महाराष्ट्रीय संस्कृतीचा कुलवृत्तांत

महाराष्ट्रीय संस्कृतीचा कुलवृत्तांत

भारतीय मौखिक कथनपरंपरांचा संस्कार रिचवत नव्या कथन शक्यता आजमावण्याचा सातत्याने प्रयत्न रंगनाथ पठारे यांनी केलेला आहे. कथन रचनेची वैशिष्ठ्यपूर्ण लेखनशैली घडवत त्यांच्या कथा-कादंबर्‍यांनी मराठी साहित्याला वजनदार ऐवज देत नवे वळण दिले आहे. गेल्या चार दशकातील त्यांच्या कथा, कादंबरी आणि समीक्षेने मराठी साहित्याला दिग्दर्शित केलेले आहे. विचारवंत म्हणूनही ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. ‘ताम्रपट’या बहुआयामी कादंबरीने त्यांची श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून मराठीत ओळख स्थापित झालेली आहे.

आज ते मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून मराठी कादंबरी व्यवहाराच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांची नुकतीच ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही मागील सातशे वर्षाच्या कालपटावरील वंश, जात, धर्म, संस्कृती, समाज, राजकारण यांच्या विशाल पटाला सामावून घेत बदलत्या जगण्याची कुळकथा सांगणारी सातशे शहाण्णव पृष्ठांची बृहद कादंबरी प्रसिध्द झाली आहे. मराठा योध्दे, त्यांचे जगणे आणि स्थलांतर यांना केंद्रव्रती ठेवत माणसाच्या वाटचालीचा घेतलेला हा शोध मूल्यवान आहे. मानवी नातेबंध, त्यातील गुंतागुंत आणि विविध समूहांच्या काळपरिणामातून होणार्‍या सरमिसळीचा कोलाज या कादंबरीतून साक्षात झालेला आहे. बदलत्या काळाच्या परिणामातून बदलत गेलेल्या माणूस नि समूहाच्या आयडेंटिटीचे स्वरूपही या कादंबरीतून अधोरेखित होते.

आपल्या पूर्वजांचे जीवन आणि मागील पिढ्यांची वाटचाल समजून घेण्याच्या कुतूहलतेतून या कांदबरीची निर्मिती झालेली आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून या कादंबरीचे लेखन रंगनाथ पठारे करत असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. अशाप्रकारच्या कादंबरी लेखनासाठी एक चिकित्सक संशोधनपूर्ण व्यासंग लागतो आणि त्या व्यासंगातून झालेल्या अभ्यासाला बौध्दिक पातळीवर शेकडो वर्षे मागे जाऊन चिंतनाच्या पातळीवर वास्तव वाटणारा चित्रपट डोळ्यासमोर ठेवत रेखाटावा लागतो. तो रेखाटण्यात पठारे कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. वर्तमानातील गुंते हे इतिहासात दडलेले असतात. इतिहासाच्या शिकवणीतून वर्तमान अधिक सुरूप करता येतो. इतिहासच वर्तमानाला घडवत असतो.

वर्तमान जगण्यातील अनेकविध पेचांचे मूलस्रोत या कादंबरीतून उलगडलेले आहेत. त्यातून वर्तमानातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळू शकतात. विशेषत: आजच्या दंभमय जातनिष्ठांचा पाया किती कमकुवत आहे हे या कादंबरीच्या अवलोकनातून लक्षात येते. रंगनाथ पठारे आपल्या कुळाची गोष्ट सांगताना परंपराशील होत नाही तर मानवतावादी दृष्टी स्वीकारून चिकित्सकपणे ही गोष्ट रचतात. वंश आणि जात अस्मितांना धक्का देणारी ही कादंबरी परिवर्तनवादी मूल्यविचार ठळक करणारी आहे. जातीव्यवस्थेचा तळ धुंडाळत तीमधील ठिसूळपणाची पोलखोल करणारी ही कादंबरी जातसंघर्षवाद्यांना आत्मभान देणारी आहे. जातनिर्मितीचा इतिहास या कादंबरीतून उजागर होतो. हा इतिहास आजच्या टोकदार झालेल्या जात अस्मितांना ठिसूळ करणारा आहे.

अल्लाउद्दीन खिलजीने इ.स.१२८९ साली पैठणवर स्वारी केल्याच्या निर्देशापासून या कादंबरीचा प्रारंभ होतो आणि साधारणत: इ.स.२००० पर्यंत या कुलवृत्तांताचा शेवट. या जवळपास सातशे-आठशे वर्षांच्या विस्तीर्ण अवकाशात अनेकविध आशयसमृध्द घटितांनी ही कादंबरी घडते. श्रीपती, साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी आणि पिराजी, शंभुराव, देवनाथ या प्रमुख व्यक्तीचित्रांच्या माध्यमातून या कादंबरीचे महाकथानक उभे राहते. त्या-त्या कालखंडातील या नायकांच्या संघर्षातून या कादंबरीतील कथानक उभे राहत या कुलवृत्तांताची गोष्ट साकारते. स्री व्यक्तीचित्रांचाही हे कथानक उभे करण्यात महत्त्वाचा वाटा आहे.

या कादंबरीतील स्त्रिया अत्यंत सामर्थ्यशीलपणे लेखकाने उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळेच पुरूष व्यक्तिचित्रांपेक्षा त्यांचाच अस्तित्वजनक आवाज कादंबरीभर जाणवतो. जगण्याशी चिवटपणे टिकून राहण्याच्या स्त्रियांच्या आदिम-नैसर्गिक वृत्तीचा निर्मळ आविष्कार या कादंबरीतून झालेला आहे. या कादंबरीत आलेल्या स्त्रिया मातृसत्ताक समाजव्यवस्थेची आठवण करून देतात. सर्वसामान्य कष्टकरी माणसांच्या कहाण्याही या कादंबरीतून समोर येतात. त्यांच्या भावविश्वाच्या अस्तित्वाने या कादंबरीच्या जागा भरलेल्या आहेत. या माणसांनी या कादंबरीला तोलून धरलेले आहे.

इतिहास आणि भूगोलाच्या व्यापक अवकाशाला कवेत घेत ही कादंबरी अनेकविध घटिते, पात्रे आणि उपकथानकांच्या आधारे महाराष्ट्रीय भूमीचे सत्त्व घेऊन उभी राहते. रूढ अर्थाने ही ऐतिहासिक कादंबरी नाही; तर ऐतिहासिकतेच्या परिप्रेक्षात वास्तव आणि कल्पिताच्या आधारे एका विशिष्ट समाजाचे जगणे आणि स्थित्यंतरांची महाकथा साक्षात करणारी आहे. आपल्या पूर्वजांच्या शोधाची ही कहाणी एकट्या लेखक पठारे यांचा कुलवृत्तांत राहत नाही तर मागील सातशे वर्षांतील महाराष्ट्रीय समाजजीवनाच्या स्थितीगतीचे पडसाद तीमधून ध्वनित झालेले आहेत.

मराठीजनांच्या सांस्कृतिक संचिताचा दस्तावेज म्हणून या लेखनकृतीचे मोल अधिक आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अशा व्यापक भूप्रदेशाचा कॅनव्हास या कादंबरीला लाभला असला तरी तिचे मुख्य केंद्र हे महाराष्ट्र भूमी हेच आहे. सकृतदर्शनी रंगनाथ पठारे आणि त्यांच्या मराठा जातीचा हा कुलवृत्तांत वाटत असला तरी त्याला जातीविशिष्टता प्राप्त झालेली नाही. महाराष्ट्रीय जगण्याची बहुस्तरीय रचना, वैविध्यपूर्ण जीवनरीत, मूल्यव्यवस्था, श्रमसंस्कृती, ज्ञानव्यवस्था, लढाऊ बाणा, युध्दशास्र, शेती आणि गावगाडा अशा अनेक अंगांना स्पर्श करत ही कहाणी सर्वांची होऊन जाते. त्यामुळेच महाराष्ट्रीय समाजाच्या सांस्कृतिक जगण्याचा कुलवृत्तांत म्हणून या कादंबरीचा निर्देश करणे आवश्यक ठरेल.

कालसंवादी प्रमाण आणि लोकभाषेच्या उपयोजनामुळे या कादंबरीचे निवेदन प्रवाही झालेले आहे. त्यात सहज-सुलभता असल्याने ही भाषा वाचकांना गुंतवून ठेवते. कथानकाची मांडणीही कुतूहल जागवणारी असल्याने ती वाचकांना खिळवून ठेवत संपूर्ण कादंबरी वाचावयास भाग पाडते. यादवकाळ, निजामशाही, आदिलशाही, पेशवाई, ब्रिटिश राजवट, आधुनिक काळ, स्वातंत्र्योत्तर काळ अशा वेगवेगळ्या काळाचा दीर्घ पट मांडताना ही भाषा वाचकाला रसग्रहणात-आकलनात कुठेही अडसर ठरत नाही. उलट प्रमाण-बोलीचा हा मिश्र भाषासंयोग त्या-त्या काळाच्या गोष्टीला प्रभावीरित्या पुढे नेत परिणामकारक होतो.

‘काय समजानी झालंय.’, ‘माझी भैन. मेरा भैन’, ‘आरे त्यो जित्ता हाये दोडांनोऽऽ’, ‘मैंने आपको कई दफा देखा है’, ‘पेंढारी? आवई व्हतीच तिच्यामायला सका त्यांछे!’, किंवा ‘काय सांगतोयस काय! तसे असेल तर आपण एकमेकांचे कझिन्स झालो.’ या प्रकारचे संवाद आणि प्रमाण भाषेतील प्रवाही विचारगर्भ निवेदनाने ही कादंबरी वैशिष्ठ्यपूर्ण ठरलेली आहे. माझ्या देशातील गरीब हे तमाम दुनियेतील गरीबांपेक्षा गरीब आहेत, हे मी मान्यच करतो. पण तसे जगणे केवळ इथेच शक्य आहे. इथली हवा, पाणी आणि अन्न तशी तुम्हाला संधी देते. काही किमान गोष्टींची पूर्तता झाली की तुम्ही इथे जगू शकता. यासारख्या अनेक निरीक्षणांनी हे निवेदन अधिक प्रगल्भ आणि परिपक्व झालेले आहे.

कोणत्याही कांदबरीला नुसत्या तपशीलांनी कादंबरीपण प्राप्त होत नाही; तर ती कादंबरी कोणते सामाजिक तत्त्वज्ञान घेऊन साकारते यावर तिच्या कादंबरीपणाची योग्यता अवलंबून असते. सामाजिक परिवर्तनाचा सत्यशोध या कादंबरीतून पठारे यांनी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असणारे सामाजिक तत्त्वज्ञान आणि संशोधनपूर्ण निरीक्षणांची कांदबरीगत योजना लेखकाने या महागोष्टीत मिसळून टाकल्याने एक परिणामकारक वैचारिक संस्कार ही कादंबरी घडवते. मराठी विचारविश्वालाही काही नवी दृष्टी देण्याची क्षमता ही कलाकृती बाळगून आहे.

यादृष्टीनेही ही कादंबरी महत्त्वाची वाटते. कोणत्याही कादंबरीचे श्रेष्ठत्त्व हे तिच्या बहुआवाजीपणात आणि जीवनाच्या सामग्र दर्शनात असते. यात माणूस-समूह, त्याच्या भाव-भावना, मानसिक आंदोलने, त्याच्या भोवती असणार्‍या सर्व समाजव्यवस्था, त्यांना जोडून येणारी सर्व प्रकारची घटिते, अनेक पात्रे, कथानके-उपकथानके, कालखंडाचा व्यापक पट, भू-जैविकता, भाषिक सघनता अशा अनेक अंगाचे दर्शन तीमधून घडणे अपेक्षित असते. यादृष्टीने ही कादंबरी यशस्वी ठरलेली आहे. एकविसाव्या शतकाच्या मराठी कादंबरीच्या पुढील दिशा विस्तारण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड म्हणून या कादंबरीचा निर्देश करता येईल.

-केदार काळवणे, सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि.उस्मानाबाद.पिन:४१३५०७, ईमेल : Kedar.kalwane.28@gmail.com मो : ७०२०६३४५०२

First Published on: November 17, 2019 5:44 AM
Exit mobile version