थिएटरात चरण्याचा जन्मसिद्ध अधिकार!

थिएटरात चरण्याचा जन्मसिद्ध अधिकार!

मल्टिप्लेक्समध्ये तिकिटांपेक्षाही खाद्यपदार्थ महाग विकले जातात.

थिएटरात जाऊन घरचे, दारचे कुठलेही अन्न खाणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असं काही थेट या शब्दांत जैनेंद्र बक्षी बोललेले नाहीत… पण, त्यांनी जे घडवून आणलं ते साधारण याच प्रकारचं आहे… स्वत: दिग्दर्शक असलेल्या या बक्षीसाहेबांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून मल्टिप्लेक्सेसमधल्या खाद्यपदार्थांच्या अव्वाच्या सव्वा किमतींचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि त्याच्या फलस्वरूप कोर्टाने घरचे खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्येही न्यायला परवानगी देणारा आदेश काढला… राज्य सरकार अजूनही त्याचं पालन व्हायलाच हवं, यादृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाहीये… ते साहजिकच आहे… घरची पोळीभाजी थिएटरात खाऊन थर्मासमधून घरचा चहा पिणारा कोणीही गणू गलगले बाहेर पडताना सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक फंडात आठ आणेही टाकणार नाही… मल्टिप्लेक्स मालकांची गोष्ट वेगळी आहे… शिवाय सरकारची कररचनाच मुळात मल्टिप्लेक्समालकांना २५ टक्के उत्पन्न खाद्यपदार्थ विक्रीतून मिळावं, अशा प्रकारची आहे… त्यावर कुर्‍हाड बसली तर मल्टिप्लेक्सेसचं गणित कोलमडेल आणि सिनेमा तिकिटांची किंमत वाढेल… म्हणजे शेवटी इथून नाहीतर तिथून चाट बसणारच आहे.

किंबहुना न्यायालयाच्या आदेशाने फार मोठा विजय मिळाला म्हणून हर्षभरित होणार्‍यांना हे लक्षातच येत नाही की मल्टिप्लेक्समध्ये ३०० रुपयांचं पॉपकॉर्न आणि १०० रुपयांचा सामोसा खाणारे लोक होते, म्हणून आपले तिकीटदर सबसिडाइझ होत होते. आता हे लोक नसतील, तर ही सबसिडीही संपणार.मुळात मल्टिप्लेक्सच्या चालकांनी या महागड्या पदार्थांबरोबर जनता खाणं जनता रेटमध्ये देण्याची आणि मुख्य म्हणजे पाण्याच्या बाटल्या, बाळांसाठीच्या दुधाच्या बाटल्या हे आरडीएक्स असावं अशा थाटात चेक करून बाजूला काढायला लावलं नसतं, पिण्याच्या शुद्ध पाण्याची मोफत व्यवस्था (जी कायद्यानुसार आवश्यक आहे) केली असती, तर हे प्रसंग ओढवलेच नसते. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन ३०० रुपयांचं पॉपकॉर्न खाणारा माणूस १५ रुपयांना वडापाव मिळतोय, ३०० रुपयांत २० वडापाव येतील, असा विचार करत नाही. तो ते पॉपकॉर्नच खातो आणि लाह्या खाणार्‍यांचा क्लासच वेगळा असतो, अशा आनंदात लाहीपेक्षा जास्त तडतडत उडतो.

मल्टिप्लेक्समध्ये पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध आहे म्हणून, एरवी हात धुवायलाही मिनरल वॉटर मागवणारे काही त्या नळावर झुंबड करत नाहीत, त्यांना १०० रुपयांची मिनरल वॉटरची बाटली घेण्यातच भूषणही वाटत असतं आणि आपण आरोग्याची फार काळजी घेतली, असा आनंदही मिळत असतो. मल्टिप्लेक्समध्ये मूर्खासारखे या गोष्टींवर पैसे खर्च करायला विरोध असलेला माणूस बाहेरच सामोसा खातो, पाणी पितो, मुलांना आइस्क्रीम खायला घालतो आणि फारतर पॉपकॉर्नची गंमत लुटू देत त्यांना, एवढीच सवलत देऊन मल्टिप्लेक्समध्ये येतो. तो मल्टिप्लेक्सवाल्यांचं ‘गिर्‍हाईक’ असाही नसतो. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये स्वस्त खाद्यपदार्थही उपलब्ध करून दिल्यास कोणी महागडे पदार्थ घेणार नाही आणि आपल्या नफ्यावर परिणाम होईल, असा विचार करताना मल्टिप्लेक्सचालकांचा भारतीय नवश्रीमंत मानसिकतेचा अभ्यास कमी पडलेला दिसतो.

या सगळ्या गदारोळात एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे?
आपण थिएटरात कशाला जातो?
सिनेमा पाहायला की चरायला?
तिथे थंडी असते, मन रिलॅक्स झालं की काहीतरी खावंसं वाटतं, हे सगळं बरोबर. पण, हे सगळं मध्यंतरात करता येतंच ना. मुळात मध्यंतर त्यासाठीच असतं.
सिंगल स्क्रीन थिएटरांच्या बाहेर हातगाडीवरून वडापाव, सामोसे वगैरे घेतल्यावर ते संपवून मगच आत थिएटरात जावं लागतं. जिथे ही सक्ती नसते तिथे पायावरून उंदीर बागडतात. तिथे ही सक्ती मान्य आहे, मग इथे थिएटरमध्ये खाद्यपदार्थ नेण्याची हौस कशाला? मुळात मल्टिप्लेक्सवाल्यांनी फेरीवाला नियमाचं उल्लंघन करून ऑर्डरी घेऊन सीटवर त्या पोहोचवण्याची व्यवस्था केल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.
कोणालाही, अगदी कोणालाही मुळात सिनेमा हॉलमध्ये कसलेही खाद्यपदार्थ न्यायला बंदीच असली पाहिजे. बाळांचं दूधही आई बाहेर येऊन पाजू शकते. त्यासाठी सिनेमा पाहायला आलेल्या इतर माणसांना ताप कशाला पाहिजे?
मुळात थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जायचं असतं, पाणी प्यायला नळावर जायचं असतं, वडापाव खायला गाडीवर जायचं असतं, डोसा खायला वेगळ्या गाडीवर जायचं असतं आणि पॉपकॉर्न आपल्या घरी कुकरमध्येही होतात. हे सगळं खाता खाता सिनेमे पाहायचे असतील, तर घरी बसा ना मोठा टीव्ही लावून त्यासमोर. मग सिनेमा पॉझ करा, मागे न्या, पुढे न्या, हवा तसा पाहा आणि मज्जा करा.

थिएटर हे सिनेमासाठी बांधलेलं आहे. त्याचा आस्वाद घ्यायला आलेला प्रेक्षक पडद्यावरच्या एकेका शब्दाकडे कान देऊन बसला आहे, त्याचं सगळं कॉन्सन्ट्रेशन समोरच्या पडद्यावर आहे. अशावेळी तुम्ही चुळा भरणार, मचक मचक आवाज करत खाणार, पोरं खाण्यावरनं भांडणार, पॉपकॉर्न चिप्स कुरकुरणार आणि या सगळ्या खाद्यपदार्थांचा मिळून एक भयंकर गंध सगळ्या थिएटरभर सतत दरवळत राहणार, सिनेमा पाहणार्‍याला विचलित करणार, हे सगळंच मुळात सिनेमा पाहण्यात विक्षेप आणणारं आहे. अर्थात, मल्टिप्लेक्समध्ये निवांतपणे खरोखरच सिनेमा पाहायला कोणता गाढव जातो, हा एक प्रश्नच आहे म्हणा!

First Published on: August 12, 2018 5:13 PM
Exit mobile version