भारतानंतर आता भगव्याची फाळणी

भारतानंतर आता भगव्याची फाळणी

शिवसेना-भाजप

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची १९८९ साली हिंदुत्वाच्या नावावर युती झाली तेव्हा पुढे काही वर्षांनी भगव्या झेंड्यामध्येसुद्धा शुध्द आणि कमी शुध्द किंवा अशुध्द अशी क्रमवारी लावण्यात येईल, अशी लोकांनी कल्पनाही केली नसेल. पण आपापली सोय सगळे पाहतात, त्यामुळे तो सोयीस्करपणा माणसांना आपल्या भूमिकाच नव्हे तर पूर्वापार चालत आलेल्या प्रतिकांची ओळख बदलायला लावतो. जो मित्राला मित्रापासून इतकेच नव्हे तर भावाला भावापासून दूर नेतो. लोक विचार करतात, असे का झाले; पण त्याचे उत्तर त्यांना सापडत नाही. अशा स्थितीत कार्यकर्ते म्हणवले जाणार्‍या लोकांमध्ये मानसिक द्विधा अवस्था निर्माण होते. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी त्यांची अवघडलेली अवस्था होऊन बसते. नेते मंडळी आपापल्या महत्वाकांक्षेला अनुसरून आपली भूमिका जाहीर करतात. आपल्या भूमिकांमध्ये बदल करतात; पण सामान्य कार्यकर्त्यांची, त्यांना मानणार्‍या सामान्य जनतेची मात्र विचित्र कोंडी होती. ज्यांच्यासोबत आपण कालपर्यंत हातात हात घालून काम केले, त्यांच्याच विरोधात आरोप-प्रत्यारोप करताना त्यांच्याही मनाची घालमेल होते; पण सर्वकाही साहेबांसाठी करायचे या निर्धाराने मनावर दगड ठेवून ते आपले काम करत राहतात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते प्रमोद महाजन यांनी एकमेकांची पक्षीय गरज लक्षात घेऊन शिवसेना आणि भाजप यांची युती केली. त्याला हिंदुत्वाचे अधिष्ठान दिले. पुढे भाजप आणि शिवसेना यांनी केवळ राज्यपातळीवर नव्हे तर महानगरपालिका, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करून सत्ता मिळवली. मुळात शिवसेनेची स्थापना झाली ती महाराष्ट्रातील मराठी माणसांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, पण पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या असे लक्षात आले की, महाराष्ट्रातील सगळा मराठी माणूस आपण शिवसेनेच्या पंखाखाली आणू शकत नाही. कारण महाराष्ट्रात काँग्रेस आणि नंतर शरद पवारांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हे मजबूत पक्ष आहेत. त्यांची राज्यातील मराठी जनमतावर राजकीय पकड भक्कम आहे. त्यामुळे केवळ मराठी माणूस हा विषय घेतला, तर शिवसेनेच्या विस्ताराला मर्यादा पडत आहेत. मुंबईत विविध राज्यांमधील बहुभाषिक लोक व्यवसाय आणि रोजगारासाठी मोठ्या संख्येने आलेले आहेत.

केवळ मराठी माणूस हा विषय घेऊन या अमराठी लोकांना डावलले तर आपल्याला ते राजकीयदृष्ठ्या परवडणारे नाही. भाजपसोबत आपली हिंदुत्वाच्या नावावर युती आहे, पण आपण मुंंबईतील अमराठी हिंदू लोकांना दूर ठेवले तर त्याचा राजकीय फायदा भाजपला होणार आहे. तो फायदा आपण घ्यावा, म्हणून शिवसेनेने आपली मराठी माणूस ही भूमिका बदलून व्यापक हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्यापूर्वी हिंदुत्व हा केवळ भाजपचा विषय होता, पण शिवसेनेने भूमिका बदलल्यामुळे भाजपचा कालपर्यंत असलेला हा मित्र नवा स्पर्धक होऊन बसला. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवत असले तरी त्यांची अंतर्गत चढाओढ सुरू झाली. जोपर्यंत शिवसेना केवळ मराठी माणूस हा विषय घेऊन होती, तोपर्यंत भाजपला काही चिंता नव्हती. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांचे मनसुबे नक्कीच निराळे होते. शिवसेना हा राज्यात हिंदुत्वाला मानणारा पक्ष होता, तो भाजपच्या सोयीचा होता. त्याच्या मदतीने यांना महाराष्ट्रात आपला विस्तार करायचा होता. तसा तो त्यांनी करूनही घेतला. पुढे शिवसेनेनेहीे हिंदुत्वाच्या आधारे आपल्या कक्षा विस्तारायला सुरुवात केली. तर दुसर्‍या बाजूला शतप्रतिशत भाजपच्या हलक्या आवाजात घोषणा आणि प्रयत्न सुरू होते.

शिवसेना-भाजप यांनी हिंदुत्वाच्या आधारे लगीनगाठ बांधली खरी; पण आता त्यांच्यातील सत्तास्पर्धा इतक्या टोकाला जाऊन पोहोचली आहे की, एके काळी स्वत:ला हिंदुत्वाचे कट्टर समर्थक म्हणवून घेणारे हे पक्ष आज कट्टर विरोधक होऊन बसले आहेत. त्यावेळी त्यांच्या मैत्रीचा आधार हिंदुत्व होते; पण आता त्यांच्या प्रतिस्पर्धेतील कळीचा मुद्दा हा हिंदुत्व होऊन बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ साली होणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही भाजपचा शुध्द भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आजवर आपण शुध्द तूप हा शब्द प्रामुख्याने ऐकला होता; पण शुध्द भगवा हा काय प्रकार आहे, हे बर्‍याच जणांच्या लक्षात येईना. कारण भगव्यामध्ये शुध्द आणि अशुध्द असे विभाजन कसे काय होऊ शकते, असा प्रश्न पडतो. कारण हिंदुत्वाचा भगवा हा जगात कुठेही गेले तरी तो एकच राहणे अपेक्षित आहे. मग हा काय प्रकार आहे, हा खरे तर चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

कारण राजकीय नेते आणि पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी धार्मिक प्रतिकांची कशी विभागणी करतात, हेच यावरून दिसून येते. काही वेळा यातून देशही सुटत नाही. एके काळी असे म्हटले जायचे की, बॅरिस्टर महमदअली जिना हे राष्ट्रभक्त होते, ते पुढे भारताच्या फाळणीची मागणी करतील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण पुढे जहालवादी आणि मवाळवादी या वादातून त्यांची राजकीय महत्वाकांक्षा इतकी इरले पेटली की, त्यांनी तिला हिंदू-मुस्लीम दुहीचा रंग देऊन आणि त्याला खतपाणी घालून भारताची फाळणी घडवून आणली. पाकिस्तानची निर्मिती केल्यावर जिना फार काळ जगले नाहीत. तिथली परिस्थिती जिनांच्या हाताबाहेर गेली होती. त्यामुळे फाळणी ही आपली एक चूक होती, असे जिना मरताना म्हणाले होते, अशीही माहिती काही ठिकाणी नोंद केलेली आढळते. यातील वास्तवाचा शोध घ्यावा लागेल; पण आज पाकिस्तानची परिस्थिती पहिली तर जिनांना शेवटी उपरती झाली असावी, असा तर्क करण्यास वाव आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर आम्ही भाजपचा शुध्द भगवा फडकवू, असे म्हटल्यावर त्यांना शिवसेनेचा भगवा हा अशुध्द आहे, किंवा कमअस्सल आहे, असे अप्रत्यक्षपणे सूचवायचे आहे, असे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. शिवसेनेने आपले वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तेसाठी हातमिळवणी केली. त्यामुळे आता ते कमअस्सल हिंदुत्ववादी झाले. त्यामुळे खरे किंवा शुध्द हिंदुत्ववादी आम्ही भाजपवाले आहोत, असा फडणवीसांचा दावा असावा. त्यावर शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शुध्द भगवा कुणाचा आहे, हे जनताच दाखवून देईल.

आमचा भगवा हा शिवरायांचा आहे, शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, असे ठणकावून उत्तर दिले आहे. पूर्वी जेव्हा कधी भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदुत्वाच्या प्रकारावरून हलक्या आवाजात प्रश्न विचारला जाई, त्यावेळी आमचे हिंदुत्व हे पहिल्या धारेचे आहे आणि भाजपचे हिंदुत्व हे दुसर्‍या धारेचे आहे, असे शिवसेनावाले सांगत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे हेच शिवसेनेचे नेते असतील असा अनेकांचा अंदाज होता; पण परिस्थितीने तो चुकीचा ठरवला. तसे झाले नाही, म्हणून राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष स्थापन केला. तेही हिंदुत्वाला मानतात, त्यामुळे तेही हिंदुत्ववाद्यांमधील एक स्पर्धक असणार आहेत.

मुद्दा असा आहे की, हिंदुत्व ही खरे तर व्यापक संकल्पना आहे. त्या छत्राखाली त्या विचारधारेला मानणार्‍या लोकांनी एकत्र येऊन समाजहिताचे काम करावे असे अपेक्षित आहे. पण आता आमचा भगवा हा शुध्द आहे. तुमचा अशुध्द आहे, असे म्हणून त्या हिंदुत्वाची अशी ओढाताण होत असेल तर त्याला काय म्हणावे. शेवटी त्याची परिणती कशात होईल, याचा विचार राजकारण करताना नेते मंडळींना करावा असे का वाटत नाही. भगव्या झेंड्याला शुध्द आणि अशुध्द पातळीवर नेऊन ठेवण्यापर्यंत मजल जात असेल तर आपली पातळी किती खाली गेली आहे, त्याचा या हिंदुत्ववादी पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. भारतानंतर आता ही फाळणी भगव्यापर्यंत जात असेल तर हे खरोखरच दुर्दैवी आहे.

First Published on: November 23, 2020 7:29 PM
Exit mobile version