मधुघट अजुनी तुडुंब 

मधुघट अजुनी तुडुंब 

मधु मंगेश कर्णिक

1951 च्या आसपास लिहिलेली  ‘कृष्णाची राधा’  ही कथा  ते गेल्यावर्षापर्यंत लिहिलेली  ‘तारकर्ली’  ही  कादंबरी हा साहित्यप्रवास जेवढा मोठा वाटतो तेवढा तो शेवटपर्यंत कसदार राहिला आहे हे देखील नमूद करावेसे वाटते. काहीवेळा ‘जैतापूरची बत्ती’  लिहिल्यानंतर तो वादग्रस्तदेखील झाला आहे. तरीही मागील साठ वर्षाच्या साहित्यप्रवासाची नोंद घेताना त्यातील चढउतार जेवढे आहेत, तेवढे त्यातील सत्व देखील समजून घेताना  मधु मंगेश कर्णिक अर्थात मधुभाई यांचे वाङ्मयीन व्यक्तीमत्त्व समजून घेणे भाग पडते.

ह्या माध्यमातून त्यांच्या कथा व कादंबरीवर विशेष चर्चा करणे हे क्रमप्राप्त ठरेल त्याचे कारणदेखील तसेच आहे. मधुभाईंच्या कथासंग्रहाची संख्या जवळपास चाळीसच्या घरात आहेत. 1958 च्या मालवणच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात तत्कालीन अध्यक्ष कवी अनिल यांच्या हस्ते प्रकाशित झालेला  ‘कोकणी गं वस्ती’पासून सुरु झालेला प्रवास अजूनही चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ, कणकवली या भागात बघितलेली माणसे, त्यांची जीवनशैली, तिथली गरिबी, तेथील समाजकारण आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून एसटी महामंडळात नोकरी करताना तेथे आलेले अनुभव हे सांगत असताना त्यातून साहित्यिक वाटचालीत पहिले दशक म्हणजे  ‘कोकणी गं वस्ती’,  ‘तोरण’,  ‘पारध’  हे कथासंग्रह तयार झालेले दिसतात.

त्यातूनच त्या काळात कोकणात अर्थात तळकोकणात चालू असलेली भावीन  ही प्रथा, त्या भाविनीची समाजाने केलेली कुचंबना असो किंवा तिचे सामाजिक स्थान मांडताना  ‘देवकी’  ही पहिली वहिली कादंबरी सज्ज झाली आहे. पुढे मो. ग. रांगणेकर यांनी त्या कथानकाचे नाट्यरुपांतर केले हा पहिल्या दशकातील साहित्यप्रवास विचारात घेता, त्या काळातील वाचक, त्या काळातील पुस्तकांचा खप ह्या गोष्टी विचारात घेता गिरणीत काम करणारे कामगारवर्ग, त्यांच्या अवतीभवती असणारी कोकणी मुलखाची पार्श्वभूमी ह्या गोष्टीदेखील विचारात घेण्यासारख्या आहेत.

त्यामुळे कोकणातील माणसाला आणि पर्यायाने ज्याची ग्रामीण जीवनाशी नाळ जोडली आहे. त्यांना हे लेखन त्यांच्या जीवनाशी समांतर गेल्यासारखे वाटते. 1958च्या साहित्य संमेलनात मधुभाईंचा संग्रह आला तरी त्याकाळात प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्‍या  सत्यकथेत  त्यांची कथा अजून प्रसिद्ध झाली नव्हती. रामभाऊ पटवर्धन यांच्या करड्या नजरेतून मधुभाईची  ‘हौर’  या कथेचा वेगळा बाज भावला आणि  1959च्या जानेवारी महिन्यात ही कथा  सत्यकथेत  आली. इथून जो प्रवासाचा आलेख उंचावला गेला तो नंतरच्या काळात खाली आलाच नाही. ह्या सर्व साहित्यात ते जुने कोकण, ती जुनी माणसं, त्यांची सुख- दु:ख, तिथला पाऊस, तिथली कृषीव्यवस्था, तिथली गुरंढोर, तिथला निसर्ग आणि सर्वाच्या केंद्रस्थानी त्या माणसाची सामजिक स्थिती यावर विशेष भर आहे.

या सर्वांचा एकंदरीत विचार करता याआधी कोकणातील हे जीवन किंवा ग्रामीण कथा त्याआधी कोणी एवढी विशेष मांडली नव्हती. कोकणातील कथेचा विशेषतः तळकोकणातील जीवन रहाटीचा तो पहिला हुंकार होता असे म्हणावे लागेल. त्यामुळे  चोरी, गोकुळ, मोर  किंवा  मोरपीस  ह्या त्यांच्या कथा फार वेगळ्या वाटतात. त्यातील सखाराम गवस हा बाप आजच्या काळात संघर्ष करणारा वाटतो. जे जीवनाचे अर्क्य त्या काळात मधुभाईंनी मांडले आहे.

दुसर्‍या दशकात मात्र जे कथासंग्रह किंवा कादंबरी प्रकाशित झाल्या, त्यात मुख्यपणे नागरी जीवन आहे पण हे नागरी जीवन कुठले तर महानगरीला जोडून जी झोपडपट्टी आहे, तिथले जीवन, तेथील लोकांचे जीवनाकडे बघायची दृष्टी, त्यांची नीतीमत्ता किंवा अनैतिकता, उघडी नागडी लैंगिकता हा त्यांच्या लेखणीचा एक भाग झाला होता. आदिम काळापासून असलेला हा विषय मधुभाईंच्या कथा कादंबरीतून तितक्याच प्रखरपणे येऊ लागला होता, त्यामुळे त्या काळातील  जुईली  किंवा  माहीमची खाडी  ह्या कथा-कादंबरी त्या काळाचे प्रतीक म्हणून वाचकांच्या मनावर ते परिणाम आजही ठसून राहिले आहेत असे म्हणावे लागेल.

याच काळाला समांतर सामजिक भूमिका मांडताना तिसर्‍या दशकात  भाकरी व फूल  ही कादंबरीचा उल्लेख करावा लागेल, या कादंबरीत दलित बांधवांना मिळणारी वागणूक मधुभाईंच्या या कादंबरीत विशेष आली आहे. त्यांच्या दारिद्य्राची, जीवनसंघर्षाची ही कहाणी आहे, आपल्या सामाजिक भावना प्रखर झाल्यानंतरच्या काळातील ही कादंबरी हा मधुभाईंच्या वाङ्मयीन कालखंडाचा भाग असू शकतो कारण ह्या दलितबांधवांनी शहरात येऊन त्यांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागले किंवा त्यांना मिळालेला एकटेपणा किती मोठा घटक होता,  हे विशेषत्वाने इथे चित्रित होते, त्यामुळे स्वातंत्र्यकाळानंतर कोकणातील जातीव्यवस्था किती प्रखर होती हे तर इथे शब्दित होतेच पण आर्थिक व सांस्कृतिक स्थितीवर भाष्य करताना मधुभाई ह्या कादंबरीतून आपण लहानपणी किंवा त्यांच्या वयाच्या विशीत-तिशीत पाहिलेला दलित समाज त्यांच्या जाणिवा प्रकट करणार्‍या काळाला साक्षी ठेवताना आढळतात.

एसटी महामंडळ, त्यांनतर गोवा सरकारची सनदी नोकरी, सचिवालयातील सनदी नोकरी आणि लघुउद्योग मंडळातील नोकरी यातील अनुभव त्यांच्या साहित्यप्रवासातील चौथ्या दशकात वाचायला मिळतात. सनदी अधिकार्‍यांची सत्तापिपासू वृत्ती, आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या हाताखालील माणसांना राबवण्याची वृत्ती, त्यातून नफ्या तोट्याची आर्थिक घोटाळे आणि त्यातून उद्भवणारा राजकीय वावर, त्यातून होणारी समाजजीवनाची फरपट ही त्यांच्या लेखणाची वैशिष्ठ्ये आपणाला ह्या दशकात बघायला मिळतात. त्यातून निर्माण होणारे महानगरीतील कोर्पोरेट विश्व त्यातील माणसे आणि त्यांचे समाजजीवन, ह्याची सांगड घालणार्‍या अनेक कथा ह्या काळात मधुभाईंनी लिहिल्या. लामणदिवा   स्वर अमृताचा  आणि  क्षितीज  ह्या संग्रहाचा उल्लेख करावा लागेल  व या सनदी कारभाराची सूत्रे ज्या कादंबरीत प्रकट झाली ती सनद  ही खास कर्णिक ब्रांड होता.

ह्याच सुमारास पाचव्या दशकात मधुभाईंनी त्यांच्या लहानपणी बघितलेलं कोकण बदले होते, त्या कोकणाची परिभाषा वेगळी होती, त्याचा आरोह व अवरोह वेगळा होता त्या बदलत्या कोकणाचे प्रतिबिंब त्यांच्या  कातळ  ह्या कादंबरीत आले आहे. त्याचवेळी जीवनाच्या ह्या सगळ्या अनुभवावर लिहिलेली कितीतरी व्यक्तिचित्रणे त्यांच्या कथेतून व्यक्त होत होती. स्त्री-पुरुष संबंध विशेषतः विवाहबाह्य संबंध, त्यांची नैतिक कारणे, त्यातून कलाकारांच्या मनोवृत्तीशी समरस होणार्‍या  ‘काळवीट’ सारख्या कथा हा त्यांच्या एकंदरीत प्रतिभेचा भाग होता. त्यातून कलाकाराच्या भाव भावना त्यांची सामाजिक उकल त्यातून निर्माण होणारे नातेसंबंध हे विशेषतः ह्या काळात  प्रतिभा व प्रतिमा,  चेटूक, संध्याकाळ  यासारख्या कथेतून वाचयला मिळतात.

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कथा व कादंबरी यांचा विचार करता सहाच्या सहा दशके त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्वाचा विचार करता मधुभाईंनी नेहमी त्या कथेत वैविध्याचे भान ठेवले आहे. त्यात नैतिकता आहे. त्यांनी स्त्री पुरुष संबंध हा विषय केवळ भावनिक गुंतागुंत म्हणून कथानकाची सोय करण्यासाठी वापरला आहे. त्यात रंजकता हा भाग कधीच डोकावला नाही. नागर व ग्रामीण ह्या दोन्ही प्रतिमा त्यांनी त्याच ताकदीने वापरला आहे. त्याचवेळी सातत्य हा गुण लेखनप्रक्रियेत महत्वाचा वाटतो. मधुभाईंच्या एकूण साहित्यप्रवासात ह्या सर्व गोष्टींबरोबर प्रयोगशीलता हा देखील महत्वाचा घटक लक्षात घेण्यासारखा आहे.

जीवनाच्या अनेक टप्प्यावर आलेले अनुभव लेखकाच्या अनेक कथानकाचे घटक होतात तसेच मधुभाईंच्या बाबतीत झाले असावे, तरीही साठ वर्षापूर्वी उचललेली लेखणी आजही प्रवाही आहे हे विशेष, हा मधुघट कधीही रिता होणारा नाही, हे दोन वर्षापूर्वी तारकर्ली ह्या कादंबरीतून दिसून आले आहे. हा मधुघट अजुनी तुडूंब आहे…

 

First Published on: January 16, 2021 10:22 PM
Exit mobile version