शिक्षकांच्या व्यथा, वेदनांचे स्वागत!

शिक्षकांच्या व्यथा, वेदनांचे स्वागत!

प्रातिनिधिक चित्र

वय वर्ष चाळीस. डोक्याचा गोटा झालेला. काळा ठिक्कर पडलेला काळजीवाहू चेहरा. आयुष्यभराचा पश्चाताप श्वासागणिक जाणवतोय. आजकाल पाहतोय असा की समोरच्याच्या काळजात धस्स व्हावं.जगता जगता रोजच मरत असतोय हजारदा हे त्याचे वाक्य चटके देतं काळजाला.तुम्हाला सांगतो मास्तर गावाकडे तोंड लपवून फिरावं लागतं, अन् शहरात उपाशी झोपावं लागतं. हे कोणतं भणंग आयुष्य आलं वाट्याला. तुम्ही शिकवता तेच मी पण शिकवतो अन् शिकलोही ना; पण मला बनियन घेताना दहादा विचार करावा लागतो मला.अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांविषयी जेव्हा शाळेत असताना पुस्तकात वाचायचो तेव्हा कधीच नव्हता केला विचार की यासाठीचा संघर्ष असतो.

सनातन. शाळेत शिक्षक सांगायचे शिकून माझ्यापेक्षा मोठ्ठा…शिक्षक हो! तेव्हा मी मोहरून यायचो. पण मला तेव्हा कुठं माहीत होतं की मोठ्ठ्या शिक्षकाची अशीही एक नोकरी असते शेळीच्या शेपटासारखी.ज्याने माशाही उठवता येत नाही अन् लाज ही झाकता येत नाही. मास्तर मी झगडतो; त्याबद्दल माझं कुथनं नाही.तर शिक्षणाने माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून येतं यावर उरला नाही माझा विश्वास. शिक्षणाने केलंय उद्ध्वस्त माझ्या सारख्या अनेकांना यावर तुम्ही तर विश्वास ठेवाल का? पण माझ्या वर्तमानाकडे पाहा अन् तुम्हीच सांगा मी तरी का म्हणून शिक्षणाने परिवर्तन होते या भूलथापांवर विश्वास ठेवू? समता,सामाजिक न्याय या गोष्टी मला आजकाल तर अफवाच वाटतात.वर्णव्यवस्था संपली बरं झालं. परंतु समाजात आजही औषधाला समता’दिसते काय? अहो,कॉलेजमध्ये प्राध्यापक बाटलीतलं घोटभर पाणी देताना सुध्दा परमनंट की सीएचबी याचा हिशोब ठेवतात. मग तुम्हीच सांगा मी कोणती समता व सामाजिक न्याय माझ्या विद्यार्थ्यांना शिकवू ? याच समानतेच्या शोधासाठी माझं उभं आयुष्य करपलं हो! अगदी अलिकडे आता तर आमच्या गावातील पोरं माझ्याकडे पाहून हसतात तेव्हा मी खजिल होतो.पण करणार काय? कारण मला आठवतं माय-बापाच्या डोळ्यातलं स्वप्न. मी शिकावं म्हणून त्यांच्या खस्ता.पण आज हिंमत होत नाही मास्तर मायबापाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची.गावात मी दिसलो की लोकं म्हणतात बरं झालं शिकवलं नाही आपल्या पोट्याला नाय तर त्याचा पणकवी झाला असता.तेव्हा मला आठवतात दया पवारांचे ते शब्द

“कशाला झाली पुस्तकांची ओळख?
बरा होतो ओहोळाचा गोटा
गावची गुरं वळली असती,
असल्या इंगळ्या डसल्या नसत्या”

हे दुःख जातीव्यवस्थेने अंगवळणी पडलेच होते; पण शिक्षणाने पुन्हा तेच वाट्याला आले. नव्या काळाच्या पोटात असंख्य वर्ग जन्माला आलेत मास्तर.पूर्णवेळ,अर्धवेळ,तासिका तत्व हे नुसते नोकरीचे वर्ग नव्हते; तर त्या आहेत तुमच्या माझ्यातल्या भिंती.त्यांना भेदून जाण्यासाठी हवी असते,जात,पोटजात,पैसा,मतदारसंघ आणि निवडणुकीत काम करण्याची हमी वगैरे असे बरेच काहीबाही. साध्या कारकुनाच्या नोकरीला मोजावे लागतात लाखो रुपये. बाकी सर्व बाजारभाव तुम्हाला माहितच आहेत, पुन्हा मी नव्याने काय सांगू? त्यात आरक्षण असेल तर पोटजातीचा हिशोब मांडला जातोय मास्तर. नवबौद्धापेक्षा मातंग बरा मातंगापेक्षा चर्मकार बरा तो तर हिंदू तरी असतो म्हणे…वगैरे
हा सगळा हिशोब करता करता डोक्यावरचे केसं गेले पण थकलो नाही अजून. पायात उसनं बळ एकवटून वाट शोधत राहतो मास्तर. परंतु, बायको जsव्हा म्हणते “बापाला तुमच्यात काय दिसलं होतं काय माहित, डोंबलं माझं.एखाद्या मोल मजुरी करणार्‍याला दिलं असतं तर लोकांच्या नाकावर टिच्चून कामधंदा करुन ऐटीत संसार थाटला असता, आता ना गावाकडं जाता येतं ना शहरात धुणी भांडी करता येतं, कारण नवरा काय करतो इचारलं तर कालेजात प्राध्यापक आहे म्हणून सांगायची लाज वाटते.त्यांना काय माहीत या बुवाला वर्षाकाठी कधीतर तीस बत्तीस हजार रुपये हातात टेकवले जातात ते. आज ना उद्या परमनंट होईल म्हणून लग्न होऊन आठ वर्ष झालं तरी मूलं होऊ दिलं नव्हतं,का तर या पैशात आपलंच भागेना मग आणखी खाणारं तोंड वाढवायचं कशाला.नंतर दहा वर्षाने लेकरू झालं तर त्याला आज शाळेत टाकायला फुटकी दमडी नाही. माझंच नशीब फुटकं मेलं. ती बिचारी भाबडी तिचा हा आक्रोश मी समजू शकतो.त्यात तिचा तर काय दोष तिनेही हळदीच्या पिवळ्या अंगाने रंगवली असतील ना स्वप्न सुखी संसाराची.पण या धुसर झालेल्या स्वप्नांसाठी तिनेही कधीपर्यंत बसावं गप्प. परंतु, तिचं आपलं सोप्पं आहे.ती स्वतःच्या प्राक्तनाला दोष देवून स्वतःच्या मनाची समजूत तरी घालते,पण माझे काय? मी तर म्हणे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारा माननारा. तिथं प्राक्तनाला दोष देवून पळ काढण्याची सोयही नसते. मग नुसता धुमसत असतो आतल्या आत.

ज्याचा आवाज नाही पोहचत तुमच्या पर्यंत. तरीही काही महाभाग भेटतातच फुकाचे तत्वज्ञान शिकविणारे. काय तर म्हणे कशाला नोकरीच्या मागे लागला.इतके पैसे भरुन नोकरी परवडते कुठे आज काल. तिच्या नादी लागण्यापेक्षा स्वतःचा उद्योग,व्यवसाय,शेती करणे चांगले. पण असा सल्ला देणार्‍यांना तारुण्याचे पंधरा वर्ष मोजलेत मी स्वप्नांसाठी त्याचे नसते मोल. अशांना काय माहीत स्वप्नानांचासौदा करणे नसते जमत काळीज असणार्‍या माणसांना. पंधरा वर्षे उपाशी पोटी दुसर्‍याच्या लेकरांना शिकवा, मग थोपटू यांची पाठ. लोकांचे सोडा मास्तर परंतु बायको जेव्हा असं काही बोलते तेव्हा मी मूळापासून हादरतो, आतल्याआत पूर्णअंशाने उध्वस्त करुन घेतो स्वतःला. वयाच्या तेवीसाव्या वर्षी नोकरीसाठी पात्रता धारण केली.त्याच कागदांवर थुंकतो मनातल्या मनात.तेव्हा नसते माझे कोणी मी कोणाचा.जोरात टाहो फोडला तरी निघत नाही आवाज.तेव्हा मीच घालतो माझी समजूत आणि गुणगुणत असतो मनाला बरं वाटावं म्हणून विंदाच्या शब्दांना….
“हा रस्ता अटळ आहे!
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ ,संभाळ ,लागेल पिसे!
रडणार्‍या रडशील किती?
झुरणार्‍या झुरशील किती?
पिचणार्‍या पिचशील किती?
ऐकू नको असलो टाहो
माझ्या मना दगड हो!


-डॉ.गणेश मोहिते

(प्राध्यापक बलभीम महाविद्यालय बीड )

First Published on: August 29, 2018 1:30 AM
Exit mobile version