दोन महानायकांचा संगम !

दोन महानायकांचा संगम !

‘एबी आणि सीडी’ हे आहे या आठवड्यात प्रदर्शित होणार्‍या एका मराठी चित्रपटाचे नाव. आजकाल काही मराठी चित्रपटांची नावे मराठीमध्ये नाही, तर अन्य भाषांतच असतात. पण तो वेगळा विषय आहे. तर या आता पडद्यावर येणार्‍या चित्रपटाचे नाव आहे ‘एबी आणि सीडी’ म्हणजे हे नाव इंग्रजी-मराठीत आहे. हा चित्रपट मराठीतच आहे. पण त्याची पोस्टर पाहिली की वाटते की हे नाव खरे म्हणजे ‘एबी आणि व्हीजी’ असे असायला हवे होते. कारण हिंदी आणि मराठीतील दोन उत्तम अभिनेते या चित्रपटात एकत्र येत आहेत. ते आहेत अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले. (अमिताभ बच्चन पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे.)

तसे या दोघांच्या भूमिका असलेले काही हिंदी चित्रपट याआधी येऊन गेले आहेत. त्यातील काही अद्यापही आठवतात. अमिताभ असूनही विक्रमचा प्रभाव दिसला तो अग्निपथमधील कमिशनर गायतोंडे आणि खुदा गवाहमधील जेलर म्हणून. पण मराठीत या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी, खरे तर पर्वणीच म्हणायला हवी, ती मराठी रसिकांना प्रथमच मिळणार आहे. ज्या कुणाला ही कल्पना सुचली आणि ज्यांच्या प्रयत्नांनी ती अमलात आणली गेली त्यांचे कौतुकच करायला हवे.

अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले. दोघे साधारण बरोबरीचे. म्हणजे तसा अमिताभ विक्रमहून तीन वर्षांनी मोठा आहे, पण आता दोघांच्याही सत्तरीत दोन तीन वर्षांचा फरक म्हणजे काहीच नाही. दोघेही आता बहुतांशी चरित्र अभिनेते म्हणूनच आपल्याला भेटतात (आणि तरीदेखील चांगलेच, अगदी नायकाएवढे प्रभावी ठरतात) हे खरे. कित्येक वर्षे नायक म्हणूनही रसिकांच्या मनावर राज्य करून आता ते ज्या प्रकारच्या भूमिका करतात त्यांचेही गारूड रसिकांवर असते. हिंदीत त्यांचे ‘परवाना’, ‘अकेला’, ‘अग्निपथ’ आणि ‘खुदा गवाह’ असे चित्रपट आहेत. मात्र ‘हम कौन है’ हा चित्रपट मात्र कधी आला (आणि गेला) ते कळलेच नाही. बहुधा म्हणूनच पाहता आला नाही. तो 2004 मध्ये आला होता असे नेटवर दिसते. पण अमिताभ, धर्मेंद्र, विक्रम आणि डिंपल कपाडिया असे कलाकार असूनही असे का व्हावे, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

अमिताभ आणि विक्रम यांच्यात काही साम्यस्थळे आहेत. दोघांचेही वडील कलाकार होते. हरिवंशराय बच्चन कवी तर चंद्रकांत गोखले अभिनेते. दोघांचेही प्रेमविवाह. जया अमिताभ यांची चित्रपटांत तर विक्रम आणि वैशाली यांची भेट नाटकामध्ये झाली. दोघेजणही त्यांच्या आवाजासाठी प्रसिद्ध, तितकेच अभिनय सामर्थ्याविषयी. अमिताभला ते कौशल्य दाखवायला चांगला वाव मिळाला. पण विक्रमच्या अभिनयाचा प्रभाव जास्त करून नाटकांत ‘बॅरिस्टर’मध्ये दिसला. तशी त्याची कारकिर्ददेखील ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातूनच सुरू झाली होती. अमिताभ प्रथम ‘सात हिंदुस्तानी’ मध्ये दिसला आणि जयाबरोबर लग्न केल्यानंतर त्याची कारकिर्द बहरली. तो बहर अद्यापही कायम आहे! दोघेही छोट्या पडद्यावर दिसतच असतात.

‘अग्निपथ’मध्ये विक्रमला कमी लांबीची पण वजनदार भूमिका असली तरी तो आणि अमिताभ या दोघांतील प्रसंग छान रंगले होते. दोघा तुल्यबल अभिनेत्यांची ती चकमक नव्हती, कारण स्पर्धा न करता, त्यांनी कथानकाला न्याय देण्यासाठी योग्य तो संयम दाखवला होता. त्यात दुसर्‍यावर मात करण्याचा अट्टाहास नव्हता. विक्रम अधिकारी असला तरी त्याला अमिताभबद्दल सहानुभूती आहे, हे अचूक दाखवतो. अमिताभसारखा तालेवार अभिनेता समोर असूनही तो कुठेही कमी पडत नाही. अमिताभही आपल्याला त्याच्याबद्दल कुठेतरी आदर आहे, हे चांगले दाखवतो.

तीच गोष्ट ‘खुदा गवाह’ मधील जेलरची. तेथे तर विक्रमला जेलरबरोबरच प्रेमळ पित्याची भूमिकाही वठवावी लागली होती. (अमिताभलाही, तो डबलरोलमध्ये असल्याने मुलीपासून ताटातूट झालेल्या पित्याची!) त्यामुळेच दोघांनाही चांगली संधी होती आणि त्यांनी तिचे सोने केले. म्हणूनच अमिताभ इतकीच विक्रमचीही भूमिका ध्यानात राहाते. कदाचित त्याच्या या गुणामुळेच अमिताभ मराठीत त्याच्याबरोबर भूमिका करण्यासाठी तयार झाला असेल. पण ते आता ‘एबी आणि सीडी’ मध्ये समोरासमोर आल्यावर काय करतात ते बघायचे!

First Published on: March 14, 2020 5:11 AM
Exit mobile version