#Metoo चळवळीचा खरा अर्थ

#Metoo चळवळीचा खरा अर्थ

#Me Too

#Metoo चं वादळ एव्हाना जगभर पसरलं आहे सगळीकडे. तसं बघायला गेलं तर तराना बर्क ह्या कार्यकर्तीने साधारण २००६ साली एका इंटरव्ह्यूमध्ये लहान वयात तिच्या बरोबर झालेल्या यौन शोषणाबद्दल बोलताना Metoo ही टर्म पहिल्यांदा वापरली होती, जेणेकरून ज्या स्त्रियांना लैंगिक छळ, शोषण ह्या सारख्या अनुभवातून जावं लागलं त्यांना आपण एकट्या नाही आहोत ह्याची जाणीव होईल. पुढे २०१७ साली अमेरिकेतील फिल्म प्रोड्युसर हार्वी वाइनस्टीन वर लैंगिक शोषण, रेप ह्या सारखे गंभीर आरोप लावले जात असताना एलिसा मिलानो ह्या नायिकेने सोशल मीडियावर एक मेसेज टाकला ज्यात ती म्हणाली की जर तुम्ही एक स्त्री म्हणून आयुष्यातल्या कोणत्याही टप्प्यात लैंगिक शोषण, अत्याचार, छळ ह्याला बळी पडला असाल तर तुम्ही #Metoo हा स्टेट्स लावा म्हणजे ह्या समस्येबाबतची गंभीरता सर्वांना लक्षात येईल. त्यानंतर वर्षभरात ह्या #Metoo ने एक चळवळीचं रूप धारण केलं आणि जगभरात हे वारं वाहायला लागलं.

अमेरिकेत हार्वी वाइनस्टीनवर जेव्हा असे आरोप लावले गेले तेव्हा त्याला त्यानेच उभारलेल्या कंपनीतून काढून टाकण्यात आले. ह्याउलट इटलीमध्ये ‘Metoo’ ला फार वेगळा प्रतिसाद मिळाला. Asia Argento ह्या नायिकेला लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल मीडिया आणि एकूणच समाजाकडून फार टीकेला सामोरे जावे लागले. अगदी तिची तुलना एका वैश्येशी करण्यात आली. इटलीच्या लोकसभेच्या प्रेसिडेंट Laura Boldrini ह्यांनी जेव्हा फक्त महिलांकरिता एक सभा घेतली त्या सभेत त्या उपहासाने म्हणाल्या की आपल्या देशात कोणत्याही प्रकारचा छळ होत नाही. तुम्ही ह्या पद्धतीचा विनोद का केलात असं त्यांना विचारलं गेलं असता त्या म्हणाल्या की छळ तर प्रचंड प्रमाणात होतो, पण इटलीचे ह्याबाबत खूप जास्त पूर्वग्रह असल्याने इथे स्त्रिया ह्या बाबतीत बोलायची हिम्मत करत नाहीत.

फ्रान्समध्ये ह्या चळवळीचं स्वरूप वेगळ्याच पद्धतीने पाहण्यात आलं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन ह्यांनी #BalanceTonPorc ह्या metoo सदृश्य चळवळीला पूर्ण पाठींबा देऊन जास्तीत जास्त महिलांनी पुढे यावं असं अपील केलं. पण फ्रान्समध्ये metoo चळवळीला पूर्णपणे पाठींबा मिळाला असं नाही. जानेवारी २०१८ मध्ये १०० प्रसिद्ध फ्रेंच स्त्रियांनी एका फ्रेंच वृत्तपत्रात ओपन लेटर प्रसिद्ध केलं ज्यामध्ये metoo ही चळवळ पुराणमतवादी आहे असा आरोप त्यांनी केला. फ्रान्सच्या कल्चरमध्ये सिडक्शन आणि फ्लर्टेशन ह्या दोन महत्वाच्या बाबी मानल्या जात असल्याने metoo बाबतचा बॅकस्लॅश काही प्रमाणात दिसून येतो . फ्रान्सचे प्रेमाचं शहर म्हणून ओळखले जातं त्या पॅरिसमध्ये दोन विचारधारांमध्ये metoo बाबत मतभेद दिसून येतात.

भारतामध्ये Metoo ने चांगलीच पकड घेतली आहे. ही चळवळ फक्त सिनेसृष्टी इतपत संकुचित न राहता एकूणच कामाच्या ठिकाणी महिलांवर होत असलेल्या लैंगिक शोषणावर आणि छळावर वाचा फोडण्यासाठी सुरू करण्यात आली होती. अगणित कारणांसाठी स्त्रिया ह्यावर बोलायला कचरतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण तक्रार केली तर काही बदल घडणार नाही हे माहित असल्याने आणि उलटं आपल्याच चारित्र्यावर शंका घेतली जाईल ही भीती फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरातील बर्‍याच स्त्रियांना वाटते हे दिसून येतं.

लैंगिक शोषण, अत्याचार, छळ होत असल्यास त्यात त्या स्त्रीचा काही एक दोष नसून तिने ह्या विरुद्ध आवाज उठवला तर तिला जज न करता त्या पुरुषावर कारवाई केली जाईल ह्यावर स्त्रियांचा विश्वास बसणं सगळ्यात जास्त महत्वाचं. आज सोशल मीडियावर पोस्ट्सच्या स्वरूपात, वेगवेगळ्या पेजेसवर आपलं मन मोकळं करून ह्या अशा प्रकारांनी आतून उध्वस्त झालेल्या स्त्रिया मन मोकळं करता आहेत. ह्या निमित्ताने का होईना काही त्यांच्या जखमा भरून निघणार असतील तर बरंच आहे. एक स्त्री म्हणून प्रत्येक बाई थोड्या अधिक प्रमाणात ह्या हरॅसमेंटला सामोरी जात असतेच. त्याचं स्वरूप वेगवेगळ असू शकतं पण आपण एक स्त्री आहोत म्हणून हे सगळं होणारंच असं स्वतःच स्वतःला बजावून बायका आपल्या टॉलरन्सनुसार एकतर ह्या कडे दुर्लक्ष करतात किंवा आत कुढत बसतात. सगळ्यात आधी ही मानसिकता बदलणं महत्वाचं वाटतं. तू अमुक एक कपडे घालतेस म्हणून, असं तसं वागतेस म्हणून, अंधाराच्या वेळी बाहेर असतेस म्हणून, उगाच फार स्टायलिश राहतेस म्हणून, जरा जास्तच मोकळी वागतेस म्हणून असे सतराशे साठ कारणं देऊन जे होतं आहे त्यात तुझीच काहीतरी चूक असणार असा जो एकूण समाजाचा दृष्टीकोन आहे आणि त्या अनुषंगाने स्त्री ज्या पद्धतीने स्वतःला आणि इतर स्त्रियांना जोखते ते थांबलं पाहिजे. स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे हा विचार बदलणं गरजेचं आहे.

आपल्या बरोबर असं काही घडलं मग ते कोणीतरी नुसता धक्का मारणं असेना.. कोणतीही गोष्ट जी लैंगिक हॅरॅसमेंटमध्ये येते जसं की आपल्या संमती विरुद्ध स्पर्श करणं, आपली इच्छा नसताना सेक्शुअल मेसेजेस पाठवणं, कन्सेंट नसताना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करणं ह्या बद्दल स्त्रीने आवाज उठवणं गरजेचं आहे. प्रत्येकीला नाही येत तलवार उपसून लढता.. अगदीच मान्य पण जर ती हिंमत Metoo चळवळ बाईला देऊ शकली तर ते फार मोठं यश असेल असं मी मानते. कामाच्या ठिकाणी ते काम आहे म्हणून, बाहेर वावरत असताना हा समाज आहे म्हणून, घरी हे आपलं कुटुंब आहे म्हणून जर ती सहन करत राहिली तर ती स्वतःवर तर अन्याय करत आहेच, पण उद्याच्या स्त्रीवर सुद्धा अन्याय करते आहे. मी चालवून घेणार नाही असं सांगण्याची हिंमत बाईत येणं गरजेचं आहे. त्यासाठी भली मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. पण त्या वेळेला तू एकटी नाही आणि आम्ही तुझ्या बरोबर आहोत ही भावना स्त्रियांमध्ये आणणं गरजेचं आहे. ह्यासाठी सपोर्ट ग्रुप्स उभारला जाणं, त्यांनी रिऍलिस्टिकली बायकांना मदत करणं, कधी कायदेशीरदृष्टया, कधी भावनिकदृष्टया, कधी आर्थिकदृष्टया हे असं स्ट्रक्चर उभं राहणं गरजेचं आहे.

हॅशटॅगच्या आजच्या जमान्यात ‘Metoo’ फक्त एक प्रसिद्धीसाठी, काँन्ट्रोव्हर्सीसाठी, पैशासाठी, फॉल्स फेमिनिझमसाठी, उगाच चिखलफेक करण्यासाठी,मोठ्या मोठ्या पुरुषांना काही कारण नसताना बदनाम करण्यासाठी, यामुळे बायका स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत, आता कोणताही पुरुष स्त्रीशी बोलताना शंभरदा विचार करेल किंवा कामाच्या ठिकाणी आता बायकांना नोकरी देताना मॅनजमेंट हजारदा विचार करेल ह्यासारखं क्रिटिसिझम ‘Metoo’ च्या मूळ मुद्द्याला झोकाळून टाकण्याची शक्यता वाटते. मन मोकळं केलं की झालं इतपत ह्याचं स्वरूप सीमित राहायला नकोय. म्हणूनच Metoo हे फक्त हॅशटॅग न राहता..एक फॅड न राहता.. एक विचारधारा म्हणून अंमलात आणली गेली पाहिजे.त्याचप्रमाणे सगळेच पुरुष लांडगे नसतात ही बाब देखील स्त्रियांना पटवून देणं गरजेचं वाटतं.

हरॅसमेंटची तीव्रता किती ह्यावरून स्त्रीच्या मनाला,आत्म्याला पुन्हा पूर्ववत करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. हे अनुभव जरी वाचले तरी कित्येकदा अंगाचा थरकाप उडतो आणि मग नकळत पणे स्त्री सर्व पुरुषांना एकाच चष्म्यातून पाहायला लागते का असं प्रश्न मला पडतो. ह्यात चूक आहे की बरोबर हा मुद्दाच नाहीये. काही अनुभव स्वतः घेतल्यामुळे , काही अनुभव ऐकल्या – वाचल्यामुळे समस्त पुरुषांबद्दल मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष, चीड आणि त्रागा मनात न ठेवता एक व्यक्ती म्हणून स्त्रीला आनंदी आणि मोकळं आयुष्य जगता येणं गरजेचं वाटतं. तसं होण्यासाठी आपण काय करू शकतो हे एक समाज म्हणून आपला जेंडर बाजूला ठेवून जर सर्व जण विचार करू शकलो, त्या दृष्टीने काही निर्णायक पावलं उचलू शकलो तरच ह्या चळवळीला खरा अर्थ प्राप्त होईल.


सानिया भालेराव

First Published on: October 23, 2018 12:56 AM
Exit mobile version