मुनाफ असा आणि तसा..

मुनाफ असा आणि तसा..

संपादकीय

माणूस कितीही सामान्य असला तरी त्याची जिद्द त्याच्या सामान्यत्वाला तेजाळून सोडते. मग ती व्यक्ती कुठेही असो. मनात प्रामाणिकपणा असेल तर सत्कर्म करण्यासाठी त्याला कोणासाठी थांबावं लागत नाही. भारतीय क्रिकेटचा शून्यातून वर आलेल्या मुनाफ पटेल याने हा आदर्श त्याच्याबरोबर क्रिकेटचा संग्राम उभा केला त्यांच्या समोर उभा केला आहे. मग तिथे विराट कोहलीचं आणि सचिन तेंडुलकर यांची नावं घ्यायची आवश्यकता नाही. त्यांनी आपलं जग निर्माण केलं खरं, पण त्याला सर्वसामान्यांच्या कल्याणाचा भाग किती हे विचारायची सोय नाही. मूनाफ त्यासाठीच या सर्वांपेक्षा मोठा आहे. ज्याच्या मागे कसलंही ग्लॅमर नाही की काही तोरा नाही, तरी त्याने भल्याभल्यांना लाजवेल असं कर्तव्य बजावून या दिग्गजांना तोंडात बोट घालायला लावलं आहे.

गुजरातच्या इखर या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. घरी अठराविश्वे दारिद्य. क्रिकेटसाठी तो खेळला पण तो शिखरावर जाऊ शकला नाही. घरच्या गरिबीतही तो एवढ्यावर पोहोचला हेच खरं तर आश्चर्य. पारंपरिक इमेज असल्याशिवाय क्रिकेटमध्ये संधी शक्य नव्हती. यात अ वर्गात तर अजिबातच अशक्य. अशावेळी तिथे प्रवेश मिळवून थेट मैदानात कदापि अशक्य. ही अशक्य गोष्ट त्याने लीलया पार केली. गरिबीचे चटके काय असतात हे त्याला कोणी सांगण्याची आवश्यकता नव्हती. घरच्या दारिद्र्याने जगावं कसं हे त्याला शिकवलं. अनुभवाचं शिक्षण पुस्तकी ज्ञानाहून वेगळं असतं. अनुभवातून माणूस शाहाणाही लवकर बनतो.

मुनाफचा भारतीय टीम पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मुनाफ बाकीच्या मित्रांबरोबर गुरं राखायला जायचा. तथे टाईमपास म्हणून सगळे काही ना काही खेळत बसायचे. धावण्याची शर्यत असली की मुनाफ सगळ्यांना सहज हरवायचा. धावायचं वेड अंगात इतकं भिनलं की अनेकदा तो स्वतःलाच स्पर्धेत पहायचा. त्याच्या धावण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही. कितीही धावलं तरी पहिला मुनाफच यायचा. २० किलोमीटर धाऊनही त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नसायचा. असं गुरं राखणारा मुलगा असा शिखरावर जावूनही जराही अहंकारी बनला नाही. सामान्यांशी आपली नाळ अधिकच घट्ट केली. आपले पाय जमिनीवरच असल्याचं त्याने सहकाऱ्यांना आणि घरच्यांनाही दाखवून दिलं. घरची गरिबी आणि शिक्षकांचा धाक, यामुळे तो आठवीच्या पुढे जावू शकला नाही. मुनाफ ३५ रुपयाच्या रोजंदारीवर काम करू लागला.  कारखान्यात आठ आठ तास मजुरी करू लागला.

वडील दुसऱ्याच्या शेतात राबायचे. मुनाफ आणि त्याच्या भावंडाना जर दोन वेळच जेवण हवं असेल तर मजुरीशिवाय पर्याय नव्हता. दिवसभर काम करून आल्यावर संध्याकाळी गल्लीत मित्र क्रिकेट खेळायचे. मुनाफ सुद्धा त्यांच्यात सामील व्हायचा. मालकाच्या खालेल्ल्या शिव्या, ढोरमेहनतीमुळे दुखणारे अंग यामुळे बेजार झालेला मुनाफ दातओठ खाऊन बॉलिंग टाकायचा. मनात साठलेला सगळा राग अंगार बनून बाहेर पडायचा. त्याची तुफानी बॉलिंग खेळायला कोणीही बॅट्समन तयार व्हायचं नाही. एकदिवस त्यांच्याच गावातल्या एका युसुफभाई नावाच्या एका बरी परिस्थिती असलेल्या माणसाने मुनाफला बॉलिंग करताना पाहिलं. त्याने मुनाफ साठी ४०० रुपयांचे बूट विकत आणले. हे मुनाफ पटेलच्या आयुष्यातले पहिले बूट. एवढंच नाही तर युसुफ भाई यांनी त्याला बडोद्याला नेलं, एका क्रिकेट क्लबमध्ये त्याचा शिरकाव केला. त्यांचे हे आभाळाएवढे उपकार मुनाफ कधीही विसरू शकत नाही.

२०११ च्या वर्ल्डकप जिंकण्यात जेवढा सचिन, युवराज, धोनी यांचा वाटा आहे, तितकाच वाटा मुनाफच्या बॉलिंगचा देखील आहे. गेल्या वर्षी मुनाफ पटेल रिटायर झाला. पण निवृत्ती नंतरही तो आपल्या गावी बांधलेल्या घरात राहतो. शेतात काम करतो, मित्रांबरोबर गावातल्या चौकात उभ राहून गप्पा मारतो, त्यांच्या बरोबरच खेळतो. असच शांत निवांत आयुष्य चालू आहे. त्याच्या घरी मदत मागायला गेलेला प्रत्येकजण मोकळ्या हाती परतत नाही. काही दिवसापूर्वी जगाला छळत असलेलं कोरोनाच संकट त्याच्या गावालाही येऊन धडकल. गुजरातच्या एवढ्या कानाकोपऱ्यात असलेल्या इखरमध्ये कोरोना येईल अस कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हत. पण मजुरीसाठी तामिळनाडू गेलेले काही तरुण गावाकडे परत आले आणि त्यांच्यासोबत कोरोनाने त्या छोट्या खेड्यात प्रवेश केला.

गावातील बहुसंख्य जनता अडाणी, त्यांना सोशल डिस्टंसचा अर्थ समजत नव्हता न त्याचं महत्व कळत होतं. त्यात शेतात पिक कापणीला आलं होत. यासगळ्या गडबडीत कोरोनाचा विषाणू भयानक वेगाने पसरला. अखेर गावचा हिरो मुनाफ पटेल समोर आला. रोज ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्याने लोकांना आवाहन करण्यास सुरवात केली. रस्त्यावर उतरून हातात माईक घेऊन लोकांना समजावून सांगण सुरु केलं. आपला लाडका मुनाफ सांगतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनी लॉकडाऊनच व्यवस्थित पालन करण्यास सुरुवात केली.

मुनाफ फक्त जनजागृती करत होता अस नाही तर त्याने गावात ४० बेडचं एक अत्याधुनिक कोव्हीड सेंटर उभारलंय. इथे लोकांना क्वारंटाईन होण्याची सोय केली गेली आहे. इथे राहणाऱ्या सर्वांचा अगदी खाण्यापिण्यापर्यंतचा सगळा खर्च मुनाफ पटेल उचलत आहे. मुनाफने क्रिकेटमध्ये काही खूप पैसा कमवला नाही. इतर खेळाडूंप्रमाणे तो कधी प्रचंड प्रकाशझोतात नव्हता न कधी त्याला टीव्ही जाहिराती मिळाल्या. पण मुनाफने जे काही कमवल ते गावाच्या जीवावर हे त्याला पक्क ठाऊक आहे. म्हणूनच तो म्हणतो, “ये संकट कि घडी नही ये घडी एहसान चुकाने की घडी है.” संकटात जो धावून येतो तोच परमेश्वर. क्रिकेटच्या जीवावर गडगंज संपत्ती कमावलेल्या किती बादशहांनी मुनाफचा मार्ग स्वीकारला? दुर्दैवाने मोजण्याइतकेही नाहीत. क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा घेतलेले नामचीन मुनाफपुढे खुजे आहेत. नाव मोठे पण लक्षण खोटे, असंच म्हणावं लागतं. संकट नसतं तर यांची आठवणही आली नसती. म्हणून संकटात मदतीला धावणारा मुनाफच खरा..

First Published on: August 2, 2020 8:09 PM
Exit mobile version