कॅन्सरग्रस्तांना पंचकर्म चिकित्सा लाभदायी

कॅन्सरग्रस्तांना पंचकर्म चिकित्सा लाभदायी

चिकित्सा

कॅन्सर या व्याधीमुळे तसेच केमोथेरपी-रेडिओथेरपी-शस्त्रकर्म या आधुनिक उपचारांमुळे बरेच कॅन्सर रुग्ण दुर्बळ झालेले असतात. अशावेळी त्यांना शोधन चिकित्सा किंवा पंचकर्म चिकित्सा देता येत नाही. मात्र ज्या कॅन्सरग्रस्त रुग्णांचे बल चांगले असते, अशा रुग्णांत, पंचकर्म ही समूळ व्याधींचा नाश करणारी चिकित्सा असल्याने अधिक लाभदायी ठरते.

मागील लेखात आपण विविध कॅन्सर प्रकारांची लक्षणे व आनुषंगिक वैद्यकीय तपासण्या यांची माहिती घेतली. आजच्या सदरात आपण कॅन्सर व आयुर्वेदीय चिकित्सा याबाबत जाणून घेणार आहोत.

आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपी या प्रचलित कॅन्सर चिकित्सा पध्दती आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार कॅन्सर व्याधीची चिकित्सा सामान्यत: शोधन, शमन, अनुषंगिक उपक्रम, रसायन चिकित्सा, पथ्यापथ्य व समुपदेशन अशी केली जाते.

आयुर्वेदात शोधन चिकित्सेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लंघन म्हणजे लघु आहार, शरीरात हलकेपणा निर्माण करणारा विहार, अन्नाचे पचन करणारी पाचक औषधे अशा चिकित्सेच्या सहाय्याने प्राकृतावस्थेत आलेले दोष पुन्हा डोके वर काढून आजाराचा पुनरुद्भव करू शकतात, परंतु शोधन चिकित्सेने म्हणजेच पंचकर्मांनी शरीराबाहेर काढून टाकलेले दुष्ट दोष पुन्हा व्याधी निर्माण करूशकत नाहीत.

शोधन चिकित्सा म्हणजेच पंचकर्म चिकित्सा घेण्यासाठी रूग्णाचे शारीरिक बल उत्तम असणे, व्याधीचे बल अधिक असणे व शरीरात आमदोषाची लक्षणे नसणे या आवश्यक गोष्टी असतात. कॅन्सर या व्याधीमुळे तसेच केमोथेरपी-रेडिओथेरॅपी-शस्त्रकर्म या आधुनिक उपचारांमुळे बरेच कॅन्सर रुग्ण दुर्बळ झालेले असतात. अशावेळी त्यांना शोधन चिकित्सा किंवा पंचकर्म चिकित्सा देता येत नाही. मात्र ज्या कॅन्सरग्रस्त रूग्णांचे बल चांगले असते, अशा रुग्णांत, पंचकर्म ही समूळ व्याधींचा नाश करणारी चिकित्सा असल्याने अधिक लाभदायी ठरते. दीपन, पाचन यासारख्या शमन चिकित्सेने काहीवेळा व्याधीचा पुनरूद्भव होतो, परंतु शोधन चिकित्सेने बरे झालेले व्याधी पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी असते.

शोधन चिकित्सा तीन टप्प्यांत पूर्ण होते. स्नेहन म्हणजे सर्व शरीरास मसाज करणे व स्वेदन म्हणजे सर्व शरीरास औषधी काढ्याची वाफ देणे. या दोन कर्मांचा समावेश पूर्वकर्मात होतो. प्रधानकर्मात वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण व नस्य या ५ कर्मांचा समावेश होतो.

वमन म्हणजे वामक औषधांची चुर्णे किंवा काढे देऊन रुग्णास उलटी करविणे. वमन ही प्राधान्याने कफ दोषाची चिकित्सा आहे. रेचक औषधे देऊन पित्ताशयातील दोष गुदमार्गाने बाहेर काढणे म्हणजे विरेचन होय. ही प्राधान्याने पित्तदोषाची चिकित्सा आहे. औषधी तेल/तूप किंवा औषधी काढे यांचा गुदमार्गाने दिलेला एनिमा म्हणजे बस्ति होय. औषधी तेल/तुपाच्या गुदमार्गाने दिलेल्या एनिमास अनुवासन बस्तितर औषधी काढ्याच्या एनिमास निरुहबस्ति म्हणतात. ही वातदोषाची प्रधान चिकित्सा आहे. अलाबू, शृंग, जलौका किंवा यंत्राच्या सहाय्याने सिरेचा वेध करून दूषित रक्त शरीराबाहेर काढणे म्हणजे रक्तमोक्षणहोय. ही दुष्ट रक्तधातूची चिकित्सा आहे. नाकपुड्यांतून औषधी तेल/ तूप, चूर्ण प्रविष्ट करणे यास नस्य म्हणतात. नस्य ही प्राधान्याने शिर:प्रदेशातील कुपित वात व कफाची चिकित्सा आहे.

वरील ५ कर्मांपैकी ज्या व्याधीत जे कर्म आवश्यक आहे ते तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. पश्चातकर्मात संसर्जन क्रम म्हणजे विशिष्ट पथ्यकर आहार – विहार योजनेचा समावेश होतो.

विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये विशिष्ट प्रकारचे पंचकर्म उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, गल (घसा), फुफ्फुस यांत वमन; ग्रहणी, लहान आतडे, पित्ताशय, यकृताचा कॅन्सर, ल्युकेमिया यांत विरेचन; मोठे आतडे, गुद, प्रोस्टेट, पुरुष बीजाण्ड, योनी, गर्भाशय, स्त्री बीजग्रंथी तसेच हाडाच्या कॅन्सरमध्ये बस्ति; मस्तिष्क (मेंदू), नासा, तालु यांच्या कॅन्सरमध्ये नस्य व यकृत, पित्ताशयाचा कॅन्सर, ल्युकेमिया यांत रक्तमोक्षण केले जाते. अर्थात हे सर्व उपक्रम जितके तात्काळ फलदायी असतात, तितकेच चूक झाल्यास तात्काळ उग्र उपद्रव निर्माण करणारे असतात. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने व पूर्णत: वैद्यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक असते.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख

First Published on: May 26, 2019 4:51 AM
Exit mobile version