कोचिंग क्लासेसचे वाढते फॅड

कोचिंग क्लासेसचे वाढते फॅड

शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढतच चालली आहे. त्यातही मोठमोठ्या शहरांमध्ये कोचिंग क्लासमधील चढाओढ. या सगळ्यात नुकसान होतंय ते विद्यार्थ्यांचं. कारण त्यांना नक्की काय शिकायचं आणि काय करायचं हे त्या त्या वयात कळतच नाही. खेळण्याच्या आणि मस्ती करण्याच्या वयात शाळा आणि कोचिंग क्लास असा दोन्हीचा भार त्यांच्या डोक्यावर पालक देत आहेत. अधिक गुणप्राप्ती ही गुणवत्ता नाही याची जाणीव प्रत्येक पालकांना होणे जास्त गरजेचे आहे. अव्वाच्या सव्वा शुल्क भरून कोचिंग क्लास आणि टेस्ट या सगळ्यानंतरही विद्यार्थ्यांनी नक्की किती अभ्यास शिकला हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. केवळ गुण मिळवले म्हणजे विद्यार्थ्याला सर्व काही डोक्यात शिरलं असं होतं का? याचं उत्तर नक्कीच तुम्हीदेखील नाही असंच देणार. त्यामुळे पालक आणि पाल्य या दोघांनीही शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासमध्ये जाण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. जणू काही हे एक फॅडच आहे, पण कोचिंग क्लासना न जाता शाळेत शिकवण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले आणि घरी व्यवस्थित अभ्यास केला तरीही चांगले गुण मिळू शकतात यावर आता पालकांचा विश्वासच राहिला नाहीये, असं चित्र निर्माण झालं आहे. इतर मुलं कोचिंग क्लासला जाऊन अधिक गुण मिळवतील आणि आपला पाल्य मागे राहील या भीतीपोटी हे कोचिंग क्लासचं फॅड वाढत चाललं आहे आणि त्यातच शिक्षणाचे मात्र बारा वाजल्याचे दिसून येत आहे. या कोचिंग क्लासचं फॅड सध्या इतकं वाढलं आहे की, आमच्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आणि आम्ही त्यांचा अभ्यास कसा करून घेतला याचे पोस्टर्स अगदी चालत्या फिरत्या बसवरदेखील लावले जातात. या खासगी कोचिंग क्लासने शिक्षणाचा धंदाच केला आहे आणि तो तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत पालक पाऊल उचलणार नाहीत. आई आणि वडील दोन्ही कमवत राहतात आणि मुलाकडे लक्ष देता येत नाही. कोचिंग क्लास आणि शाळेत प्रवेश मिळवून दिला की सगळं काही झालं असं त्यांना वाटतं, पण सगळ्यात सर्वात मोठं नुकसान होतं ते पाल्याचं. कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांकडून सकाळ – संध्याकाळ सतत अभ्यास करून घेतला जातो. सतत टेस्ट घेतल्या जातात, पण त्याचा पाल्याच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार कोणीच करत नाही. गुरंढोरं भरतात तशी मुलं या कोचिंग क्लासमध्ये भरलेली दिसून येतात. जर कोचिंग क्लासवरच अवलंबून राहायचे आहे तर मग शाळेत तरी कशाला घालायचे, असाही प्रश्न निर्माण होतो.

शिक्षणाचा मूळ स्रोत हा शाळा आहे. शाळेत शिकवलेले विद्यार्थ्यांना योग्य रितीने कळते. फक्त त्यांना घरी येऊन त्या अभ्यासाचा सराव करण्याची गरज असते. शाळेत काहीही कळले नाही तर शिक्षक पुन्हा शिकवायला तयार असतात. असं असताना वेगळे कोचिंग क्लास लावण्याची खरंच गरज आहे का? केवळ एखादा मुलगा कोचिंग क्लासला जातो म्हणून आपल्या मुलालाही पाठवायचे हे योग्य नाही. जर आपल्या मुलामध्ये योग्य शिक्षण घेण्याची क्षमता असेल तर त्याच्यावर कोचिंग क्लासला जाण्याचा दबाव पालकांनी करू नये. पालकांनी कोचिंग क्लासला विद्यार्थ्यांना पाठवण्याचा खरंच एकदा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातील थोडा वेळ काढून आपल्या मुलांसह अभ्यासासाठी बसल्यास, त्यांना जास्त शिक्षण चांगले जमेल. अगदी पूर्वापार हे चालत आले आहे. अभ्यासक्रम बदलला असला तरीही अभ्यासाचे मूळ तेच आहे. त्यामुळे प्रत्येक पालक जितका आपल्या मुलांना चांगलं शिकवू शकेल तितके कोचिंग क्लासमध्ये शिकवले जाणार नाही हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे जर हळूहळू पालकांना समजू लागलं तर कोचिंग क्लासचं हे फॅड नक्कीच मागे पडेल आणि शिक्षणाचं महत्त्वही लक्षात येईल.

शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही क्लास अर्थात कोचिंग क्लास संस्कृती पसरत चालली आहे. या मुलांना झापडबंद शिक्षण देण्यात येते. हे क्लास सामान्य व्यक्तींकडून चालवण्यात येतात. शाळेप्रमाणे तज्ज्ञ शिक्षक या क्लासमध्ये असतीलच असं नाही. तरीही क्लासला मुलांना घालण्यात येते, पण क्लास हे नफा मिळवण्यासाठी चालवण्यात येतात याचा विचार कुठेतरी आता करायला हवा. तज्ज्ञ नसले तरीही क्लास चालतात. त्यामुळे मुलाना बर्‍याचदा चुकीचे शिक्षणही मिळत असतं. अर्थात अशी परिस्थिती सगळीकडे नाही, पण बर्‍याचशा क्लासमध्ये मात्र ही परिस्थिती दिसून येते. असं असताना केवळ डोळे बंद करून कोचिंग क्लासना मुलांना घालण्याचे फॅड आता पालकांनी स्वतःहून कमी करायला हवे. जेणेकरून आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण नीट विचार करायला हवा अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सर्वच क्लासमधून दर्जेदार शिकवण्यात येतं असं नाही याचा विचार पालकांनी करायला हवा. आपल्या मुलांना क्लासमध्ये प्रवेश मिळवून दिला की, आपण मोकळे झालो, हे धोरण कधीही योग्य नाही. क्लासमध्ये गेलेला विद्यार्थी उत्तीर्ण होईलच असे नाही. कारण अभ्यास हा मुलांच्या आकलनशक्तीवर असतो. त्यावर गांभीर्याने विचार व्हावा. कोचिंग क्लासच्या चक्रव्यूहात मुलांना अडकवून त्यांना वेठीला धरणं आणि त्यांच्यावर अधिक दबाव आणणं योग्य नाही. कोचिंग क्लास आणि त्याचे हे वाढते फॅड पालक आणि विद्यार्थ्यांच्या एका निर्णयामुळेच थांबू शकते आणि त्याचा आता पुनर्विचार करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे.

First Published on: March 16, 2020 5:35 AM
Exit mobile version