हिर रांझा ते उमराव जान!

हिर रांझा ते उमराव जान!

Khayyam

संगीतकार खय्याम यांचे निधन ही शायरीचा कान असणार्‍यांसाठी धक्कादायक बाब आहे. आपल्या जवळचा माणूस गेल्याचे ते दुःख आहे. कारण आपल्या आजुबाजूला कोणी नसते आणि एकटे वाटते तेव्हा खय्याम यांची गाणी आपली साथी होतात, हळुवारपणे तुम्हाला ती साद घालतात, जीवनाचा मार्ग दाखवतात. जगण्यावर प्रेम करायला लावतात. सुप्रसिद्ध वगैरे अशी बिरुदावली त्यांना लावता येणार नाही, पण त्यांनी जे काही १९४८ पासून सिने संगीतात काम केले ते चिरकाल असे आहे. त्यांच्या अजरामर अशा कलाकृतीत त्यांचा मनस्वी स्वभाव जडला होता आणि म्हणून आपल्या मनाला भावले तेच काम त्यांनी केले. पैशाला पासरी काम करून गल्ला भरण्यापेक्षा शायरीच्या अंगाने जाणार्‍या चिरकाल अशा कलाकृती त्यांनी निर्माण केल्या… आणि म्हणूनच ‘इन आंखो के मस्ती के परवाने हजारो है’ असे ते गुणगुणायला लावतात तेव्हा रेखाच्या मागे आशा भोसलेंचा स्वर काळीज चिरत असतो आणि मागे खय्याम उभे असतात. आजही ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिये, बस एक बार मेरा कहां मान लिजिये…’ हे गाणे लागताच पाय थबकतात, उमरावच्या डोळ्यात डोळा घालून स्वरांच्या हिंदोळ्यावर बसून दूर देशी जाता येते… उमराव जान ही एक शोकांतिका आहे, पण प्रत्येक माणसाचा तो चेहरा आहे. कोणाच्या नशिबी दुःख नाही. प्रत्येक माणसाचा तो आरसा आहे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा प्रत्येक माणसाचा तो चेहरा असावा… कोण दाखवतो, कोण दाखवत नाही. दुसर्‍याच्या दुःखावर फुंकर घालताना आपले दुःख हळुवार करत नेण्याचा जीवघेणा प्रवास प्रत्येकाला जमतोच असे नाही… आणि मग ‘ये क्या जगह है दोस्तो’ असे म्हणत ‘जुस्तजू जिस की थी’, असे स्वतःला समजवावे लागते. जशी उमराव स्वतःला समजावत होती आणि तिच्या चिर वेदना दुःखातून खय्याम यांनी आपल्याला समजावून दिल्या…

खय्याम यांच्या जाण्याने चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील शेवटचा शिलेदार आपण गमावला आहे, अशी सर्वत्र भावना आहे. स्वतःला त्रास करून घेताना जोपर्यंत आपल्या मनाला भावत नाही तोवर त्या चालीवर काम करत राहायचे आणि नंतर तासंतास चालणारा रियाज हे खय्याम यांच्या संगीताचे वैशिष्ठ्य होते. मग निर्माता किती पैसेवाला आहे, दिग्दर्शक किती नावाजलेला आहे आणि ते कोण गाणार आहे, याची त्यांना पर्वा नसे. हे स्वतः मंगेशकर भगिनींनी मान्य केले आहे. आशा भोसले यांचा जन्म तर त्यांच्या चाली गाण्यासाठी झाला असावा, असं सतत वाटतं. दमदार तितकाच सुरावटीच्या अंगाने जाणारा फिरकीबाज आशा यांचा आवाज खय्याम यांच्या चालींना आव्हान देणारा होता, पण आपल्या कानावर पडते तितकी ती गायला चाल सोपी नसते. घोटून घेऊन ती आशा यांच्याकडून खय्याम यांनी तालमीत तयार केलेली असते. खय्याम यांच्याकडे गायचे म्हणजे एक प्रकारची शिकवणी होती. एका एका शब्दावर ठेहराव होता… म्हणूनच माझ्याकडून इतकी चांगली गाणी गाऊन झाली…

‘बहारो मेरा जीवन संवारो, ऐ दिले नादां, ये मुलाकात एक बहाना है’ या लतांच्या आवाजातील शायरीच्या अंगाने जाणार्‍या चाली आपल्या कानावर पडतात तेव्हा तन मन शहारून गेलेले असते… खय्याम यांच्या निधनानंतर लताबाईंनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. शायरीचा सुरावटकार आपण गमावला. मी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा गायले तेव्हा मला तो अनुभव आला…असं ही गान स्वरस्वती सांगते तेव्हा खय्याम डोंगराएवढे मोठे असतात! कायम आपल्याला जे भावेल त्या पद्धतीने काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना अनेकदा चित्रपट सोडावे लागले. त्यांचे आर्थिक नुकसान झाले, पण त्यांनी कधी तडजोड केली नाही. खय्याम तत्वनिष्ठ होते, त्यांनी जे संगीत दिले ते त्यांच्या प्रतिभेतून उतरले होते. कुणाच्या तरी चालीवरून मी माझी गाणी बनवीत नाही, असे त्यांनी एका निर्मात्याला सुनावले होते. कदाचित त्यांच्या या मनस्वी स्वभावाला फिल्म जगतात त्यांची तुसड्या स्वभावाचा माणूस म्हणून बदनामी करण्यात आली, पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. आपल्या संगीतावर त्यांचा गाढ विश्वास होता.

एकदा एका चित्रपटासाठी काम करत असताना त्या काळातील मोठं नाव असलेल्या वली साहेब खय्याम यांना म्हणाले, तुम्ही नौशाद यांच्यासारखी चाल करा. हे ऐकताच खय्याम यांनी काम थांबवले आणि चित्रपट सोडून दिला. पुढे वली साहेब आले असताना ज्या चालीवर खय्याम काम करत होते ती चाल त्यांनी दुसर्‍या चित्रपटात वापरली आणि ते गाणे होते, ‘शाम ए गम की कसम, आज गमगीन हैं हम आ भी जा आ भी जा आज मेरे सनम’ फुटपाथ चित्रपटात पडद्यावर दिलीप कुमार गातो आणि त्या मागचा तलत मेहमूदचा मयूरपंखी आवाज आपल्या मनावर गारुड करतो…तुम्हाला नादावून सोडतो. हाच भारावून टाकणारा अनुभव त्यांनी बाजार सिनेमाच्या संगीताने दिला होता. ‘फिर छिडी रात बात फुलोंकी, देख लो आज हम को, दिखाई दिये यु, करोगे याद तो हर बात’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी देत त्यांनी रसिक मनाला भारावून टाकलं. खय्याम यांनी ७१ चित्रपट आणि ९ दूरदर्शन मालिकांना संगीत दिलं. तलत मेहमूद, बेगम अख्तर, लता, आशा, रफी, मुकेश, महेंद्र कपूर, सुधा मल्होत्रा, सुलक्षणा पंडित आणि हेमलता यांच्याकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली. फिल्मफेअर, राष्ट्रीय आणि पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

‘रोज अत्याचार होतो, आरशावर आता, आरशात पाहिलेली माणसे गेली कुठे’ ,असे कवी इलाही जामदार सांगतात ते खरे आहे. खय्याम यांच्यासारखा शायरीवर प्रेम करणारा संगीतकार मनस्वी माणूस आता आरशातही शोधून सापडणार नाही…१९४८ साली हीर रांझापासून सुरू झालेला त्यांचा संगीत प्रवास उमराव जान करत आता थांबलाय!

First Published on: August 21, 2019 5:30 AM
Exit mobile version