मी, मतकरी आणि आमची १० नाटकं!

मी, मतकरी आणि आमची १० नाटकं!

दिग्दर्शक-अभिनेता विजय केंकरे

माझी आणि मतकरी यांची खरंतर पहिली भेट आठवणं कठीण आहे. आमच्या लहानपणी रत्नाकर मतकरी आणि सुधा करमरकर यांची नाटकं बघत आम्ही मोठे झालो. सुधा करमरकर ही माझी सख्खी मावशी असल्यामुळे मतकरींच्या घरी लहानपणापासूनच येणं जाणं होतं. त्यांच्या संपूर्ण घरातच नाटक आहे. त्यामुळे आमची हक्काची जागा होती ती. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच मतकरी आणि त्यांचं लेखन या संस्कारात मी वाढत होतो. पुढे राज्य नाट्य स्पर्धेतली त्यांची नाटकं बघायला आम्ही जायचो. त्यांची सूत्रधार नावाची संस्था होती. चुटकीचं नाटक, लोककला ७८, आरण्यक, अशी त्यांची अनेक नाटकं आम्ही तेव्हा बघितली. सूत्रधार संस्थेचं नाटक असलं की ते बघायला जायचचं, कारण खात्री होती नक्कीच चांगलं काहीतरी बघायला मिळणार, ती आमच्यासाठी संधी होती. ती संधी अजिबात जाऊ द्यायचो नाही. एकीकडे त्यांची स्पर्धेतील नाटकं बघून मोठं होत असताना मतकरींच्या एकांकिका आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं वाचन दुसरीकडे सुरू होतच. पण असं असलं तरी त्यांचा आणि माझा खरा संबंध आला तो १९८६ साली.

मी १९८६ साली ‘विठोबा रखुमाई’ नाटक दिग्दर्शित केलं होतं. हे नाटक मतकरी यांनी लिहिलं होतं. त्यांनी पहिल्यांदाच धनगर भाषेत म्हणजेच धनगरांच्या जीवनावर आधारीत असं नाटक लिहिलं होतं. दुर्गाबाई भागवतांच्या ‘पैस’ या पुस्तकावर आधारीत ते नाटक होतं. संगीत अकादमीच्या महोत्सवासाठी ते नाटक बसवलं होतं. त्या नाटकापासून म्हणजे १९८६ पासून माझा आणि मतकरींचा एकत्र प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत सुरू होता. मतकरी उत्तम लेखक तर होतेच, पण ते उत्तम दिग्दर्शकही होती. त्यांनी स्वत:ची अनेक नाटकं दिग्दर्शित केली त्यानंतर त्यांची सर्वात जास्त नाटकं दिग्दर्शित करणारा मी होतो. त्यामुळे नाटककार म्हणून ते माझ्या फार जवळचे होते. ते स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी उगाचच फापटपसारा असणारी नाटकं लिहिली नाहीत. त्यांनी रंगावृत्ती करूनच नाटकं लिहिली, हे त्यांचं फार मोठं वैशिष्ठ्य होतं. त्यांचं नाटकं बसवताना दिग्दर्शकाला त्रास व्हायचा नाही.

कादंबरी, कथा, एकांकिका, गुढ कथा, लेख, आणि दीर्घांकी नाटकं एवढ्या प्रकारात ते लिहीत असल्यामुळे या प्रकारातील नेमका फरक त्यांना कळत होता. त्यामुळे एखादी गोष्ट सुचल्यानंतर त्याची कादंबरी करावी की नाटक करावं याची त्यांना उत्तम जाण होती. त्यामुळे कथा गोष्टीच्या संरचनेतील पकड, त्यातील ओघवते संवाद ही त्यांची वैशिष्ठ्ये होती. मुख्य म्हणजे लहान मुलांसाठी अनेक नाटकं लिहिली असल्यामुळे त्यांच्याकडे एखादी गोष्ट सुलभ सांगण्याची अभिजात जाण होती.
त्यांचं वाचन, सामाजिक भान प्रचंड होतं. त्यांनी मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणातदेखील विविधता होती. उत्तम विनोदाची जाण, इतिहासाचा अभ्यास प्रचंड होता. दुसरं म्हणजे त्यांच्यातील उत्साह कायम टिकून होता. अगदी शेवटपर्यंत ते लिहीत होते. वयाच्या ८० व्या वर्षीसुध्दा ते ‘गांधी :अंतिम पर्व’च्या अभिवाचनाचे कार्यक्रम करत होते.

ते नेहमी समग्र प्रतिक्रिया द्यायचे. त्यांच्या दहा नाटकांचं मी दिग्दर्शक केलं, पण कधीही ते उगाच कौतुक करायचे नाहीत. बरं केलयंस, ही एवढीच प्रतिक्रिया ते द्यायचे. पण आज त्यांनी मला त्यांची दहा नाटकं दिग्दर्शित करायला दिली, हीच माझ्यासाठी मोठी पावती ठरली आहे. दिग्दर्शन करताना त्यांची खूप मदत व्हायची. ते तालमीला यायचे, आम्हाला सुचना करायचे. आमच्या वयात जरी अंतर असलं ना तरी आमच्यात मैत्री होती. त्यांचा माझ्यावर हक्क होता, त्याचप्रमाणे माझ्यावर खूप जीवही होता त्यांचा. फार मोठा माणूस होता तो. असा नाटककार पुन्हा निर्माण होणं कठीण आहे.

(शब्दांकन : संचिता ठोसर)

First Published on: May 19, 2020 4:55 AM
Exit mobile version