चूक कसली, ही तर घोडचूक !

चूक कसली, ही तर घोडचूक !

आता हातातून सारं निसटल्यावर मुनगंटीवार झोपेतून उठल्याचं सोंग घेऊ लागले आहेत. काही नेते भलतेच कापर असतात, पाण्यात उडी घेऊनही ते स्वतःला सुकं असल्याची खात्री देण्याचा प्रयत्न करत असतात. मुनगंटीवारही त्यातलेच. सारं करून सवरून मी नाही त्यातला असं ते दाखवू पाहत आहेत. चांगलं बहुमत असतानाही सत्ता मिळू शकली नाही, याची सल भाजपच्या नेत्यांना नव्या सरकारने आपल्या कारभाराची चुणूक दाखवून दिल्यावर पडू लागली आहे. शिवसेना कुठल्याही थराला जावू शकते याची जाणीव भाजपच्या प्रत्येक नेत्याला होती. सत्ता असतानाच्या जुलुमानेच हे जाणवून दिलं होतं. याच जुलुमाचा आधार घेत नको ती सत्ता असं म्हणण्याची वेळ सेनेवर भाजपने आणून ठेवली होती. तेव्हा मुनगंटीवार यांचा धर्म कुठे होता? आज भले भले नेते बोलू लागले आहेत. तेव्हा फडणवीसांना थांबा म्हणून सांगण्याची कोणात हिंमत नव्हती. आज बोलून उपयोग काय? ती हिंमत वेळीच दाखवली असती तर त्याचा निश्चित उपयोग झाला असता.

खोटेपणाचा कळस झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केल्यावर भाजपचे एकूणएक नेते सेनेवर तुटून पडले होते. जबाबदारीची जराही जाणीव नसलेले नेते सेनेवर वायफळ टीका करत होते. या टीकेतून ते स्वतःचा पक्षातील खांब मजबूत करण्याच्या प्रयत्नाला लागले होते. आपल्याशिवाय पर्यायच नाही अशा मिजाशित वावरणार्‍या भाजप नेत्यांच्या मनोबलाला मोदी मीडियाने असं काही डोक्यावर घेतलं होतं की राज्यात सत्ता स्थापनेचे सगळे पत्ते हे केवळ भाजप नेत्यांच्याच हाती आहेत, अशा गमजा मारल्या जात होत्या. खरं तर हा उथळ आगाऊपणा होता, पण कोणी तो दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याला झोडझोड झोडायचा हा एक कलमी कार्यक्रम मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील पत्रकारांनी हाती घेतला होता. संयमाची मात्रा कधीही चांगल्याच मार्गाला नेत असते, पण भाजप नेत्यांच्या गावी संयम नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याने त्याचे परिणाम त्या त्या वेळी दिसत होते. तरीही थांबण्यास नेते तयार नव्हते.

सगळ्यात कहर म्हणजे उद्धव ठाकरे यांना खोटं पाडण्याच्या कृत्याचा होता. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासल्याचा अनुभव सेनेसाठी फार जुना नव्हता. ठरल्याप्रमाणे मंत्रिपदं न देणं, पद द्यायला लागू नये म्हणून महामंडळे अखेरपर्यंत कुजवत ठेवणं, अधिकार आणि हक्क असूनही विधान परिषदेत कोटा न ठेवणं या सगळ्या बाबी भाजपविषयी असूया निर्माण करणार्‍या होत्या. याचा जाब विचारायची संधी शिवसेना शोधत होती. पार पडणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ती आयतीच मिळाली. स्थानिक नेते विश्वासपात्र नाहीत, याची खात्री पटल्याने जे काही ठरवायचे ते भाजपच्या केंद्रीय नेत्याला घेऊनच, असा निश्चय सेनेने केला. ही जबाबदारी आपसूक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा यांच्यावर आली. बैठक पार पडली ती मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन घेऊन. जी चर्चा विश्वासाच्या कारणाने होऊ शकत नव्हती ती मुख्यमंत्रिपदाविना उरकली यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. अगदी रंगशारदात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतही अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली.

असं असताना मुख्यमंत्रिपदाची चर्चाच झाली नाही असं भाजपचे नेते कुठल्या तोंडाने सांगत होते? उद्धव यांना खोटं पाडण्यासाठी भाजपचे धुरीण एकजात बाहेर पडले होते. या नेत्यांची बोलती इतकी वाढली की युती नाही झाली तरी चालेल, अशा ठाम मतापर्यंत शिवसेना आली होती. या सगळ्या घटनांचे सुधीर मुनगंटीवार स्वतः साक्षीदार होते. आपले नेते खोटं बोलत आहेत, हे त्यांना तेव्हा चांगलं ठावूक होतं, पण कबूल करण्याची हिंमत ते दाखवू शकले नाहीत. पक्षाची सारी कमान एका फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांना दुखावण्याची मुनगंटीवार यांची तयारी नव्हती. खडसेंसारख्या बुजुर्ग नेत्याची ज्याने पक्ष कसा चालवतात याचे धडे फडणवीसांना दिले त्या खडसेंचा फडणवीस यांनी काढलेला काटा भाजपाचा एकही कार्यकर्ता जन्मात विसरू शकणार नाही. मुनगंटीवार तर पक्षाचे बारा कोने धुंडाळलेले नेते आहेत. नेत्यांमधल्या चढ उताराची चांगली जाणीव त्यांना आहे. म्हणूनच खडसेंनंतर सेनेवरचा अन्याय त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला, पण तेव्हा ते बोलले नाहीत.

एव्हाना सत्ता ही काय चीज आहे, हे भाजपचे मंत्री चांगलं जाणून आहेत. म्हणूनच सेनेबरोबर त्यांना कुठल्याही परिस्थितीत युती हवी होती. युती अभावी सत्ता गेली आणि सत्तेअभावी पदे गेली, अशी अवस्था भाजप नेत्यांची झाली. कधी नव्हे त्या काँग्रेस पक्षांना घेऊन सेनेने सत्ता स्थापन केली हे भाजपच्या एकाही नेत्याला, कार्यकर्त्याला पचलं नाही. काहीबाही निमित्त करत तीन पक्षांना झुंजवण्याचा आगलावा प्रयत्न त्या पक्षाच्या नेत्यांनी केला. अगदी सावरकर वादाची ठिणगी टाकण्याची नीती अवलंबली गेली. काहीही झालं नाही. मग नागरिकत्वाचा विषय चघळला गेला. तो अंगलट आला. सोनिया गांधी यांच्या भेटीचं भांडवल करण्यात आलं, पण फायदा झाला नाही. शहा – मोदींच्या भेटीचं निमित्त करत सत्तेची स्वप्न पडू लागली, पण तीही वांझोटी ठरली.

सगळं हातचं गेल्यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाचा त्याअनुषंगाने कमलनाथ यांच्याप्रमाणेच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा डाव मुनगंटीवारांच्या मुखातून बाहेर आला. सत्तेच्या सुप्त इच्छेसाठी मुनगंटीवार खरे बोलले एकदाचे. आम्ही चूक केली, असं ते भर विधानसभेत बोलले. हा दमदारपणा याआधीच दाखवला असता तर त्यांच्यावर फडणवीसांचा खोटेपणा सिद्ध करण्याची वेळ आली नसती. आता हे सगळं हातातून निसटलं आहे. कोणालाच विश्वास नव्हता इतकी एकरूपता उद्धव यांच्या सरकारने घेतली आहे. तेव्हा सरकारच्याखाली काडी लावण्याऐवजी मुनगंटीवार आणि त्यांच्या तमाम नेत्यांनी विरोधी पक्षाची भूमिका अधिक जोमाने वठवून पुन्हा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करणं हाच एक मार्ग आहे.

First Published on: March 14, 2020 5:52 AM
Exit mobile version