही. मात्र आता बांबूच्या लागवडीपासून मोठ्या व्यवसायाचा विचार राष्ट्रीय पातळीवर सुरू झाला आहे.

कोकण व विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सुप्त स्त्रोत आहेत की, जे या जिल्ह्याच्या ग्रामीण विकास, शेती व उद्योगाला वेगळे वळण देऊ शकतील. यात बांबू हे प्रमुख साधन मानता येईल. आपल्या देशात बांबू म्हटला की, केवळ उत्तर पूर्व राज्ये आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या क्षेत्राचाच प्रामुख्याने विचार केला जातो. यापासून मूल्यवृद्धी म्हणजे कागद उद्योग एवढेच आर्थिक गणित आजपर्यंत मांडले गेले आहे. मात्र कोकणातही अगदी मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. दमट हवामान हे बांबूसाठी अत्यंत पोषक मानले जाते. उत्तर पूर्व राज्यानंतर कोकण, सिंधुदुर्ग हे त्यासाठी देशातील दुसर्‍या क्रमांकाचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे तो लोकांच्या खाजगी क्षेत्रातील उद्योग आहे व याद्वारे येथील शेतकर्‍याला चांगले उत्पन्न मिळत आहे.

कोकण निसर्ग मंच या संस्थेने दुर्लक्षित साधन संपत्तीच्या माध्यमातून रोजगाराभिमुख उपक्रमासाठी २००० साली सुरू केलेली ही बांबू चळवळ आता कॉनबॅकच्या रुपाने बरीच प्रगल्भ व व्यापक झाली आहे. आज बांबू चळवळीच्या विकासाकरिता या संस्थेचे सहकार्य देशातील प्रत्येक राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतले जात आहे. त्रिपुरासारख्या केवळ बांबूच्या आर्थिक पाया असलेल्या राज्याने कॉनबॅक संस्थेशी हातमिळवणी करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मॉडेल आपल्या राज्यात उभारण्याचे ठरविले आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांनीही कॉनबॅकच्या मदतीने रोजगाराभिमुख कार्यक्रमात बांबूच्या उपक्रमांना स्थान दिले आहे.

विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणारी माणगा ही केवळ खाजगी क्षेत्रातच मुबलक उपलब्ध होणारी महाराष्ट्रातील किंबहुना, देशातील हा एकमेव अशी बांबूची जात आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरे तर ही छुपी अर्थव्यवस्था आहे. येथील शेतकरी त्याला २४ तास कधीही परतावा देण्याची खात्री असणारे फिक्स डिपॉझीट मानतो. सुदैवाने बांबूची वाढती मागणी व कॉनबॅक या संस्थेच्या बांबू विषयातील कार्य या सर्वाचा परिपाक म्हणून गेल्या १६ वर्षांत या लागवडीमध्ये सुमारे ५० पट वाढ झालेली आहे.

आज येथील शेतकरी केवळ आढ्यावर व बांधावर बांबू लागवड करतो आणि आंबा, काजूसारखी नगदी पिकांची शेती मोठ्या प्रमाणावर करतो. मात्र बदलते वातावरण व त्याचा होणारा या नाजूक पिकांवरील परिणाम अभ्यासण्यात आला. त्यानंतर आता आढ्यावरचा बांबू प्रगतशील शेतकर्‍यांनी काजू, आंब्याची पिके बाजूला टाकून प्रमुख शेती म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

बांबूचे लागवडीचे अर्थशास्त्र असे सांगते की, साधारणपणे एका एकरमधे तिची योग्य लागवड केल्यास सुमारे २५० ते ३०० पारंपरिक कंद लागवडीपासून तिसर्‍या वर्षापासून २५०० ते ३००० बांबू काठ्या मिळतात. आजच्या सर्वसाधारण दराने ५० रुपये प्रती काठीप्रमाणे १,२५००० रुपये एवढी प्रती एकर उत्पन्न मिळते. थोडी अधिक लागवडीत मेहनत घेतल्यास त्यात एकरी ४५० बांबू काठ्याएवढी वाढ होईल, अशी अलीकडेच कुडाळ येथे पार पडलेल्या बांबू कार्यशाळेत उपस्थित आंतरराष्ट्रीय बांबू अभ्यासक एन. भारती यांनी शास्त्रोक्त लागवडीतून बांबूच्या शेतीतून किमान ४ पट उत्पन्न मिळण्याची खात्री दिली आहे. जिल्ह्यातील पडीक परंतु लागवड योग्य सुमारे ६५ हजार हेक्टर जमिनीपैकी ५० टक्के जमिनीवर बांबू लागवड केल्यास जिल्ह्याच्या उत्पन्नात १००० कोटी रुपयांची भर पडेल. खर्‍या अर्थाने ‘मेक इन सिंधुदुर्ग’च्या दारिद्य्र निर्मूलनाचे पहिले पाऊल असेल.

अत्याधुनिक बांबू प्रक्रिया प्लांट संस्थेने कुडाळ येथे कार्यान्वित केला असून राष्ट्रीय बांबू मिशनने त्याला सहकार्य केले आहे. सर्वसाधारणपणे बांबू कीड अथवा वाळवी लागून खराब होत असल्याने आजपर्यंत बांबूच्या टिकाऊपणाला मोठ्या मर्यादा होत्या. मात्र संस्थेने बांबू प्रक्रिया प्रकल्प उभारुन ३० ते ५० वर्षांपर्यंत त्याचा टिकाऊपणा वाढविला आहे. तसेच बांबू आधारित सामाईक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा बांबू विषयाशी निगडित कारागीर महिला, बेरोजगार युवक, शेतकरी, बचत गट यांनी लाभ घ्यावा, असे अभिप्रेत आहे. आयआयटी, पवई व एनआयडी, अहमदाबाद या राष्ट्रीय नामांकीत संस्थेचे विशेष मार्गदर्शन याकरिता घेण्यात येत आहे. अत्याधुनिक हत्यारे व मोल्ड यामुळे सोपी, सुटसुटीत व कलात्मक कारागिरी निर्माण करून पारंपरिक बांबूच्या कलेला उभारी देण्याचा प्रयत्न या केंद्रावर केला जात आहे. संस्थेने सुबक बांबू चटया, बास्केट, डायरी, पेन व कोरीव वस्तू इत्यादींचे प्रशिक्षण देऊन या वस्तूंच्या बाजारपेठेची व्यवस्था करण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती वर्गामध्ये येणार्‍या व पारंपरिक बांबू हस्तकला उद्योगातून आपल्या कुटुंबाचे चरितार्थ चालवणार्‍या १२ हजार विशेषत: महिला कारागिरांची उपलब्धी आहे. यापैकी ९४ टक्के कारागीर कुटुंबे ही दारिद्य्ररेषेखाली आहेत. वर्षानुवर्षे या पारंपरिक उद्योगाच्या आधारे त्यांच्या जीवनमानात कोणताही सकारात्मक बदल घडलेला नाही. कॉनबॅकने आधुनिक, नावीन्यपूर्ण व तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाद्वारे या महिलांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी स्फूर्ती या केंद्र शासनाच्या समूह विकास योजनेअंतर्गत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प कुडाळ तालुक्यात हाती घेतला आहे. येत्या वर्षात त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतून कुडाळ तालुक्यातील 300 थेट पारंपरिक कारागीर सूक्ष्म उद्योजकाच्या वर्गवारीमध्ये प्रथमच प्रवेश करणार आहेत. बांबूच्या पारंपरिक उद्योगाचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

यानंतर जिल्ह्यातील १२ हजार पारंपरिक बांबू कारागिरांना दारिद्य्ररेषा ओलांडून सूक्ष्म उद्योजक म्हणून उभारी देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा मेक इन सिंधुदुर्गचा एक आधारभूत कार्यक्रम आहे. या उपक्रमाला आयकीया या जगातील सर्वात मोठ्या संस्थेसोबत जोडण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यात आहे. याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक इच्छुक महिलेला कायमस्वरुपी रोजगार मिळेल, अशी आशा आहे. याशिवाय कॉनबॅकने स्वतंत्र बांबू फर्निचर व प्रशिक्षण विभाग सुरू केला असून स्थानिक बांबूच्या वापरातून अत्यंत कलात्मक व भारदस्त फर्निचर बनविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी डेल्फ युनिव्हर्सिटी नेदरलॅण्ड या जागतिक नामांकीत डिझायनर संस्थेची मदत घेण्यात येत आहे. मुंबई, कोल्हापूर, गोवा राज्यातील हॉटेल्समधून बांबू फर्निचरसाठी मोठी मागणी येऊ लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य कारागिरांनी मालदीव येथे उभारलेले सिग्नेचर रेस्टॉरंट हे कॉनबॅकच्या मुकुटात मानाचा तुरा खोवणारे ठरले आहे. चीनप्रमाणे जगभरातील अनेक संस्थांनी काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. या सर्वांवर मात करीत कॉनबॅकने जान्स बांबूच्या साथीने हे काम मिळवत आणि ते पूर्ण करून सर्वांची शाबासकी मिळवली. अलीकडेच या रिसॉर्टचा शुभारंभ झाला. बांबू कारागिरीतील एक अद्भूत चमत्कार म्हणून त्याला सादर केले जात आहे. एकूण ७ डायनिंग पॉड व एक सेंट्रल पॉड अशी त्याची कलात्मक रचना असून जमिनीपासून ९ मीटर उंचीवर निळ्याशार समुद्राला प्रदर्शनी अशी या रेस्टॉरंटची रचना आहे.

कॉनबॅकने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०० लोकांना थेट रोजगाराची संधी दिली आहे. कॉनबॅकने सुरू केलेली ही चळवळ येत्या भविष्यकाळात देशातील बांबू उद्योगाच्या परिवर्तनाचा प्रवर्तक असेल. देशात बांबू आधारित शेतीच्या विकासातून हरितक्रांती व बांबू मूल्यवृध्दी उद्योगावर आधारित रोजगाराच्या सुवर्ण क्रांतीत सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रबिंदू असेल यात शंका नाही.

-मोहन होडावडेकर

First Published on: September 22, 2019 6:12 AM
Exit mobile version