भाजप नेत्यांचा हसे करून घेण्याचा अट्टाहास !

भाजप नेत्यांचा हसे करून घेण्याचा अट्टाहास !

शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीविषयी टिपण्णी करताना भाजपची मंडळी कायम लाज सोडतात हे अनेकदा दिसून आलं आहे. नारायण राणेंची दोन्ही मुलं असोत किंवा भातखळकर, किरीट सोमय्या वा आशिष शेलारांसारखे माजी मंत्री असोत. व्यंगावर बोलायचं आणि नंतर माफी मागायची ही या मंडळींची खासियत आहे. मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरू असताना पैसे मोजता मोजता मान दुखावल्याचं वक्तव्य करताना किरीट सोमय्या यांना जसं काही वाटलं नाही. तसंच त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांना समज दिल्याचं ऐकायला मिळालं नाही. एकूणच राज्यातील भाजप नेत्यांनी आपले हसे करून घेण्याचा अट्टाहास चालवल्याचे दिसत आहे.

माणूस वयस्क झाला की त्याला आपण काय बोलतो, काय करतो, कसं वागतो याच भान राहत नाही. सामान्यतः साठी पार केली की, आपण व्यावहारिकदृष्ठ्या कमजोर ठरत असतो. अशा वयात आलेल्या व्यक्तीचा तोल जाऊ लागला की माणसाने निवृत्त व्हावं. राजकारण हा व्यवहार नसला तरी व्यवहाराबरोबरच अनेक गोष्टी त्या क्षेत्राशी जुळलेल्या असतात. तेव्हा तिथे जमत नसेल तर इतरांना मार्ग मोकळा करून द्यावा. पण आपल्या समाजात सूंभ जळला तरी पीळ सुटत नाही, असं म्हणतात. तसं राजकारणात कोणी थांबायचं नाव घेत नसतात. दुर्दैवाने आपल्या राजकारणात तसंच काहीसं घडत आहे. त्यात पदांची आसक्ती असेल तर अशी माणसं पुढचा मागच्याचाही विचार करायचा सोडून देतात. बुध्दीच कोती झाल्यावर कोणाही विषयी काहीही टिप्पणी करायला ही माणसं मोकळी असतात. वायफळ बडबड करण्यात ही माणसं पुढे असतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असेच काहीसे वागू लागले आहेत. सरकारमध्ये असेपर्यंत त्यांचं वागणं फारसं डाचत नसे. पण सत्ता गेल्यापासून अशा अनेक कलाकारांमध्ये चंद्रकांत पाटलांचा उल्लेख होतो. संजय राऊतांविषयी ते बोलतातच पण आजकाल ते शरद पवार आणि उध्दव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवरही भलती सलती टिपण्णी करू लागले आहेत. आपण राज्याच्या पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीबाबत बोलतो आहोत याचं भान त्यांना याआधी नव्हतं, आणि आताही नाही. तेच असं वाकडंतिकडं बोलू लागल्यावर इतरांना थांब, असं सांगण्याचा मार्ग भाजपला शिल्लक राहत नाही.

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील अनुपस्थितीवर टिपण्णी करत वाद उपस्थित केला आहे. आजारी असलेल्या उध्दव यांना अधिवेशनात येता न आल्याचं निमित्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची उद्दाम सूचना केली आहे. भाजपच्या मंडळींची सत्ता गेल्यापासून झालेली अवस्था पाटलांच्या या उद्गारातून स्पष्ट दिसते. उद्धव ठाकरेंना मानेच्या दुखापतीमुळे विधिमंडळात जाणं शक्य झालेलं नाही. त्यांना सक्तीची विश्रांती घेण्यास सांगण्यात आल्याने त्यांनी अधिवेशनात येणं टाळलं. अधिवेशनात उपस्थित न राहण्यामागे जणू ते मातोश्रीवर चंगळच करत असावेत, असा अविर्भाव भाजपच्या मंडळींचा अधिवेशन काळात दिसतो आहे. तो चंद्रकांत पाटील यांनी आपल्या उद्वेगी वक्तव्याने बाहेर काढला आहे. अशी वक्तव्ये करून आपण राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा अवमान करतो आहोत, याचं भानही चंद्रकांत पाटील यांना राहिलेलं नाही.

मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्या जागी रश्मी यांना बसवण्याची कोती मागणी करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाचीच अवहेलना केली आहे. एव्हाना पाटलांचं म्हणणं तसं फारसं कोणी मनावर घेत नाहीत. पण हा उध्दव ठाकरे यांचा आणि त्यांच्या पत्नीपुरता मर्यादित विषय नाही. याआधी राज्याची धुरा सांभाळणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला आजारपण नाही आलं असं नाही. तेव्हा तर उपमुख्यमंत्री नावाची संकल्पनाही नसायची. तेव्हा ज्येष्ठ मंत्र्याच्या जबाबदारीवर सरकारचा गाडा चालायचा. चंद्रकांत पाटील हे राज्याचे महसूल मंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या विदेश दौर्‍यात त्यांनी राज्याचा कारभार चालवला नाही असं नाही. आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार तितक्याच तोडीने पार पडत असताना आणि अर्थमंत्रालयासारख्या खात्याचा कारभार त्यांच्याकडे असताना आणखी कोणी राज्य चालवायला हवं, असं वाटणं म्हणजे कोत्या बुध्दीचं लक्षण म्हटलं पाहिजे. तीन पक्षांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी सारं करून झाल्यावर आता मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा वापर करण्याची ही पध्दत भाजपच्या एकूणच कारभाराचा नमुना म्हटला पाहिजे.

शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीविषयी टिपण्णी करताना भाजपची मंडळी कायम लाज सोडतात हे अनेकदा दिसून आलं आहे. नारायण राणेंची दोन्ही मुलं असोत किंवा भातखळकर, किरीट सोमय्या वा आशिष शेलारांसारखे माजी मंत्री असोत. व्यंगावर बोलायचं आणि नंतर माफी मागायची ही या मंडळींची खासियत आहे. मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरू असताना पैसे मोजता मोजता मान दुखावल्याचं वक्तव्य करताना किरीट सोमय्या यांना जसं काही वाटलं नाही. तसंच त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांना समज दिल्याचं ऐकायला मिळालं नाही.

आशिष शेलार यांनी मुंबईच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांना नायरमधल्या घटनेनंतर त्या निजला होत्या काय, असा सवाल करत आपली पातळी दाखवून दिली होती. याची दखल महिला आयोगाने घेतल्यावर शेलारांची बाजू घेत पक्षातल्याच महिला कार्यकर्त्यांनी शेलारांचीच री ओढली होती. शहराच्या पहिल्या नागरिकाचा आणि त्याही महिला पदाधिकार्‍याचा अवमान होत असताना अवमान करणार्‍याची बाजू घेण्याचा हा प्रकार कुठल्या शुचितेत बसतो, ते एकदा भाजपच्या महिला नेत्यांनी जाहीर केलं पाहिजे. असं काहीबाही बोललो की आपलं कौतुकच होतं, असा या नेत्यांना समज आहे. वास्तव खूप वेगळं असतं. कोणाच्याही व्यंगावर बोलणं ही विकृती मानली जाते. तिला समाज कधीही स्वीकारत नाही. उलट असं जो कोणी करेल त्याची रेवडी उडवली जाते हे या मंडळींना कळत नाही असं नाही. पण विनाशकाले विपरित बुद्धी म्हणतात, तेही काही खोटे नाही.

संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेताना असे म्हटले होते की, काँग्रेसची अवस्था दुर्योधनासारखी झालेली आहे. त्याला सगळे विचारत की, तू गुरु द्रोणाचार्यांसारख्या महान गुरूंचा शिष्य आहेस, तू अनेक विद्या पारंगत आहेस, असे असूनही तू जे काही चुकीचे करत आहेस, ते तुला कळत नाही का, तुझ्यामध्ये तू का सुधारणा करत नाहीस, आपल्या पांडव भावांसोबत तू गुण्यागोविंदाने का राहत नाहीस, त्यांंच्याशी चांगुलपणाने का वागत नाहीस, त्यावर दुर्योधन म्हणत असे की, ‘अहंम जानामी, म्हणजे मी काय करतो याचे मला पूर्ण ज्ञान आहे. मी काय करतोय ते मला कळते, पण मी स्वत:मध्ये काहीही बदल करू शकत नाही.’ राज्यातील भाजपचे नेते ज्यांच्या नावाशिवाय आपले बोलणे सुरू करत नाहीत, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तरी या नेत्यांनी काही शिकायला हवे. पण तसे काही होताना दिसत नाही. ही खुद्द मोदींकडून ते शिकणार नसतील तर त्यांना कोण शिकवणार हा प्रश्न आहे.

थोडक्यात, काय तर राज्यातील भाजपच्या नेत्यांची सध्या दुर्योधनासारखी झालेली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उफराट्या सूचनेला मुंबईच्या महापौरांनी जशास तसं उत्तर दिल्यावर पाटलांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. बालीश वक्तव्याला उत्तर देत नाही, असं सांगत त्यांनी आपल्यातील बालीशपणा अधोरेखित केला. मुख्यमंत्रीपदी रश्मी ठाकरे यांना बसवण्याची सूचना करणार्‍या पाटलांना उद्देशून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्याकडे देणार काय, असा सवाल करताच चंद्रकांत पाटलांना बालीशपणा आठवला.

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यापासून भाजप नेत्यांच्या असल्या उद्योगांनी विधिमंडळाचं हसं होत आहे, हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. विरोधी पक्ष म्हणून असलेल्या जबाबदार्‍या योग्य प्रकारे पार पाडता येऊ शकतात. पण त्यामुळे सरकार पडणार नाही, आपल्याकडे सत्ता येणार नाही, याची जाणीव या मंडळींना झालेली दिसते. यामुळेच संसदीय कार्यपध्दती अवलंबण्याऐवजी हे नेते हातघाईवर येतात. तोंडाला येईल ते बोलतात. विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून वाटेल तसे हातवारे आणि शेरेबाजी करतात. आंदोलन करणारे नारायण राणे यांचे पुत्र नितेश हे ज्या पध्दतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून मांजरीचा आवाज काढत होते ते पाहता ही मंडळी राज्याचं मोठेपण घालवायला निघालीत की काय, असं वाटल्यावाचून राहत नाही. अशी टिंगल टवाळी करणार्‍या नितेश राणे यांचे कान उपटण्याची हिंमत भाजपचे नेते करू शकणार नाहीत. त्यांच्यात ती हिंमत नाही. नितेश राणे यांचा आचरटपणा सार्‍या जगाने पाहिला. आवाज काढण्याचं स्वत:च समर्थन करत आपण पक्षाची लाज घालवतो याचंही त्यांना काही वाटलं नाही. जबाबदारीची जाणीव नसलेलीच माणसं कसं वागतात याचं चित्र म्हणजे सुरू असलेलं विधिमंडळाचं अधिवेशन म्हणता येईल.

First Published on: December 25, 2021 7:00 AM
Exit mobile version