मराठी मुलीने रेल्वेत घडवला इतिहास

मराठी मुलीने रेल्वेत घडवला इतिहास

मी मूळची सातार्‍याची. एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. त्यानंतर शिक्षणाची ओढ असल्यामुळे मी १९८६ ला कराडच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलमध्ये प्रवेश घेऊन इलेक्ट्रिक अभ्यासक्रमाची पदवी घेतली. अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर रेल्वेत मोटरचालक म्हणून माझी निवड झाली. मात्र, मला आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचे पूर्वीपासून स्वप्न होते. त्या स्वप्नपूर्तीसाठी मध्य रेल्वेकडून आणि विशेष करून माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आज भारताची नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे महिला चालक होण्याचा मान मला मिळाला आहे. याचा मला अभिमान तर वाटतोच. मात्र, त्यापेक्षाही जास्त माझ्याकडून प्रोत्साहित होऊन अनेक मराठी मुली रेल्वेमध्ये येण्यासाठी धाडस करत आहेत.

माझी सुरुवात मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक, इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर तसेच ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करत झाली आहे. आता मध्य रेल्वेच्या महिला लोको पायलटचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरचालक म्हणून निवड झाली. त्यानंतर सप्टेंबर १९८९ मध्ये मालवाहू गाडीची सहायक इंजिन ड्रायव्हर म्हणून नोकरी स्वीकारली आणि हे काम मार्च १९९३ पर्यंत हे काम केले. मार्च १९९३ ते ऑगस्ट १९९३ पर्यंत इगतपुरी घाट तर सप्टेंबर १९९३ ते एप्रिल १९९४ मध्ये लोणावळा घाटात मेलला मागून धक्का देणार्‍या इंजिनचे सहायक ड्रायव्हर म्हणून काम केले. घाट विभागात रेल्वे गाडी चालवणे फार कठीण असते. मात्र, सिग्नल, स्थानक, गाडीचा वेग, सांधा बदलत असताना घ्यायची काळजी ही सारी चक्रे एकाचवेळी डोक्यात फिरत असतात. त्यामुळे दिवस असो वा रात्र. गाडी चालवताना मला भीती वाटत नव्हती. ऑगस्ट १९९४ ते मार्च १९९५ पर्यंत मालगाडी इंजिन ड्रायव्हरची जबाबदारी पार पाडली. तसेच मला सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविण्याचा मान मिळाला आहे.

माझ्या कार्यासाठी मला नुकतेच भारत सरकारतर्फे फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मला अनेक सहकारी बोलतात, सुरेखा तुझी सेवापुस्तिका पाहिल्यास तुझा जन्म जणू विक्रमासाठीच झाला असावा. मात्र, असे काही नसून तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्या काळात महिलांच्या शिक्षणाला फार महत्त्व दिले जात नव्हते. मात्र, कुटुंबियांनी माझ्या शिक्षणाला महत्त्व दिल्यामुळे आज मला समाजा मान मिळतो. हा मान माझा नसून भारतीय रेल्वेचा आणि माझ्या कुटुंबियांचा आहे. आज शिक्षणाचे प्रमाण वाढले असून महिला प्रत्येेक क्षेत्रात पुढे आहे. आता भारतीय रेल्वेत काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला येत असून त्याचा मला मोठा आनंद वाटतो. आजपर्यंत कल्याणच्या प्रशिक्षण केंद्रात १०० महिला रेल्वेचालक घडवल्या आहेत. त्यांचासुद्धा मला अभिमान वाटतो आहे. भारतीय रेल्वेत महिलांना चांगली संधी आहे. कठोर परिश्रमांनी आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. फक्त आपल्या कार्यात सातत्य असणे गरजेचे आहे.

-सुरेखा यादव (लेखिका आशियातील पहिल्या रेल्वे महिला चालक आहेत )

First Published on: March 8, 2020 2:23 AM
Exit mobile version