आपलं प्रेम असंच आहे का ?

आपलं प्रेम असंच आहे का ?

ट्रेनमधले प्रेम

ट्रेनमधून बोरीवली ते चर्चगेट असा प्रवास करताना समोर बसलेलं एक जोडपं प्रचंड प्रेमात असल्याचं आढळून आलं. आजुबाजूच्या लोकांचं, गर्दीचं त्यांना भान नव्हतं. ते आपल्याच मस्तीच होते. त्यांचे ते चाळे बघून बाजूला बसलेले एक आजोबा प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांची ती अस्वस्थता मला जाणवत होती. अखेर आजोबांचा बांध फुटला. त्यांनी त्या जोडप्याला त्यांच्या चाळ्यांवरून खरे-खोटे सुनावून टाकले. अर्थात आजुबाजूची लोक त्या आजोबांसोबत असल्यामुळे त्या जोडप्याने स्वत:ला आवरते घेतले. त्यांचे चाळे बंद झाले. पण त्यांची कुजबूज सुरूच होती.

काही मिनिटांतच ती तरुणी, त्या तरुणावर भडकली. चार दिवसांपूर्वी केलेल्या व्हॉट्सअ‍ॅपला तू उत्तर का दिलं नाही, असा तिचा आक्षेप होता. तो तरुण तिची समजून काढण्याचा प्रयत्न करत होता. पण तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. एव्हाना त्यांच्यातील कुजबूज भांडणात परिवर्तित झाली होती. तोही तितक्याच आवेशाने भांडत होता. काही मिनिटांपूर्वी एकमेकांशी गुलूगुलू करणारे आता चक्क हात-घाईवर आले होते. तो तरुण, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण ती तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर प्रकरण वाढले. सांताक्रूझ स्टेशनवर ती तरुणी एकटीच डब्यातून उतरून निघून गेली. तो तरुण बिचार तोंड पाडून बसला होता. आता मात्र माझ्या आजोबांना रहावले नाही.

तोडक्या-मोडक्या हिंदीत त्यांनी त्या तरुणाला सुनावले. म्हणाले, ‘बेटा! प्रेम म्हणजे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून गुलूगुलू करणे नाही. तर प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे आहे. ती तरुणी तुला समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती, मग तिचे तुझ्यावर प्रेम कसे असू शकते. आम्ही काय तुमच्यासारखी प्रेम केली नाहीत. पण संसार केला. ५५ वर्षे एकमेकांपासून एक क्षणही वेगळे न राहाता संसार केला. त्याला प्रेम म्हणतात.’ आजोबांच्या या सल्ल्यानंतर तो तरुण खजील झाला होता. पण डब्यातील इतर लोकही शांत होती. स्वत:शीच संवाद साधत होती. कदाचित आपलं प्रेम हे आजोबांसारखे आहे ना, याचा धुंडाळून आढावा घेत होती.


-रोशन चिंचवलकर

First Published on: July 11, 2018 6:40 AM
Exit mobile version