पंजाबी धांगडधिंग्यात भुताचा शिरकाव!

पंजाबी धांगडधिंग्यात भुताचा शिरकाव!

पंजाबी चित्रपट मर गये ओय लोको

पंजाबी चित्रपटांमध्ये वर्षानुवर्षे पाहायला मिळणारा धांगडधिंगा या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. अर्थात या चित्रपटाशी काही मोठी नावं जोडली गेली असल्यामुळे तो आताच्या भाऊगर्दीत लक्षणीय ठरत आहे. गिप्पी ग्रेवाल हे पंजाबी चित्रपटसृष्टीमधील सध्याचं खूप महत्त्वाचं नाव. तिकडचा सुपरस्टारच म्हणा ना हवं तर. तो म्हणेल ती सध्या पूर्व दिशा आहे. पंजाबी गायक अभिनेता असलेल्या गिप्पीवर सध्या यश फिदा आहे. त्यामुळे तो जे काही करेल त्याला सध्या यश मिळतंय.अभिनय आणि गायनात मोठं यश मिळाल्यानंतर गिप्पीचा अर्थकारणातला रस वाढला नि तो थेट पंजाबी चित्रपट निर्मितीकडे वळला. ‘मर गये ओये लोको’च्या आधी त्यानं आपल्या ‘हंबलमोशन पिक्चर्स’ या बॅनरखाली ‘अरदास’ आणि ‘मांजे बिस्तरे’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘मर गये ओये लोको’ हा त्याचा निर्माता म्हणून तिसरा चित्रपट. यावेळी त्यानं आपल्या चित्रपटाची व्यावसायिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. गिप्पीचे या वर्षी ‘सुभेदार जोगिंदर सिंग’ आणि ‘कॅरी ऑन जट्टा २’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यांना प्रेक्षकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘सुभेदार जोगिंदर सिंग’चं दिग्दर्शन सिमरजित सिंग यांनी केलं आहे. त्यावेळचा अनुभव अतिशय चांगला असल्यानं गिप्पीनं आपल्या तिसर्‍या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सिमरजितकडे सोपवली. ‘मर गये ओये लोको’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून प्रेक्षकांना यात काहीतरी धमाल पाहायला मिळणार आहे. ‘मॅड कॉमेडी’हा चित्रपटाचा ‘जॉनर’ असून गिप्पी त्यामध्ये दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एका भूमिकेत तो सर्वसाधारण माणूस असून दुसर्‍या भूमिकेत तो भुताच्या रुपात अवतरणार आहे.गिप्पीच्या नायिकांबद्दल त्याच्या चाहत्यांना नेहमीच अप्रूप असतं. यावेळीही गिप्पीनं आपल्या नायिकेबद्दलची उत्सुकता खूपच वाढवत कालांतरानं प्रेक्षकांना धक्का दिला.

या चित्रपटात गिप्पीबरोबर झळकणार आहे ती ब्रिटनमध्ये वाढलेली अभिनेत्री सपना पब्बी. सपना एक प्रथितयश मॉडेल असून यापूर्वी ही ‘खामोशियाँ’ या हिंदी चित्रपटामधूनही झळकली आहे. अनिल कपूर निर्मित ‘२४’ या मालिकेमध्येही सपना पब्बी पाहायला मिळाली होती. सपनाचा हा पहिलाच पंजाबी चित्रपट आहे. गिप्पी आपल्या अष्टपैलू कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसह त्यानं त्याचं लेखनही केलं आहे. या वर्षीच्या बैसाखीला म्हणजे १५ एप्रिलला गिप्पीनं या चित्रपटाचा मुहूर्त केला आहे. आपल्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिप्पीनं अवघ्या चार महिन्यांमध्ये हा चित्रपट पूर्ण केला असून तो आता ३१ ऑगस्टला प्रदर्शितही होत आहे.

पंजाबी चित्रपटांमध्ये संगीताला खूप महत्त्व असतं. गिप्पीला याची जाणीव असल्यामुळे त्यानं या चित्रपटाच्या संगीतावर विशेष काम केलं आहे. गुरु रंधवाचं पहिलं पंजाबी गाणं या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘आजा नि आजा’ असे या गाण्याचे बोल असून ‘यु ट्यूब’ वाहिनीवर या गाण्यानं सध्या धमाल केली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या गाण्याचा व्हिडीओ सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. पंजाबमध्येच हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. गिप्पीचा फॅन फॉलोअर मोठा आहे. त्यामुळे हा चित्रपट व्यावसायिक आघाडीवर काही तरी मोठी करामत करील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


– मंदार जोशी

(लेखक सिने अभ्यासक आहेत)

First Published on: August 4, 2018 1:00 AM
Exit mobile version