प्रेम आणि घृणा

प्रेम आणि घृणा

जगप्रसिद्ध लेखक खलील जिब्रान यांची ‘प्रेम आणि घृणा’ या नावाची एक कथा आहे. तिचा आशय असा: एका स्त्रीने पुरुषाला म्हटले, माझं तुझ्यावर प्रेम आहे. पुरुष म्हणाला, ही माझी हार्दिक इच्छा आहे की मी तुझ्या प्रेमाच्या योग्य बनावे. मग स्त्रीने म्हटले, तर मग तुझं माझ्यावर प्रेम नाही का? पुरुषानं केवळ तिच्याकडे पाहिलं आणि मौन राहिला. यावर स्त्रीने ओरडायला सुरुवात केली, मला तुमचा तिरस्कार वाटतो, मी तुमची घृणा करते. आणि पुरुषाने म्हटलं, तर पुन्हा माझी हार्दिक अभिलाषा आहे की, मी तुझ्या घृणेलायक बनावे.

मला वाटतं प्रेम आणि घृणा या मानवी मनातल्या आदिम भावना आहेत. या दोन्हींना वगळून आपल्याला जगता येणार नाही. पण या भावनांचे अर्थ नीट कळले नाहीत, तर मात्र गैसमज आणि वितुष्ट निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. म्हटले तर प्रेम ही एक अनिवार्य बाब आहे, जी मानवी संस्कृतीला अधिक समृध्द करते. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला- मग ते स्त्री असोत की पुरुष, प्रत्येकाला वाटतं आपल्यावर लोकांनी प्रेम करावं. हार्दिक प्रेम करावं. प्रेम ही नात्याचा निकोप वंश वाढवणारी एक अपूर्व घटना असते. मानसिक जीवनाचा तो एक महत्त्वाचा अंश असतो. पण या प्रेमात महत्त्वाकांक्षेने, वर्चस्ववादी मानसिकतेने वा गैरसमजाने घृणा निर्माण झाली तर हिंसा, युध्द नि द्वेषाला प्रारंभ होतो. घृणा, राग माणसाला पशु बनवतो. घृणा क्रौर्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाते. जगाच्या इतिहासातली सगळी युद्धे नि नात्यातल्या दुराव्याचे तिरस्कार हेच एकमेव कारण राहिले आहे. हा तिरस्कार सत्तासंबंधातून, लिंगभावातून, वर्चस्ववादातून आकाराला येतो. तर असो.

मागच्या आठवड्यात आपण ‘जागतिक महिला दिवस’ अत्यंत उत्साहात साजरा केला. त्याआधीच्या असंख्य नकारात्मक घटनांच्या पार्श्वभूमीवर या दिवसाचे ‘सेलिब्रेशन’ अनेक अर्थाने महत्त्वाचे होते. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवणार्‍या अनेक महिलांचा जाहीर सन्मान झाला. तर सोशल मीडियातूनही बहुसंख्य पुरुष मंडळींनी आपापल्या परीने स्त्रियांविषयीची सद्भावना व्यक्त केली. काही का असेना या नव्या माध्यमामुळे आपल्या प्रिय व्यक्तीविषयी माणसं कृतज्ञता व्यक्त करायला लागले, ही गोष्टही मला महत्त्वाची वाटते. पण ‘महिला दिवस’ आहे म्हणून महिलांना करावे लागणारे दैनंदिन कर्तव्य चुकत नाहीच. शिवाय असा एखादा आपला ‘दिवस’ असतो हेच बहुसंख्य स्त्रियांना माहीत नसते. त्यांच्या जगण्याचे मूलभूत प्रश्नच इतके तीव्र असतात की, असे ‘बुद्धिजीवी सेलिब्रेशन’ करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते.

म्हणजे असे काही करणे हे परंपरागत चौकट तोडण्यासारखेच असते. बरं समाजमाध्यमातून उपहासाने फिरणारे फॉरवर्डेड मेसेज पाहिले की अद्यापही बहुतेक पुरुषांची परंपरागत मानसिकता बदललेली नाहीच हेही लक्षात येते. निर्भत्सनेचे आणि मत्सराचे कितीतरी डोळे आपल्या आजूबाजूला असल्याचे दिसते. हे असं का घडतं ? तर याचं मुख्य कारण हे की, पुरुषाचे वर्चस्व मान्य करून आपापले कार्यक्षेत्र निश्चित करणार्‍या स्त्रियांना आपण स्वतंत्र आहोत ही जाणीवच होत नाहीय. ती तिच्या ‘स्त्री’ म्हणून असलेल्या भूमिकांना एवढी घट्ट चिकटलेली असते की, जणू काही तिचे शरीर, मन आणि बुद्धी ही फक्त पुरुषांसाठीच आकाराला आलेली आहे की काय? इतकी ती कुटुंबसंस्थेशी एकरूप झालेली असते. ‘बाईपणा’च्या सांकेतिक कल्पनेत तिला गुंतवून ठेवणे आणि तिच्या सगळ्या जैविक क्षमतांचा संकोच करणे हे आजवर पुरुषी व्यवस्थेने केले आहे.

‘मनुस्मृती’पासून ते आजच्या तथाकथित ‘चॅनलिस्ट’ धर्मगुरुंपर्यंत सर्वांनीच तिचे दुय्यमत्व अधोरेखित केले आहे. स्त्रीच्या भूमिकेचा, भावनांचा विचार न करता तिला सर्वार्थाने ‘गृहीत’ धरण्याची वृत्ती ही सर्वकाळात सारखीच राहिली आहे. स्वाभिमानाने जगणार्‍या दोन चार अपवादाकडे बघून सर्वच स्त्रियांच्या सामाजिक दर्जाबद्दल कोणतेच भाकीत करता येत नाही. स्त्रियांचे सार्वकालिक जगणे हे असेच शोषणयुक्त राहिले आहे. पुरुषांच्या लैंगिक समाधानासह त्याच्या कुटुंबाची वंशवेल वाढवणार्‍या स्त्रीला पुरुषांनी कधीच स्वतःचा अवकाश निर्माण करू दिला नाही. भाषिक, सांस्कृतिक दबावातूनच ती ‘स्त्री’ म्हणून घडत जाते. अशावेळी तिला तिचा आत्मस्वर लाभावा. तिला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची ओळख व्हावी या हेतूने जगभर ‘महिला दिवस’ साजरा होतो.

याहीवर्षी तो तसा झाला. वर्तमानपत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी स्त्रीच्या श्रेष्ठत्वाचा समंजस गौरव केला. पण जोपर्यंत आपण स्त्रियांना संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्य देणार नाहीत, तोपर्यंत तिचे जगणे ‘अर्थपूर्ण’ होईल असे वाटत नाही. स्त्रियांचा सार्वजनिक वावर वाढला, तिचे क्षेत्र विस्तारले म्हणजे ती पुरुषांच्या बरोबरीने आली असा अर्थ होत नाही. कौटुंबिक पातळीवर पुरुषांना क्षुल्लक वाटणारी एखादी गोष्टही तिच्या आत्मसन्मानावर आघात करू शकते. अगदी उदाहरण देऊनच सांगायचे तर मागच्या महिन्यात रिलीज झालेला आणि बर्‍यापैकी चर्चा झालेला ‘थप्पड’ हा सिनेमा होय. सिनेमा हे समाज वास्तवावर भाष्य करणारे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पुस्तकांपर्यंत पोहचू न शकणारी माणसे सिनेमापर्यंत नक्कीच पोहचतात असे मला वाटते.

तापसी पन्नू ही गुणी अभिनेत्री या सिनेमाची नायिका आहे. तिने अमृता ही व्यक्तिरेखा साकारली आहे. उत्तम नर्तिका असूनही परस्पर सामंजस्याने तिने गृहिणीची भूमिका स्वत:कडे घेतलीय. तिचे नवर्‍यावर उत्कट प्रेम आहे; पण व्यावसायिक ताणात असलेल्या नवर्‍याकडून जेव्हा चारचौघात तिच्या गालावर ‘थप्पड’ पडते, तेव्हा तिच्या स्वभिमानाला तीव्र धक्का बसतो. नवर्‍याने बायकोला एखादी चापट मारणं ही आपल्या सामाजिक संरचनेतील अगदीच किरकोळ किंवा अदखलपात्र बाब आहे. पण ही ‘थप्पड’ जेव्हा स्वतंत्र विचार करू पाहणार्‍या संवेदनशील स्त्रीच्या गालावर पडते तेव्हा तिच्या मनावर खोल आघात होऊ शकतात. मात्र ही जाणीव पुरुषाला असतेच असं नाही.

या सिनेमात एक संवाद आहे. जो आपण स्त्रीला किती गृहीत धरतो यावर भाष्य करतो. सिनेमात मोलकरीण असलेल्या सुनीताला तिचा नवरा थप्पड मारतो. तेव्हा ती नवर्‍याला विचारते, मने मारे क्यूं है? त्यावर तो म्हणतो, तने मारनेको लायसन्स थोडी लागत है मने? म्हणजे स्त्रीला मारहाण करणं, तिचं मानसिक, शारीरिक शोषण करणं हा जणू पुरुषांचा जन्मजात अधिकार आहे असंच पुरुषांना वाटतं. अमृता मात्र तशी नाही. नवर्‍याने मारलेली थप्पड तिला अंतर्बाह्य उन्मळून टाकते. ती घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहचते. एक कानाखाली मारली म्हणून काय बिघडलं? किंवा थोडा बर्दाश्त करना सिखना चाहिये औरतोंको असे आवाज तिच्यापर्यंत पोहचतात. पण ती इतर स्त्रियांसारखा विचार करत नाही, हे तिचे वेगळेपण आहे. ती प्रेमभावाकडे, नातेसंबंधाकडे अंतर्मुख होऊन बघायला लावते. आणि तिच्या ‘थप्पड’ चे प्रतिध्वनी आपल्याही कानावर आदळत राहतात. प्रेम आणि घृणा ही दोन आदिम टोकं आहेत माणसाच्या जगण्याची. एकमेकांना समजून घेणं आणि माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करणं जोपर्यंत आपल्याला जमणार नाही, तोपर्यंत ‘महिला दिवस’ वगैरे आपल्या सांस्कृतिक व्यवहारातली केवळ औपचारिकताच ठरेल.

— पी. विठ्ठल 
.

First Published on: March 15, 2020 5:18 AM
Exit mobile version