सण साजरे करूया, पॉझिटिव्ह कोरोनाला निगेटिव्ह करूया

सण साजरे करूया, पॉझिटिव्ह कोरोनाला निगेटिव्ह करूया

संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोरोना व्हायरसचा मुक्काम पृथ्वीवर अजून किती दिवस, महिने किंवा वर्ष असेल हे इतक्यात सांगता येणार नाही. काही महिनाभरापूर्वी WHOने सांगितल्याप्रमाणे तो एड्ससाऱखा कदाचित आपल्या सोबतही राहील. नाहीतर त्याच्यावरील लस सापडली तर तो कायमचा संपेलही. पण या झाल्या सगळ्या जर तरच्या गोष्टी. पण यातच आपण आपल्या आयुष्याचे तब्बल पाच महिने घालवले यावर विश्वास बसत नाही. या कोरोनाच्या नावाचा जप करताना बघता बघता केव्हा हिवाळा, उन्हाळा संपला आणि पावसाळा उजाडला हे कळालंच नाही. कारण सगळ्याच घरात कोरोनाची मरगळ आहे. व्हायरसच्या भीतीने लोकांचे चेहरे सुतकी झाले आहेत.

आता तर आठवडाभरावर श्रावण येऊन ठेपला आहे. पण कोरोना काही जायचं नाव घेत नाही. मग वर्षातले पाच महिने कोरोनामागे घालवल्यानंतर उरलेले महिने म्हणा किंवा उरले सुरलेले आयुष्य अजून किती कोरोनाच्या धाकापायी वाया घालवायचं हे आता ठरवायला हवं. जसा काट्याने काटा काढतात तसाच या पॉझिटिव्ह कोरोनाला निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह व्हायला हवं. हे पॉझिटिव्ह होणं म्हणजे संसर्ग नव्हे तर श्रावणातल्या या पवित्र महिन्यात प्रत्येकाला आपल्यातली सकारात्मकता वाढवायला हवी. हाच एक उपाय उरला आहे आता. यासाठी प्रत्येकाने कोरोनाबरोबर लढण्यासाठी स्वत:मध्ये सकारात्मकता वाढवायला हवी. law of attraction चा नियम विसरून चालणार नाही.

कारण जसं वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो असं म्हटल जातं तसंच काहीसं या व्हायरसबाबतीत झालं आहे. याला कोरोना म्हणा नाहीतर कोविड-१९ म्हणा. शेवटी त्याला तुम्हा आम्हाला जिथे गाठायचं आहे तो गाठणारच. कारण तो हवेतूनही पसरतो म्हणतात. मग किती दिवस आपण हा कोरोनाचा लंपडाव खेळणार. कधी ना कधी त्याचा आपल्याशी आमना सामना होणारच. म्हणूनच आता त्याच्याशी लढायला त्याच्याबरोबर जगायला शिकायला हवं. श्रावणाच्या मुहूर्तावर तरी याचा शुभारंभ करायला हवा.

कोरोनाचे रडगाणे बंद करून प्रत्येक सण साजरा करायला हवा. पण आपल्याच घरात, पडवीत आणि अंगणात. तोही घरातील व्यक्तींबरोबर. सोशल डिस्टन्सिंग सांभाळत. नेहमीसारखा धूमधडाक्यात नाही. पण कडक शिस्तीत. कोरोनाला आपल्याला पॉझिटिव्ह करण्याची एकही संधी न देता त्याचीच साखळी मोडीत काढायची. ज्या कोरोनामुळे जीवाच्या भीतीने माणसं माणसांपासून दुरावली त्या व्हायरसला असाच एकटा पाडायचा. कोरोना कायमचा संपवण्यासाठी सरकारने, आरोग्य यंत्रणेने सांगितलेले नियम पाळायचे. कोरोना संसर्गाने नाही तर संपर्कामुळेच वाढतोय. त्याचं हे चॅलेंज स्वीकारत राखी, गणपती साजरे करायचे.

दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सणावारांचे त्याच उत्साहात त्याच जोशात स्वागत करायचे. त्यातही श्रावणातील पहिला सण असलेल्या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजाअर्चा करायची. मात्र, यावेळी ही पूजा मंदिरात किंवा रस्त्यावर नाग घेऊन बसणार्‍यांबरोबर नाही तर देवघरातील नागाच्या मूर्तीची करायची. तोच उत्साह कायम ठेवत रक्षाबंधनही साजरे करायचे. यावेळी मात्र भावाने आपले रक्षण करावे या उद्देशाने नाही तर सगळ्यांनीच कोरोनाच्या या काळात स्वतःबरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवावे या भावनेतून रक्षाबंधन साजरे करावे.

असेच स्वागत गणरायाचेही करावे. बाप्पा मोरया म्हणत विघ्नहर्त्या बाप्पाला कोरोनाला नष्ट करण्याचं साकडं घालावं. पण तेही सोशल डिस्टन्सिंग सांभाळत. कारण यावेळी मंडळांनाही कडक नियम पाळावे लागणार आहेत. ते ही आपल्या सुरक्षेसाठी. पण तरीही त्याने हिरमसून न जाता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायला हवा. तीच सकारात्मक ऊर्जा त्यातून सर्वांना मिळेल.

असेच सगळे सण साजरे करून कोरोनाची निगेटिव्हिटी संपवण्याची आज गरज आहे. कोरोना केव्हा जाणार हे माहीत नाही. यामुळेच आपल्या प्रत्येकाला आता नव्याने जगायला हवं. जे आहे ते स्वीकारून जगायला हवं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला. त्याला कितपत यश मिळाले हा प्रश्नच आहे. कारण कुठलीही गोष्ट बंद करून नवीन गोष्ट साध्य करणं कोरोनाच्या काळात आव्हानात्मक आहे. याच आव्हानाला स्वीकारायला हवे. पण आता तोंड पाडून जगण्यात काहीच अर्थ नाही. कारण तेवढा वेळ घालवून चालणार नाही. म्हणूनच या श्रावणापासूनच हा नवा शुभारंभ करायला हवा. कोणत्याही धर्माचा कुठलाही सण हा सकारात्मक वातावरण व भावना निर्माण करण्यासाठीच असतो. ईद म्हणा, ख्रिसमस म्हणा किंवा अगदी आपली मंगळागौर, भोंडला म्हणा. सणाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आनंदात असते. कारण वातावरणच सकारात्मक असतं. ते आजुबाजूचं नकारात्मक वातावरण बदलून टाकतं. त्यातही हिंदूंचे सर्व सण हे उत्साहीच आहेत. पूजाअर्चेबरोबरच त्यामागे अनेक वैद्यकीय कारणे तर आहेतच शिवाय ते ऋतूमानाशीही संबंधित आहेत.

यामुळे आजपासून येणारा प्रत्येक सण साजरा करायला हवा. भले त्याचं स्वरूप बदलले असेल. आता पूर्वीसारखे गणपतीला कोणाच्या घरीही जाता येणार नाही. पण तरीही व्हिडिओच्या माध्यमाने आपण हव्या त्या व्यक्तीच्या घरातील गणेशाचे घरात बसून दर्शन घेऊ शकणार आहोत. यावेळी कदाचित रक्षाबंधनाला बहीण भावाला भेटताही येणार नाही. पण हरकत नाही. दोघांच्या आरोग्यासाठी ते उत्तम असेल. व्हिडिओमधून भावाला ओवाळता येईल. तशीच राखीही त्याला प्रत्यक्ष बांधता आली नाही तरी अप्रत्यक्षपणे बांधता येईल. मंगळागौरीच्या वेळी अंगणाअंगणात धरले जाणारे फेरे यावर्षी कदाचित आपल्या घरातल्या हॉलमध्ये घ्यावे लागतील. त्याचा व्हिडिओ फॅमिली ग्रुपवर पाठवूनही मंगळागौर साजरी करता येईल. कोरोनाच्या या काळात अशाच प्रकारे सण साजरे करावे लागणार आहेत.

पण त्यामागच्या भावना मात्र त्याच भक्तीने ओथंबलेल्या असतील ज्या वातावरणाबरोबरच आपल्यातही सकारात्मकता निर्माण करतील. हीच पॉझिटिव्हीटी कोरोनाच्या पॉझिटिव्हीचं रूपांतर निगेटिव्ह करून टाकेल. पुढल्या वर्षी मात्र कोरोना जगात नावाला सुद्धा उरलेला नसेल. हीच पॉझिटिव्ह भावना वाढीस लावा आणि सण सुरक्षितपणे साजरे करत कोरोनाला हरवा.

First Published on: July 13, 2020 7:58 PM
Exit mobile version