झेंडा बदलला….काळाचं काय?

झेंडा बदलला….काळाचं काय?

मनसे

मुंबईत रंगशारदा येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, असे राज ठाकरे यांनी बजावले. राज ठाकरे हे जरी हिंदुहृदयसम्राट नसतील तरी त्यांची पुढील वाटचाल हिंदुत्वाच्याच मार्गाने होणार असल्याचे त्यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या मनसेच्या सभेतून स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मनसेचा झेंडा बदलला, त्यासोबतच पक्षाचा अजेंडाही बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अजेंडा मनसेने खरंच इतक्यातच बदलला होता का, तर नाही. मनसेची स्थापना हिंदुत्ववादी शिवसेनेतून बाहेर पडूनच झाली होती. त्यामुळे, त्यांच्यातील आक्रमक विचारधारा आणि कार्यकर्ते, उद्दिष्ट हे हिंदुत्वापासून त्यावेळीही वेगळे नव्हतेच. प्रश्न हाच होता की, शिवसेनेचे हिंदुत्व कोणत्या विचारांच्या आधारावर होते. मुस्लीम समुदायातील कथित धर्मांधतेला विरोध हा हिंदुत्वाचा राजकीय अजेंडा शिवसेनेचा राहिला होता. त्यातून आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार शिवसेनेने वेळोवेळी केला. तत्कालीन काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष मानल्या जाणार्‍या समाजवादी, राष्ट्रवादी अशा पक्षांचेही धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न दुसरीकडे सुरू होतेच, तर त्याविरोधातील हिंदू मतांचे ध्रुुवीकरण करण्यात शिवसेना आणि भाजपा आग्रही होते. त्यामुळे शिवसेनेला खरा धोका प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपकडूनच होता. महाराष्ट्रात राबवलेल्या सत्ताकारणातील आक्रमक हिंदुत्वाचे वाटेकरी भाजपाला करणे शिवसेनेला जमणारे नव्हते.

अयोध्या प्रश्नाचा निकाल लागल्यावर हिंदुत्वाचा एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा भाजपाच्या हातून सुटला होता. अयोध्येचा प्रश्न हा हिंदुत्वाच्या मुद्याला धार देण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात आवश्यक होता. लोकसभेत केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर राज्यातील परिस्थिती आणखीच अवघड होत गेली. हिंदुत्वविषयक आक्रमकतेची स्पर्धा सुरू होण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका मात्र याला निमित्त ठरल्या. त्यातूनच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यामुळे दोन्ही पक्षांकडून हिंदुत्वासाठी सुरू असलेली रस्सीखेच उघड झाली. भूतकाळात अनेक दशके हिंदुत्व या एकाच मुद्यावर मित्र असलेले दोन पक्ष समोरासमोर उभे ठाकण्यामागे दोघांमधील राजकीय कुरघोडी ही पक्ष पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधींना खेचण्याच्या स्पर्धेमुळे आणखी बिकट झाली. भाजपने शिवसेनेचे अनेक नेते, लोकप्रतिनिधी सत्तेच्या बळावर आपल्याकडे खेचले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तालढ्यातील शरद पवारांची रणनीती आणि या राजकीय लढाईत वजीर ठरलेल्या संजय राऊतांच्या खेळीमुळे सत्ताचक्र आपल्या बाजूने फिरवण्यात शिवसेनेला यश आले. या लढाईत हिंदुत्ववादी पक्ष एका बाजूला असते तर धर्म आणि अधर्मातील लढाईचा रंग त्याला देता आला असता. मात्र, दोन्ही बाजूलाही हिंदुत्ववादीच असल्यामुळे तो प्रश्न निर्माण झाला नाही.

राम मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निकालात निघाल्यानंतर त्याचे सत्तामूल्य जवळपास संपल्यात जमा आहे. मात्र, देशाच्या राजकारणातील मतांच्या ध्रुुवीकरणासाठी नव्या मुद्याची गरज नागरिकत्व पडताळणी कायद्याने भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल इंडिया, नोटाबंदीचा फुगा फुटल्यानंतर हे आवश्यक आहे. आर्थिक मंदीचा विषय किंवा उद्योगधंदे बंद पडत असताना आणि केंद्राच्या तिजोरीत खडखडाट असताना लोकांचे लक्ष अस्मितेच्या विषयांकडे वळवण्याचे प्रयत्न आवश्यक आहेतच, त्यासाठी नुकत्याच हिंदुत्ववादी झालेल्या मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. रंगशारदा सभागृहात मनसेच्या मंचावर भाजपाच्या आशिष शेलारांची उपस्थिती ही महाराष्ट्राच्या येणार्‍या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी पुरेशी आहे.

शिवसेनेने धर्मनिरपेक्ष मानल्या जाणार्‍या पक्षांसोबत सत्तास्थापनेचा निर्णय घेतल्यावर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली हिंदुत्वाची पोकळी मनसेकडून भरली जाणार होतीच. भाजपालाही शिवसेनेला काटशह देण्यासाठी आक्रमक हिंदुत्व मांडणार्‍या ताकदीची राज्यात गरज होती. कारण भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा शिवसेनेच्या हिंदुत्वावर राज्यातील हिंदू मतदारांचा विश्वास तुलनेने जास्त आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या महाराष्ट्रातील मराठीच्या अस्मितेला आडवी जाणारी कधीच नव्हती. मराठीसह इतर भाषिक असलेल्या सर्वजातीय सर्वसामान्य लोकांशी जोडलेल्या शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेबांनी मिळवलेल्या राजकीय विश्वासार्हतेचे ते कौशल्य होते. त्यामुळेच शिवसेनेचे ‘मराठी की हिंदुत्व’ असा अंतर्गत पेच कधी निर्माण झाला नाही. मराठी इतर असलेल्या हिंदुत्ववाद्यांनाही शिवसैनिकांच्या मराठी असण्याची भीती वाटली नाही. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व आणि मराठी भाषिक हे दोन्ही मुद्दे परस्पर छेदणार नाहीत, अशा समांतर अंतरावर ठेवले होते. शिवसेना वाढली, बहरली त्यामागे समान्य शिवसैनिकांचे परिश्रम होते. या सामान्य शिवसैनिकांमध्ये हिंदुत्व किंवा त्यातील जातीय समीकरणे कधीही आड आली नाहीत. त्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाचा विश्वास होता. बाळासाहेबांनी आधी भूमिका मांडली, मग त्यांच्या परिणामांचा विचार केला. अनेकदा त्यांच्या भूमिका त्यांच्या समकालीन मंडळींना पटतील अशा नव्हत्या, त्यातील राजकीय उद्देशही उघड होते. परंतु, शिवसेनेच्या आणि पर्यायाने बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाबाबतच्या शंका त्यांच्या विरोधकांनाही उपस्थित करता आल्या नाहीत. कारण हिंदुत्वाच्या राजकारणाआधी समाजकारणातून शिवसेनेची पाळेमुळे बाळासाहेबांनी घट्ट रोवली होती.

शिवसेनेच्या स्थापनेत मराठी भाषा आणि माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्याकडे वळली. जरी ही राजकारणाची तत्कालीक गरज असली तरी शिवसेनेचा समाजकारणातील पाया मजबूत असल्याने मराठीच्या मुद्यावरून ही राजकीय गाडी ‘हिंदुत्वाच्या रुळावर’ वळवताना होणारी ‘खडखड’ पचवण्याची ताकद शिवसेनेत होती, सोबतच त्यावेळी त्याला पूरक अशी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीही कारण ठरली होती. मनसेच्या इंजिनाला आता या कमालीच्या वेगाने बदललेल्या राजकीय काळात हे शक्य होईल का, हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. बाळासाहेबांनी विचार पेरलेल्या एका चिमुकल्या बिजाला महाकाय वटवृक्षाचे रूप दिले होते. त्यामुळे त्यात कुठलाही शॉर्टकट उरला नव्हता. नाजूक असलेल्या त्या चिमुकल्या बिजाची जपवणूक, त्याची निगा राखून राजकीय वादळवार्‍यांपासून संरक्षण करून शिवसेना नावाचे हे झाड वाढले, बहरले होते. त्यासाठी पाच दशकांचा इतिहास खर्ची पडलेला आहे. बाळासाहेबांनी तुरुंगवास आणि रस्त्यांवर केलेल्या अनेक आंदोलनांच्या नेतृत्वातून हा वटवृक्ष बहरला होता. शिवसेनेने पाहिलेला तो कालावधी, ती लोटलेली दशके, चळवळी, ती आंदोलने या शिवसेना नावाच्या वटवृक्षाची मुळे आहेत. वेळ आणि काळाला आडमार्ग, शॉर्टकट कधीही नसतो. त्यासाठी तेवढे पावसाळे पाहावेच लागतात. बदलणार्‍या तेवढ्या ऋतुत उन्हातान्हात केस पिकवावेच लागतात, नांगर धरून रखखत्या उन्हात जमिनीची ढेकळं रांगेत फोडल्यावर त्यात रोवलेल्या बिजाची मशागत केल्यावरच पीक हाती लागतं, त्याला पर्याय नसतो. केवळ झेंडा बदलून एवढ्या मोठ्या कालखंडाला बदलता येणं शक्य नसतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेगळी राजकीय ओळख आहे. त्यांच्या विचारांचा वेगळा असा गडद ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. पक्ष स्थापनेच्या दीड दशकानंतर त्यांनी स्वतःच्या पक्षाची नवी राजकीय ओळख करून देणे आणि त्या ओळखीला लोकांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी यापुढील काही काळ जावाच लागणार आहे. मनसेच्या बदललेल्या भूमिकेमुळे हे आणखी कठीण होणार आहे.

First Published on: January 28, 2020 5:30 AM
Exit mobile version